Shravan 2022 : मनभावन श्रावण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shravan month 2022

Shravan 2022 : मनभावन श्रावण

सण, व्रतवैकल्यांचा महिना म्हणजे श्रावण. या महिन्याला पवित्र मास मानले जाते. आषाढात बरसलेल्या सरींवर सरींमुळे निसर्गाने मस्तपैकी हिरवी शाल पांघरलेली असते. जिकडेतिकडे प्रसन्न वातावरण आणि सोबत सण, समारंभाची रेलचेल. प्रत्येक वर्गासाठी या महिन्यात उत्साहाची लयलूट असते.

श्रावणात शिवआराधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर सोमवारी शिव मंदिरात भाविक, भक्तांची रेलचेल असते. आपापल्या परीने प्रत्येक जण महादेवाची आराधना करतो. दानधर्माला या महिन्यात विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला लेक माहेरी येते. माहेरच्या मंडळींसोबत गप्पांमध्ये रमत ती सासर विसरते. नागपंचमीच्या दिवशी गावातील मैत्रिणींसोबत वारूळाजवळ जाऊन नागराजाची पूजा करते. कारण नागराजाला ती आपला भाऊ मानते. घरी आल्यानंतर बहीण, भावंडांसोबत मौजमजा, गंमतीजमतीचे खेळ खेळते. गावातील सख्या, सोबतींसोबत झुला झुलते. मग पुढच्या आठवड्यात ती पुन्हा सासरी जाते.

श्रावण महिना सर्वांना आनंद देणारा महिना आहे. या महिन्यात बळीराजा शेतात धान रोवणीला सुरुवात करतो. रोवणी करणाऱ्या मजूर भगिनी श्रावणाची लोकगीते गातात. त्यांच्या गाण्यांमुळे संपूर्ण शेत गजबजून जाते. सरीवर सरी घेऊन येणारा पाऊस बरेच काही घेऊन येते व खूप काही देऊन जातो. त्याच्या येण्याने प्रत्येकाच्या मनात आनंद, उत्साह असतो. जिकडे, तिकडे हिरवेगार रान दिसते तर कुठे नदी, नाल्यांना आलेला पूर बघायला मोठी गर्दी होते. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांची सावली जेव्हा त्या वाहत्या पाण्यात पडते ते बघून एखाद्या कवीला नवनव्या कल्पना सूचतात. मग तो आपल्या कल्पनाशक्तीने ते सुंदर दृश्य बघून काव्यरचनेला सुरुवात करतो.

खरोखर निसर्गाचे किती उपकार आहेत आपल्यावर. हिरव्यागार गवतामध्ये एखादी फुलराणी फुललेली बघून तिला बघताच छोटासा पिवळ्या रंगाचे फुलपाखरू जेव्हा तिच्या वरून उडत जाते, त्यावेळी खरेच हेवा वाटतो. श्रावणात एखाद्याच दिवशी रविराजाचे दर्शन होते.

त्याच्या किरणांनी हिरव्यागार गवतावर पडलेले दवबिंदू जेव्हा हिऱ्यासारखे चमकतात तेव्हा मन आनंदून जाते. बहीण, भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन घरोघरी आनंद, उत्साहाची लहर घेऊन येतो. गोकुळाष्टमीत राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील चिमुकले लक्ष वेधून घेतात. अनेक गोविंदांचे मनोरे व दहीहंडी उत्सव बघून आनंद गगनात मावेनासा होतो.

वर्षभर शेतकऱ्याची साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सोहळा म्हणजे पोळा. बळीराजाचे त्याच्या सर्जा-राजावर असलेले प्रेम, आपुलकी शब्दात वर्णन करता येत नाही. लाडक्या सहकाऱ्याला पुरणपोळीचा नैवेद्य भरवून त्याचे पांग फेडण्याचा प्रयत्न बळीराजा करतो. या सोहळ्याने श्रावणाची सांगता होते.

- संगीता संतोष ठलाल मो. ७८२१८१६४८५

Web Title: Shravan Month Hindu Religions Festivals And Fasts 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :FastFestivalsSharavan