औरंगाबाद : शिवालये भाविकांनी गजबजली

श्रावणी सोमवारची परळी, वेरूळ, औंढ्यात पर्वणी
Aurangabad Shravan Somvar mahadev temples Parli Verul
Aurangabad Shravan Somvar mahadev temples Parli Verul
Updated on

औरंगाबाद - श्रावणातील पहिल्या सोमवारची लाखो भाविकांनी पर्वणी साधली आणि शिवालये गजबजून गेली. बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या परळी, वेरूळ आणि औंढा नागनाथ येथील शिवालयांत राज्यासह परराज्यांतील भाविकांची मोठी गर्दी होती. पावसाची उघडीप आणि कोरोनानंतर दोन वर्षांनी मिळालेली दर्शनाची संधी यामुळे भाविकांत कमालीचा उत्साह होता. ‘बम बम भोले’च्या जयघोषाने ही तिन्ही ठिकाणे दुमदुमून गेली होती.

अाैंढा नागनाथ भक्तिमय

औंढा नागनाथ : बारापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या येथील नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राज्यासह दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात आदी भागातील भाविकांचाही त्यात समावेश होता. ‘बम बम भोले’, ‘श्री नागनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने दाखल झाली होती. परिसरातील अनेक भाविक अनवाणी दाखल झाले होते.

देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर दोनला महापूजा केली. पद्माक्ष पाठक, तुळजादास भोपी, बंडू पंडित, जिवन रुषी, आबागुरु बल्लाळ यांनी महापूजेची आवर्तने म्हटली. देवस्थानचे अधिक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, एस. उदगीरे, बापूराव देशमुख, नागेश माने, कृष्णा पाटील आदी मंदिरात दिवसभर होते. महापूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. गर्भगृहात जाऊनच दर्शन घ्यावे लागत असल्याने आणि आत जाण्या-येण्याचा एकच मार्ग असल्याने दर्शनासाठी वेळ लागत होता. तरीही भाविकांनी शांततेत श्रींचे दर्शन घेतले. संस्थानतर्फे सकाळी प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडीचे वाटप केले. पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

वेरुळमध्ये भक्तांची गर्दी

खुलताबाद ः वेरूळ (ता.खुलताबाद) येथील १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावण सोमवारी (ता.१) हजारो भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभर मंदिर परिसरात भाविकांचा ओढा सुरुच होता. यंदा कोरोनाबाबतचे नियम शिथिल असल्यामुळे भाविकांची संख्या जास्त दिसून आली. एक लाखाहून अधिक भाविकांनी श्रावण सोमवारी दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान अध्यक्ष शशांक टोपरे यांनी दिली.

यंदा भाविकांची चांगली गर्दी असल्यामुळे

स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. विशेष म्हणजे घृष्णेश्वराच्या दर्शनानंतर येथे आलेल्या भाविकांनी पर्यटनाचा आनंद लुटला. दरम्यान, वेरूळ मंदिर देवस्थान तर्फे येथे येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी सभामंडप व मंदिर परिसरात बॅरिकेट्सची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता आले. मंदिर परिसरात १५० खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. तसेच सोबतच कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

परळीत दोन लाख भाविक

परळी वैजनाथ ः बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले. राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, गुजरात, मध्यप्रदेश आदी भागांतील भाविकांचा यात समावेश होता. ‘हर हर महादेव’, ‘वैद्यनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला. रविवारी मध्यरात्रीपासून भाविकांनी रांग लावली. दुपारी एकपर्यंत सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. मंदिर देवस्थान ट्रस्टने सोयी-सुविधा उपलब्ध केल्या होत्या. महिलांना दर्शनासाठी वेगळी व्यवस्था होती. गोदावरीचे पाणी कावडीने घेऊन वैद्यनाथाला अभिषेक करण्यासाठी आलेल्यांची स्वतंत्र व्यवस्था होती. गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरातून होणारी वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली.

कोरानामुळे दोन वर्षे मंदिरे बंद होती. गुढीपाडव्यापासून सर्व मंदिरे खुले झाल्यानंतर भाविकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दोन वर्षानंतर श्रावणी सोमवारनिमित्त मोठ्या गर्दीची अपेक्षा होतीच. पहिल्या सोमवारी हे चित्र दिसले.भाविकांच्या सोयीसाठी ट्रस्टने सुविधा पुरविल्या आहेत.

- राजेश देशमुख, वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com