Shravan 2022: श्रावणातील पहिला शनिवार अश्र्वत्थ मारूती पूजनाचा; काय आहे यामागची कहाणी ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashwattha Maruti Pooja

Shravan 2022: श्रावणातील पहिला शनिवार अश्र्वत्थ मारूती पूजेच्या मागची काय आहे कहाणी ?

कालपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा आहे. आनंद आणि उत्साह देणाऱ्या श्रावण मासारंभाला सुरुवात झाली आहे. श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. याच निमित्ताने अश्र्वत्थ मारूती पूजन का केले जाते ? त्यांचे नेमके महत्त्व काय आहे हे सविस्तर जाणून घेऊ या.

अश्र्वत्थाची पूजा कशी केली जाते ?

आपल्या महाराष्ट्रात श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. या पूजेच्या आधी दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घातले जाते. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या झाडांखाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. आणि समजा तिथे मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. मारुतीचा आवडता वार शनिवार आहे. त्यामुळे श्रावणात दर शनिवारी मारुतीरायाला न विसरता तेल, शेंदूर, रुईच्या पानांची फुलांची माळ मोठ्या प्रेमाने घातली जाते.

पूजेसाठी पिंपळाचे झाडच का निवडले असावे ?

असे सांगितले जाते की, पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या दुःखाचा पीडांचा परिहार होतो. वेदकाळापूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत अश्र्वत्थवृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. त्यामुळे तेव्हापासून या वृक्षाची पूजा केली जाते. पुढे ऋग्वेदकाळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्र्वत्थापासून बनवली जात असे. यज्ञ आणि पितर अश्र्वत्थामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे. उपनिषद काळात अश्र्वत्थ हे देवस्थान मानले गेले. त्याबद्दलची पुराणात एक कहाणी आहे.

चला तर मग आता बघू या अश्र्वत्थाची पूजेची कहाणी:

एकदा भगवान विष्णूने त्यांच्या धनंजय नावाच्या एका विष्णूभक्त ब्राह्मणाची सत्त्वपरीक्षा घेण्याचे ठरविले. ठरल्याप्रमाणे त्यांनी धनंजयाच्या आयुष्यात प्रचंड गरिबी आणली. परिणामी तो गरिब झाल्यामुळे त्याच्या सगळ्या नातेवाईकांनी त्याला एकटे पाडले.गरिबीमुळे त्याला घरदार सोडावे लागले.तो बेघर झाला, आणि ते दिवस हिवाळ्याचे होते. हिवाळ्यात बाहेर राहायचं म्हणजे खूप कठीण काम होतं मग धनंजय थंडीपासून स्वत:चे रक्षण व्हावे ह्या हेतूने सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत होता आणि थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत असे.एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली. त्याक्षणी अचानक तिथे भगवान विष्णू प्रकटले. आणि त्यांनी मोठ्या आवाजात धनंजयला सांगितले की ‘तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे माझे संपूर्ण शरीर हे रक्तबंबाळ झाले आहे, मलाच तुझ्या या घावामूळे जखमा झाल्या आहेत’. हे ऐकून धनंजय प्रचंड दुःखी झाला, आणि त्याच कुऱ्हाडीने स्वत:ची मान तोडून प्रायश्चित्त घेण्याचे त्यांने ठरविले. त्याची ही अपार भक्ती पाहून भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले. पुढे त्यांनी धनंजयांला रोज नित्यनेमाने अश्र्वत्थाची पूजा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक अश्र्वत्थाची पूजा करू लागला. पुढे अचानक एका दिवशी कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले. प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये ‘ अश्र्वत्थ सर्ववृक्षाणामू‘ (वृक्षांमध्ये जो अश्र्वत्थ तो मी होय.) असे म्हटले आहे.

हेही वाचा: Shravan 2022: जिथे भगवान शिव तिथे रुद्राक्ष का असतो?

तेव्हा पासून मग हरवलेली वस्तू वा व्यक्ती असल्याला प्रदक्षिणा घातल्याने परत मिळते अशा श्रद्धेने आपल्याकडे पिंपळाला प्रदक्षिणा घालण्यांची प्रथा सुरु झाली.आजही काही भागात पूजा करण्यापूर्वी स्त्रिया वटवृक्षाप्रमाणेच अश्र्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात. दृष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो.

श्रावण महिन्यात मारुती रायाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे ?

1) 'ओम नमो भगवते वासुदेवनंदनाय नम:' या प्रभावी हनुमान मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास दु:ख, दैन्य, वा दारिद्रय तुमच्या आसपास फिरणार नाही.

2) दररोज `भीमरुपी महारुद्रा' या मारुती स्तोत्राची २१ आवर्तने म्हणावे.

3) ही आवर्तने करताना हनुमानाच्या मूर्तीवर सोवळ्याने अभिषेक करावा.

4) हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण न करणे.

5) वानरगीते'चे रोज एक पाठ घ्यावा.

6) श्रावणातील कृष्णपक्षात त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावास्या ह्या तीन दिवशी पितरांची तहान शमावी ह्या श्रद्धाभावनेने पिंपळाच्या बुंध्याजवळ पाणी घालावे.

Web Title: Shravan 2022 1st Saturday Of Shravan For Ashwattha Maruti Poojan What Is The Story Behind This

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :cultureshravanFestivals