Shravan 2022 : तपस्व्यांची तपोभूमी तपोवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shravan month 2022

Shravan 2022 : तपस्व्यांची तपोभूमी तपोवन

मालेगाव - प्रभु श्रीरामचंद्राच्या वास्तव्याने व तपस्व्यांच्या तपामुळे पावन झालेली तपोभूमी तपोवन मालेगाव तालुक्यातील पांगरिनवघरे जवळ आहे. येथे श्रीतापेश्वराचे मंदिर आहे पुरातन काळात हा परिसर दंडकारण्याचा भाग होता. इथे ऋषीमुनींनी तपस्या केली. त्यांनी तप केले म्हणून या परिसराला तपोवन हे नाव पडले. प्रभु श्रीरामचंद्र दंडकारण्यात असताना इथे आले होते. त्यांनी इथे वास्तव्य केले होते. सीतामातेने स्नान केलेले स्नानगृह इथे आहे.

मंदिराचे गर्भगृह उत्तराभिमुख आहे. मंदिरात श्रीतापेश्वराचे शिवलिंग आहे. मंदिरासमोरील सभामंडपामध्ये नंदीची मुर्ती आहे. मंदिरालगत बाराही महिने पाणी असलेली विहीर (बाराव) आहे. मंदिर परिसराला पूर्व व उत्तर दिशेला दरवाजे आहेत. मंदिराच्या ईशान्येस छोटी नदी (नाला ) वाहते.

मंदिर परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याची गरज आहे. येथील परकोटाची दुरुस्ती करून वर्तुळाकार छत असलेला सभामंडप बांधण्याची गरज आहे. त्यामुळे भाविकांची सोय होईल. सोमवारी व श्रावण महिन्यात इथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी संस्थानवर मोठी यात्रा भरते.

भिंतीची व छताची दुरुस्ती करण्याची गरज

संस्थानच्या भिंतीची व छताची दुरुस्ती करण्याची गरज आहे .पर्यटनाच्या दृष्टीने परिसर विकसित केला पाहिजे. मंदिरालगतचा परिसर वन पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत आहे, ही समाधानाची बाब आहे, असे सुनील सुडके म्हणाले.