
कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गुरूला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पशुपक्ष्यांचे जे उपजत गुण असतात, त्यात बदल करता येत नाही.
Guru Pornima : ज्ञानरूपी वसा देणारा गुरू...!
- श्री काडसिद्धेश्वर स्वामी, मठाधिपती, सिद्धगिरी मठ, कणेरी, जि. कोल्हापूर
कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गुरूला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पशुपक्ष्यांचे जे उपजत गुण असतात, त्यात बदल करता येत नाही. मात्र मनुष्य प्राण्याचे तसे नाही. मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरचा गुरू हा वेगळा असतो आणि प्रत्येक टप्प्यावरच्या गुरूलाही वेगळे स्थान असते.
आई-वडिलांना प्रथम गुरू मानले जाते. शिक्षण देणारा शिक्षकही गुरुस्थानी असतो. गुरूचे स्थान इथेच संपत नाही. संसार चांगला राहण्यासाठी मार्गदर्शन करणारा गुरू, व्यवसायातील अडीअडचणी सोडवणारा गुरू, सन्मार्ग दाखवणारा गुरू हा ही वेगवेगळा असू शकतो. यानंतरचा गुरू म्हणजे जे जे तुमच्यामध्ये वाईट आहे ते ते काढून टाकण्याचे ज्ञान देणारा. माझ्या मते या गुरूचे स्थान महत्त्वाचे आहे. माणसाच्या मनामध्ये लोभ, मत्सर व अन्य सुखाच्या भावना सातत्याने येत असतात. या भावनांमुळे मनुष्यप्राणी स्वतःचे मोठे नुकसान करू शकतो. त्याचे जीवन अंधकारमय बनू शकते. यातून बाहेर काढण्यासाठी त्याला तत्त्वज्ञानी गुरूची मोठी गरज असते. तुमच्यामध्ये जे जे वाईट आहे ते बाहेर काढण्याचे मोठे आव्हान हा गुरू स्वीकारत असतो. नको त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून बाजूला काढल्या की जीवनाचा खरा अर्थ कळतो. शिष्याप्रती अशी भावना असणारा गुरू हा महत्त्वाचा ठरतो.
गुरुमाहात्म्य
अलीकडच्या काळामध्ये गुरू निवडतानाही खूप चिकित्सकपणे निवडावा लागतो. ज्याला प्रथमदर्शनी बघितल्यानंतर आपलं मस्तक आदराने झुकवावं वाटतो त्याला गुरू मानावा. ‘आपणास जितके ठावे तितके दुसऱ्याशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन’ या उक्तीप्रमाणे काम करणारा गुरू हा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा बनतो. व्यवहार लौकिक किंवा आध्यात्मिक असतील हे ज्ञान माहिती करून देणाराच खरा गुरू असतो. आचरण संपन्न असतो तो खरा गुरू. शिष्याची चंचलता दूर करणारा गुरू हा पूजनीय बनतो. माया मोहापासून तो गुरू मुक्त असावा. आणि तो निःस्वार्थी असावा. असा गुरूच दुसऱ्यांचे भले करू शकतो. गुरू परोपकारी असावा. कोणीही गुरू होऊ शकतो. त्याच्याकडून आपण नवीन गोष्टी शिकतो तो गुरूच मानला पाहिजे. मग तो मित्र असेल आई-वडील असतील पती-पत्नी असेल. मुले ही असू शकतील. पुराण काळात पाहिल्यास दत्तात्रेयांनीही किड्या-मुंग्यांना गुरू मानले. आणि त्यांच्याकडून ते शिकत गेले यामुळे गुरू कोण असावे अशी कुठलीही संज्ञा महत्त्वाची नाही. ज्यांच्याकडून जो चांगला गुण घेतला तो त्यांचा गुरू अशी व्याख्या करता येईल. सजीव गोष्टीच आपल्याला शिकवतात असे नाही, निर्जीव गोष्टींकडूनही आपण खूप काही शिकू शकतो.
पैसा हा परमेश्वर नाही, तो साध्य नाही, साधन आहे हे सर्वप्रथम गृहीत धरले पाहिजे. पैसा हे सुख नव्हे, परंतु सुख मिळवण्याचे हे साधन आहे. पैशालाच साध्य असे समजून सध्या अनेकांचे मार्गक्रमण सुरू आहे. पैसा मिळवणे म्हणजे हेच माझे आयुष्याचे ध्येय ही संकल्पना चुकीची आहे. जे मिळवायचे आहे ते सर्वांचं हित करून मिळवा. कुणाचं अहित होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. अलीकडच्या पिढीमध्ये संयम व संवेदनशीलता कमी होत आहे. प्रत्येकामध्ये संयम व संवेदनशीलता ही असलीच पाहिजे. संवेदनशीलता काढून टाकली तर माणूस व राक्षसांमध्ये काहीच फरक उरणार नाहीय संवेदनशीलता नसेल तर मनुष्याला खूप अडचण येऊ शकते.
अशा प्रकारची शिकवण देणारे गुरू नवीन पिढीसाठी आदर्शवादी ठरू शकतात. नव्या पिढीने गुरू निवडताना काळजीपूर्वकच निवडावेत. गुरू कोणत्याही नात्यातला असला तरी गुरूच्या शिकवणीपासून एक आदर्शवादी जीवन जगता येणे शक्य आहे. गुरू शिष्याचे हे अनोखे नाते संपूर्ण आयुष्याला सुखकारक ठरू शकते. गुरू निवडताना व त्याचा व्यवसाय याचे बंधन नसले तरी जे चांगले आहे ते स्वीकारण्याची कुवत नव्या पिढीमध्ये येणे गरजेचे बनले आहे. संयम व संवेदनशीलता बाळगत गुरूने दिलेल्या आचरणाचे पालन केल्यास जीवन यशस्वी होऊ शकते.
(शब्दांकन - राजकुमार चौगुले)
Web Title: Shri Kadsiddheshwar Swami Writes Guru Pornima
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..