
डॉ. मृणालिनी जमदग्नी :
श्रवण नक्षत्रावरून मराठीतील पाचव्या महिन्याला श्रावण हे नाव पडल्याचे सांगितले जाते. श्रावण पौर्णिमेला हे नक्षत्र असते. त्यात आकाशात तीन तारे असतात. त्यातला एक मुख्य तारा श्रवण अर्थात श्रावण बाळ आणि दुसरे तारे म्हणजे त्याचे आई बाबा असे मानले जाते. श्रवण म्हणजे ऐकण्याचे इंद्रिय अर्थात कान! कान या अवयवाकडून ज्ञानाच्या मोक्षमुक्ती आणि जीवन उन्नयनाच्या गोष्टी(श्रुती) ऐकणे. याअर्थी श्रावण महिन्यात कथा, पुराण, भजन कीर्तन, पारायण अशा आध्यात्मिक ज्ञानाचे श्रवण केले जाते.
श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवमूठ वाहली जाते. आता दुसऱ्या श्रावणी सोमवारी शंकराला तिळाची शिवामूठ वाहायची आहे. चला तर या विषयी सविस्तर जाणून घेऊया.
शंकराला पांढरा रंग प्रिय म्हणून पांढरी साडी नेसून पूजेचे तबक घेऊन सुवासिनींची पावले शिवालयाकडे वळू लागतात. पूर्वीच्या काळी घरकामातून नववधूला फुरसदीचे चार क्षण घालवायला शिवामूठ ही संधीच असायची. आनंदी मनाने शिवालयातील पिंडीवर इवल्या इवल्या शुभ्र तिळाची मूठ अलगद सोडायची आणि पुन्हा शीव मंत्र ओठी यायचा.
"नम: शिवाय शान्ताय पंच वक्त्राय शूलिने।
शृंगि भृंगि महाकाल गणयुक्ताय संभवे ॥"
तिळाचे महत्त्व
दुसरी शिवामूठ तिळाची का असा प्रश्न कदाचित पूर्वी मनात येत असेल की नाही माहीत नाही. कारण वडीलधारी सांगतील ते मनापासून करायचे हा संस्कार नकळतच मनावर रुजत असे. मात्र नव्या युगातील स्त्री आता परंपरा, रीति याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पारख करते. या प्रथांशी असलेला तिळमात्र संबंध ही मग लाख मोलाचा वाटू लागतो.
तीळ म्हणजे मूळ भारतातील तेलवर्गीय वनस्पती. याची फुले पाने शेंगा लहानसर. अगदी निकस रेताड जमिनीत दुष्काळग्रस्त भागात कमी पाण्यावर येणाऱ्या या पिकाचे तैलयुक्त गुणधर्म मात्र खास आहेत. देव कार्यात नंदादीप, समई, पणती यातील शांत, सौम्य प्रकाशासाठी तिळाच्या तेलाला प्राधान्य दिले जाते. याने वातीला काजळी धरत नाही. धार्मिक कार्यात विशेषत: श्राद्धपक्ष कार्यात काळे तीळ वापरले जातात.
आयुर्वेदात तीळ तेलाचा उपयोग वात विकार, सांधेदुखी, स्थूलता कमी करण्यासाठी, स्मरणशक्ती, दृष्टी सुधारण्यासाठी, केशवर्धनासाठी महत्त्वपूर्ण मानले आहे. ‘ब’ जीवनसत्त्व, फायबर, आयर्न, कॅल्शिअम याने युक्त तीळ स्वयंपाकात आवर्जून वापरतात. आपल्याकडे थंडीच्या दिवसात भोगीला तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि तिळकूट, मिक्स भाजीत टाकलेले आख्खे तीळ, संक्रांतीला तिळाचे लाडू आणि तीळ घालून केलेली गुळाची पोळी, हे सर्व आरोग्याशी निगडित आहे. संस्कृतमध्ये तेलाला स्नेह हा शब्द आहे.
स्नेह याचा अर्थ प्रेम, जिव्हाळा, जवळिक साधणे. शरीर आणि मन जोडणारे हे तिळधान्य शिवामूठ म्हणून वाहताना हा स्नेहभावच आपण शंकराला अर्पण करीत असतो. समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेले विष शंकराने प्राशन केले आणि मनुष्य जिवाचा धोका टाळला. त्याचे हे ऋण फेडण्यासाठी श्रावण सोमवारी ही तिळाची स्नेहयुक्त शिवामूठ प्रतीक रुपाने वाहिली जाते. प्रपंचातील अडचणींना स्नेह भावाने सामोरे जायचे हाच तर संदेश या दुसऱ्या तिळाच्या शिवामुठीत दडलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.