

- नंदिनी वाकडे
आषाढ शुद्ध एकादशीनंतर येणारा पहिला महिना म्हणजे श्रावण. या महिन्यात शिवाची आराधना केली जाते. सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये शिवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञभाव व्यक्त करणे प्रत्येकाचे कर्तव्यच ठरते.
कैलासराणा शिवचंद्रमौळी|
फणींद्र माथां मकुटी झळाळी|
कारुण्यसिंधू भवदुःखहारी|
तुजवीण शंभो मज कोण तारी||
श्रावणात शिवस्तुतीद्वारे शिवाराधना केली जाते. रूढी-परंपरेनुसार या महिन्यापासून व्रतवैकल्ये सुरू होतात. या महिन्याला पवित्र मास म्हणतात. श्रावणात सोमवार, नागपंचमी, मंगळागौर पूजन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचे व्रत अशी अनेक व्रते केली जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी ‘श्रावण सोमवार’ व्रत केले जाते. श्रावणातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालणे, पूजा करणे, शिवामूठ वाहणे अशाप्रकारे हे व्रत केले जाते.
सोमवारव्यतिरिक्त अन्य व्रते धर्माने सांगितल्याप्रमाणे आणि रूढी-परंपरेनुसार सुरू असतात. अशा या पवित्र महिन्यातील व्रते भक्तिभावाने करून त्या माध्यमातून देवतेचे तत्त्व ग्रहण केले जाते. श्रावण सोमवारी उपवास करून शिवाची विधीवत पूजा करण्याचे महत्त्व ग्रंथ व्रत राज यामधील खालील श्लोकातून केले आहे. याचा अर्थही पुढे दिला आहे.
‘उपोषितः शुचिर्भूत्वा सोमवारे जितेन्द्रियः।
वैदिकैर्लौकिकैर्मन्त्रैर्विधिवत्पूजयेच्छिवम् ।।’
अर्थ : संयम आणि शुचिर्भूतपणा आदी नियमांचे पालन करत सोमवारी उपवास करून वैदिक अथवा लौकिक मंत्राने शिवाची विधीवत पूजा करावी.
शिवाची पूजा कशी करावी
आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी. शिवाचे चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर शिवाचा ‘ॐ नमः शिवाय।’ हा नाममंत्र लिहूनही आपण त्याची पूजा करू शकतो. शिवाची षोडशोपचार पूजा किंवा पंचोपचार पूजा करू शकतो. पूजा करताना शिवाला पांढरे फूल वाहू शकतो. त्रिदल बेल वाहावा. शिवाला अर्ध प्रदक्षिणा घालावी. दिवसभर शिवाचा ‘ॐ नम: शिवाय’ नामजप अधिकाधिक करावा.
शिवामूठ व्रत करण्याची पद्धत
विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते. यात श्रावणातील प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या.
- नंदिनी वाकडे नागपूर, मो. ९६२३६४३६९०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.