Shravan 2022 : हर हर महादेव; तिसऱ्या डोळ्याची संकल्पना काय?

शिवशंकराला बेलपत्रच का वाहतात?
Shravan 2022
Shravan 2022

(Shravan 2022 Mahadev temple Belpatra and third eye concept history)

शिव हा सर्व आहे. तो जसा सुंदर आहे, तसा संहारकही आहे. तो महान संन्यासी अन्‌ गृहस्थ पण आहे. तो सर्वांत अनुशासित आहे, नशीलापण आहे. तो संपूर्ण विश्वाला हादरवेल, असा तांडवमूर्तीही आहे आणि पूर्णरूपाने स्थिरही आहे. देव त्याची पूजा करतात आणि दानवही. प्रत्येक जीव त्याची पूजा करतो. तो सर्वांत भयंकर भैरव आहे. अतिव रागीट आहे आणि जबरदस्त हिंसकही आहे. तसाच तो प्रेमी, करूणामय देवही आहे. शिव हा आदीयोगी आहे. अशा या शिवशंकराच्या पूजेला श्रावण महिन्यात आपल्या परंपरेत अनन्यसाधरण महत्त्‍व आहे. गावोगावी हे होतच असते. जिल्ह्यातील काही महत्त्‍वाच्या शिवसाधनेच्या ठिकाणांची माहिती पहिल्या श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर देत आहोत...

शिवशंकराला बेलपत्रच का वाहतात?

शिवाला आदियोगी म्हटले जाते. भारतीय परंपरेत अनादी काळापासून शिवाची पूजा केली जाते. तशा कोणत्याही पूजेला विविध प्रकारची फुले व पानांचा उपयोग केला जातो. परंतु, शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्राला सर्वाधिक मान आहे. शंकराच्या पिंडीवर बेलपत्र वहावे, असेच सांगितले गेले आहे. भारतीय संस्कृतीत त्याबाबतचे कारण स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, बेलपत्र शंकराला प्रिय आहे, असे म्हणतात. पण, ते तसे नाही. शंकराला चराचरातील सर्वच वस्तू एकसारख्या आहेत. त्याचा अर्थ शिवतत्त्‍वातून निघणाऱ्या स्पंदनांशी जोडला गेलेला आहे. बेलाच्या पानामध्ये शिवतत्त्‍वाच्या स्पंदनांना शोषण्याची सर्वाधिक ताकद आहे.

प्रत्येक जण त्या शक्तीच्या स्पंदनाशी जोडला जाण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी बेलपत्र पिंडीवर अर्पण करायचे आहे. परंतु, ते तेथेच सोडून द्यायचे नाही. पिंडीवर ठेवल्यावर पाने शिवतत्त्‍वाची स्पंदने शोषून घेतात. ती परत आपल्यासोबत घ्यायची आणि छातीजवळच्या खिशात ठेवायची. याचा देवाशी संबंध नाही. ते तत्त्‍व आणि आपल्यात संबंध बनविण्‍याशी आहे. तुम्ही आजमावून पाहा. आपल्या शारीरिक व मानसिक अवस्थेत नक्कीच बदल जाणवेल, असेही अभ्यासक म्हणतात.

तिसऱ्या डोळ्याची संकल्पना काय?

शंकराला तिसरा डोळा आहे, असे परंपरेने आपल्याला सांगण्यात आले आहे. सर्वच स्तरातील व्यक्तींना ही गोष्ट माहीत आहे. त्याबाबतची शंकराने तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केल्याची कथाही सर्वांनी कधी ना कधी ऐकलेली आहे. परंतु, या तिसऱ्या डोळ्यामागचे नेमकी आध्यात्‍मिक भूमिका अनेकांनी स्पष्ट केलेली आहे. तीन डोळे म्हणजे दोन डोळे बाहेरचे भौतिक जग पाहण्यासाठी तर, तिसरा डोळा स्वत:चे अंतरंग पाहण्यासाठी आहे, असे म्हणतात. कामदेव म्हणजे प्रेम व वासनेची देवता मानली जाते. वासनेचा संबंध फक्त विरुद्ध लिंगाशी संबंधित नाही. आपल्या शरीरात काही तत्त्‍वे आहेत, जी आपल्याला अपूर्णतेची अनुभूती देतात.

त्यामुळे ती तत्त्‍वे आपल्याला कोणत्या तरी वस्तू किंवा व्यक्तीच्या मागे जायला भाग पाडतात. शॉपिंगची आस, संपत्तीची लालसा हेही वासनेतच येते. एखादी वस्तू किंवा व्यक्ती मिळाल्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण आहे, ही भावना म्हणजेच वासना. शिवशंकराने आपल्या अंतरंगातील ही वासना तिसऱ्या डोळ्याने जाळून खाक केली. स्वत:च्या अंतरातील काम जाळला. त्यामुळे प्रत्येकाने त्रिनेत्री असायला पाहिजे. काम जाळला तरच आपण सत्त्व‍ जाणू शकतो, जगू शकतो, असा त्याचा आशय आहे.

शिवतत्त्व आणि आपले जीवन...

सर्व शक्‍तिमान व सर्वज्ञ समजल्या जाणाऱ्या शंकराच्या प्रत्येक कृती व तत्त्‍वासंबंधी कारणमीमांसा भारतीय संस्कृतीने केलेली आहे. त्याबाबतच्या आख्यायिकांतून सर्वसामान्यांमध्ये काही वेगळे अर्थ आहे किंवा त्या केवळ कथा समजल्या जातात. या दोन उदाहरणांमध्ये शिवासंबंधीच्या संकल्पना मानवी जीवनात कशा पद्धतीने आचरणात आणल्या गेल्या पाहिजेत, याबाबतच्या भूमिका मांडलेल्या आहेत. तशा काही अध्यात्म व विज्ञानाशी सांगड घालणाऱ्या संकल्पनांच्‍या भूमिकांची माहिती किंवा अनुभूती आपल्याला असल्यास आम्हाला ९६०४५८५७९२ या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर कळवाव्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com