Shravan 2022 : नागपंचमी, मंगळागौर अशा पाच सणांचं महत्त्व तुम्हाला माहितीये का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shravan 2022 nag panchami mangala gauri vrat puja pola significance benefits

श्रावणात सृजनाचा उत्सव चालू होतो. निष्पर्ण झालेले वृक्ष, लता वेली झाडं झुडपं ,भेगाळलेली कोरडी शेतजमीन ,पाण्याविना ओस पडलेले तलाव व पाणवठे,ओढे या सृजनाच्या उत्सवात न्हाऊन निघतात ,एक नवचैतन्याची लहर निसर्गात दौडते

Shravan 2022 : नागपंचमी, मंगळागौर अशा पाच सणांचं महत्त्व तुम्हाला माहितीये का?

- डॉ. नयना कासखेडीकर

‘विदर्भात उष्णटेची लाट’, ‘अमुक गावाला टॅंकरद्वारा पाणीपुरवठा’, ‘धरणात पाणीसाठा कमी’ उन्हाळ्यात रोज माध्यमातून येणार्‍या अशा बातम्या, तर, वीज महामंडळाचा वीजकपातीचा आदेश आपला ताण अधिकच वाढवतात. उद्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा जाहीर होतो आणि आधल्याच दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज खरा होत जोरदार बरसू लागतो तो. यंदा असच झालं. बरस रे घना असं म्हणण्याची वेळ आली नाही. कधी एकदा हा ऋतु संपतोय असं होता होता, आकाशात काळे मेघ जमतात ज्याची आपण आतुरतेने वाट पहात असतो. कवी कल्पनेतला पाऊस शब्दातून कधीच बरसून गेलेला असतो. म्हणजे आकाशात आलेल्या ढगांचा मोरांना झालेला आनंद बघून ढग सुद्धा गहिवरतात आणि बरसायला सुरुवात करतात म्हणे. अशोकजी परांजपे यांच्या कवितेचं असच तर भावगाणं होतं, बागेश्री रागातलं.

केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर,

गहिवरला मेघ नभी .सोडला गं धीर ||

मोर तर एक पक्षी. त्याला सुद्धा आनंद होतो, मग आपण तर माणूस. आपल्या भाव-भावना अजूनच तीव्र असतात. अशा प्रकारे आषाढाला निरोप देत श्रावण अवतरतो. हिंदू पंचांगानुसार या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो.

(Shravan vrat) श्रावणात सृजनाचा उत्सव चालू होतो. निष्पर्ण झालेले वृक्ष, लता वेली झाडं झुडपं ,भेगाळलेली कोरडी शेतजमीन ,पाण्याविना ओस पडलेले तलाव व पाणवठे,ओढे या सृजनाच्या उत्सवात न्हाऊन निघतात ,एक नवचैतन्याची लहर निसर्गात दौडते . पाहिल्याच पावसाने निसर्ग शुचिर्भूत होतो. सगळी धूळ झटकून झाडं नव्या पालवी सहित चकचकीत आणि टवटवीत दिसू लागतात.उन्हाच्या काहिलीने झालेली मरगळ दूर होते. पहिला जोरात पाऊस येतो, तोपर्यंत कावळ्याची पिल्लं मोठी झालेली असतात. आषाढातच त्यांनी घरटी बांधून अंडी घातलेली असतात.श्रावण सुरू होतो त्या आधीच कावळ्याच्या पिल्लांचे नवे जीवन सुरू झालेले असते.(माझ्या घरासमोरच्या वडाच्या झाडावरील वर्षानुवर्षे घेतलेला अनुभव) निसर्ग जसा आनंदाने बहरतो तसंच मानवी मन सुद्धा या ऋतु परिवर्तनाने आनंदाने बहरते.साहित्यिक आणि कवींना या मनभावन श्रावणाचा मोह होणार नाही असे कसे? म्हणून तर पाऊस आणि श्रावण याची अनेक वर्णने साहित्यात दिसतात.

शेतकरी दादा शेतं तयार करून चातकासारखी वाट पाहताच असतात पावसाची.आषाढवारीला गेलेल्या शेतकर्‍यांनी /वारकर्‍यांनी पंढरीच्या पांडुरंगाला भेटून, ‘चांगला पाऊस पाड बाबा’ असं साकडं घातलेलं च असतं. सगळ्या चराचर जीवसृष्टीला, माणसांना, पक्षांना, प्राण्यांना आनंददायी असलेला, मनभावन निसर्ग असतो, या महिन्यात निसर्गात फुलणारी फुले, देवपूजेची चाललेली लगबग सगळं सगळं उत्साह देणारं. याच महिन्यात असलेली व्रतवैकल्ये धर्माची जोड देऊन जरी साजरे करत असले तरी त्याचा संबंध सात्विकतेशी, ऋतुचक्राशी आणि जीवन शैलीशी असलेला दिसतो.आपल्या आरोग्यासाठी चातुर्मासाच्या निमित्त आणि सणाच्या निमित्ताने का होईना योग्य आहार विहार ,सद्धर्म पाळणे, व्रतस्थ राहणे आणि अनुशासन पाळणे या गोष्टी माणसांकडून केल्या जात आहेत.मनुष्याला एक शिस्तीची चौकट आखून द्यावी लागते कोणीतरी (कर्मकांड नव्हे) मग सद्भावना, सदहेतू आणि सत्कार्य हातून घडतं.

श्रावण महिन्यात (Shravan Month 2022) बहुतेक प्रत्येक दिवशी एकतरी धर्मकृत्य केलं जातं. जसे सोमवारी एकभुक्त किंवा नक्त राहायचे, मंगळवारी मंगळागौरीची पूजा,बुधबृहस्पती पूजन, गुरुवारी गुरुचरित्र पठन, शुक्रवारी लक्ष्मीची पूजा शनिवार मारूतीरायाचा तर रविवार सूर्य पूजेचा. शिवाय देवस्थानात वेगवेगळे कथापुराणं, मंत्रजागर असे विशेष उत्सव होतात. अगदी श्रावणी सोमवार सुद्धा एक सण म्हणून साजरा होतो. श्रावण हा महिना चातुर्मासातला श्रेष्ठ महिना मानला जातो. नुसतं महाराष्ट्रात नाही तर इतर भागातही या महिन्यात विविध उत्सव असतात.

उत्तरेत झुलान यात्रा, रक्षाबंधन, नंदोत्सव आणि जन्माष्टमी आणि विशेषता दक्षिण भागात श्रावणात नागपंचमी, मंगळागौर, श्रावणी पोवती पौर्णिमा, नारळी पौर्णिमा श्रीकृष्ष्ण जन्माष्टमी, पिठोरी अमावास्या इत्यादी उत्सव साजरे केले जातात.

श्रावण सुरू होताच ठेवणीतून बाहेर येतो जिवतीचा फोटो. घरातली आई आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या कल्याणसाठी, देव्हार्‍यात तो स्थानापन्न करून त्याला फूल पत्री, वस्त्र वाहून नैवेद्य दाखवते. श्रद्धावान लोक असे धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्रावणात आणि चातुर्मासात करत असतात आणि आत्मिक समाधान मिळवतात.आणखी एक म्हणजे श्रावण महिना कहाण्यांचा सुद्धा उत्सव च नाही का? मला आठवतं, लहानपणी आजीची पुजा-अर्चा झाली की, श्रावणात रोज तिला कहाणी वाचून दाखवायची. आणि ती अगदी तल्लीन होऊन ,दाद देत या कहाण्या ऐकत असे. शुक्रवारची कहाणी. खुलभर दुधाची आणि अजून काही. वर्षानुवर्षे वाचलेल्या, माहिती असलेल्या त्याच त्याच कहाण्या आजी प्रत्येक वेळी मन लावून ऐकायची, त्यात खरं तर काही नावीन्य नसे, पण मनातली श्रद्धा हेच एकमेव कारण, अशीच गोष्ट नागपंचमीची. रूढी प्रमाणे चालत आलेली, आज तवा चुलीवर ठेवत नाहीत. किंवा भाजी चिरत नाहीत. असे परंपरेने संगितले गेलेले. नागपंचमीच्याच कहाणीत त्याचे उत्तर दडलेले आहे. कारण या कहाण्या अर्थात गोष्टी, या प्रबोधनासाठीच रचल्या गेल्या आहेत हे डोळसपणे वाचले की लक्षात येईल.

(2022 Nag Panchami Puja) नागपंचमी हिंदुस्थानच्या सर्व भागात साजरा होणारा सर्प पूजेचा हा सण आहे. महाराष्ट्र, दक्षिण भाग, गुजरात, बंगाल सगळीकडे सर्प पुजा किंवा नागप्रतिमांची पुजा करतात. नागांचा अधिपति राखेश्वर म्हणजे शिव समजून डोंगराळ प्रदेशात पंचमीला पुजा केली जाते. उदयपूरला या दिवशी घराच्या दाराशी एक प्रकारची वनस्पति आणून ठेवतात म्हणजे विषारी प्राणी घरात येत नाहीत. तर नेपाळ मध्ये नाग आणि गरुड यांच्यात मोठ्ठ युद्ध झालं, तो हा दिवस विशेष उत्सव साजरा करतात. आगरा, अयोध्या, पंजाब, गढवाल मधेही सर्पपूजेची पद्धत आहे. हे सांगण्याचं कारण एव्हढच की, परमेश्वराच्या अतर्क्य शक्तीबद्दल मनुष्याला आश्चर्य वाटले त्यामुळे त्याची सेवा करणे म्हणजे त्यांनेच निर्माण केलेले सर्व प्राणी, झाडे यांची पुजा करणे महत्वाचे वाटले असावे. म्हणून नागपंचमी सारखे सण सुरू झाले असणार.

मध्यंतरी मी मेळघाटात गेले होते. तिथे रस्त्याने जाताना कडेला छोटसं एक फुटाचं दगडाचं मंदिर होतं. त्यात एक दगडच विराजमान झाला होता. वर लिहिलं होतं, ||बाघ देव प्रसन्न || चौकशी केली तेंव्हा कळलं. की या जंगलात हे प्राणी वास्तव्यास असल्याने तो शक्तीशाली व आपला संरक्षणकर्ता आहे अशी तिथल्या आदिवासींची समजूत आहे. म्हणून या रस्त्याने जाताना आधी या बाघ देवाला नमस्कार करतात. म्हणजे खर तर दोघेही एकमेकांचं रक्षण करतात. अशा अनेक समजुती वेगवेगळे दिवस व सण साजरे करताना पाळत असलेले दिसतात.

(Mangla Gauri puja) मंगळागौर पूजन महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नवविवाहितेने लग्नानंतर पाच वर्षे करायचे हे व्रत. बंगाल मध्येही मंगलचंडिका म्हणून या सौभाग्यदायिनी देवीची पुजा करण्याचा प्रघात आहे. नागपंचमी, मंगळागौर, गौरी गणपती, राखी पौर्णिमा या निमित्ताने त्या मुलीला माहेरच्या लोकांना भेटण्याची संधी दिली जायची, म्हणूनच,

‘फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे...,

पंचमीचा सण आला डोळे का ग ओले ?’

ज्येष्ठ भावगीत गायक गजानन वाटवे यांनी गायलेल्या गदिमांच्या या गीतातील मुलींच्या डोळ्यात पाणी येते कारण ते वातावरण त्यांना ओढ लावते. नागपंचमीला फेर धरून गाणी म्हणणे, झिम्मा- फुगड्या, आट्या- पाट्या खेळणे, याबरोबरच यातील गाण्यांमधून काही पौराणिक कथा की ज्यातून जीवनमूल्ये शिकवली जातील, अशा कथांचं कथन होई. हीच मूल्ये तिला पुढच्या आयुष्यात स्वत:साठी उपयोगी पडत. कल्पनाशक्तीला वाव मिळे.

नारळीपोर्णिमा (Narali Purnima 2022) – शास्त्रा प्रमाणे वरुण देवतेची पुजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नारळी पोर्णिमा. हिंदुस्थानच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावर असलेले लोक विशेषत: व्यापारी वर्गाला याचे जास्त महत्व. प्राचीन काळी ते जलमार्गाने प्रवास करीत असत आणि व्यापार आणि दळणवळण पण चालत असे. समुद्र हे वरूणाचे स्थान समजले जाते. समारंभ पूर्वक समुद्राचे दर्शन घेऊन त्यास नारळ अर्पण करून समुद्रावर सत्ता गाजविणार्‍या वरुण देवाची आठवण ठेवणे व कृतज्ञता व्यक्त करणे असा उद्देश असतो. वर्षा ऋतुत हा समुद्र क्षुब्ध झालेला असतो. शिवाय हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे या काळात मासेमारी करायला कोली बांधव जात नाहीत. श्रवण पौर्णिमेला सागर पूजन झाले की मासेमारी सुरू होते. श्रावण पौर्णीमेपासून जलमार्गावर वाहतूक सुरू होते. असा हा समुद्र पूजनाचा दिवस.ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.

हाच दिवस वैदिक धर्म पाळणार्‍यांसाठी श्रावणी म्हणून पाळला जातो. या तिथीला जानवे बदलायचा विधी सांगितला आहे. तर गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचा हा पहिला दिवस असतो.

कृष्ण जन्माष्टमी (Sri Krishna Janmashtami 2022) - याच महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी असते. श्रवणात वद्य अष्टमीला रात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. तो दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करतात.सबंध हिंदुस्थानात गोकुळ,मथुरा वृंदावन, द्वारका, पुरी, इथे हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार आहे असे समजले जाते. पिठोरी अमावास्या- पोळा- श्रावण अमावास्येला बैल पोळा साजरा करतात. शेतकरी लोक आपल्या खिलार्‍या बैलांना रंगवून, सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढतात, पुजा करतात, गोडधोड करून त्यांना खाऊ घालतात. आपल्या उपयुक्त व वर्षभर आपल्यासाठी राबणार्‍या या गुरांबद्दल आदरभाव दाखविण्याचा हा दिवस. बहिणाबाई चौधरी यांनी बैल पोया या कवितेत याचं महत्त्व सांगितलं आहे. त्या म्हणतात,

आला आला शेतकर्‍या, पोयाचा रे सन मोठा,

आता बांधा रे तोरन, सजवा रे घरदार |

करा अंघोयी बैलाच्या, लावा शिंगाले शेंदूर,

उठा उठा बहिनाई, चुले पेटवा पेटवा |

आज बैलाले निवद, पुरणाच्या पोया ठेवा,

वढे नांगर वखार, नही कष्टाले गनती |

पीक शेतकर्‍या हाती, याच्या जिवावर शेती ||

पावसाळा हा ऋतु नाही म्हटलं तरी आरोग्य बिघडवणारा असतो काही वेळा. या कालावधीत पचनशक्ति मंदावते. पावसामुळे बाहेरचे वातावरण आरोग्याला हानिकारक व रोगराईला पोषक असते. अशुद्ध व गढूळ पाणी वापरात येते. साहजिकच सर्दी, ताप, खोकला, पोट बिघडणे हे आजार उद्भवतात. त्यामुळे पचायला हलका आणि साधा आहार घ्यायला लागतो. यालाच आपल्या पूर्वजांनी धार्मिक जोड देऊन एकभुक्तं राहणं, उपवास करणं, एक धान्य खाण यासाठी नेम धर्म आखून दिले त्याचा शास्त्रीय फायदा व अर्थ लक्षात घेतला तर कसे ऊपयोगाचेच आहेत हे लक्षात येईल.

कुठल्याही गोष्टींचा धार्मिक संबंध लावताना तो डोळसपणे बघावा. अंधश्रद्धेने नको. आजची नवी पिढी चौकस आहे. तिला प्रत्येक गोष्टीचा शास्त्रीय आधार हवा आहे आणि हा शास्त्रीय आधार हिंदू धर्मात आहे. पालकांनी/मोठ्यांनी तो अभ्यासला पाहिजे. परंपरेने चालत आलेल्या रूढी आहेत त्या तशाच्या तशा नवी पिढी स्वीकारणार नाहीत. त्यामुळे नवा अर्थ देऊन, पण पहिलेच महत्व कायम ठेऊन त्यांच्या पर्यन्त तो पोहोचवण्याची जबाबदारी आजच्या पालकांवरती आहे.

ऋतुचक्र आणि आपले हे उत्सव, व्रत वैकल्ये एकमेकांशी निगडीत आहेत. आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यन्त पाळला जाणारा चातुर्मास. नियम पाळणे, धार्मिक पुजा-पाठ, पारायण करणे, उपासना करणे या बरोबरच उपवास धरणे. यात आपल्या दिनचर्येची ऋतूंशी सांगड घातलेली दिसते. आणि ओघानेच आपल्या आरोग्याशी पण. खर तर ही आपल्या ऋषीमुनींची आपल्याला देणगीच आहे. त्याची नीट व्यवहार्यता, उद्देश, त्यातलं वैद्यक शास्त्र हे पण आपण समजून घेतले पाहिजे. आपले उत्सव, जत्रा, सण, समारंभ, प्रवचने, कथा, कीर्तने यातून आपली कायिक, वाचिक आणि मानसिक प्रगती व्हावी हाच उद्देश आहे. म्हणूनच परंपरा पाळताना समजून उमजून पाळाव्यात. तर असा हा इंद्रधनु ल्यायलेला ,ऋतु हिरवा ऋतु बरवा, मनभावन श्रावण साजरा करायला तयार रहा सगळे.

Web Title: Shravan 2022 Nag Panchami Mangala Gauri Vrat Puja Pola Significance Benefits

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..