श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचा दक्षिणद्वार सोहळा

पुराचे पाणी मंदिरात शिरणे हा सोहळा
south door ceremony of Srikshetra Nrisimhwadi
south door ceremony of Srikshetra Nrisimhwadi

आपण प्रतिवर्षी पावसाळ्यात महापुराच्या बातम्या वाचत, पाहत असतो. या सर्व गदारोळात श्रीक्षेत्र नृसिंहवाडी तिथे वाहणाऱ्या श्रीकृष्णामाई नदीला पूर येणे, पुराचे पाणी मंदिरात शिरणे आदी गोष्टींबरोबर दक्षिणद्वार सोहळा हा शब्दही आपल्या कानावर पडतो. पुराचे पाणी मंदिरात शिरणे हा सोहळा कसा होऊ शकतो, हा प्रश्‍न आपल्याला पडत असेल. त्या पार्श्‍वभूमीवर काय आहे हा दक्षिणद्वार सोहळा, याचा हा उलगडा.

श्री क्षेत्र नृसिंहवाडीस द्वितीय दत्तावतार श्रीमन्नृसिंहसरस्वतींचे १२ वर्षे वास्तव्य होते. श्रीक्षेत्र गाणगापूरला प्रयाण करताना त्यांनी जगद्‌द्‌धोरासाठी आपल्या अक्षय्य पादुका येथे ठेवल्या. त्यावर एक मंदिर यवनराजाने उभारले. समोरील घाट संत एकनाथ महाराजांनी बांधला. शक्तीपातयोगी श्री गुळवणीमहाराजांनी मंदिराभोवती प्रशस्त मंडप उभारला. हे मंदिर पूर्वाभिमुख असून, देवांच्या पादुकांकडे तोंड केले असता गाभाऱ्यात उजव्या आणि डाव्या बाजूस असलेल्या द्वारांना उत्तरद्वार आणि दक्षिणद्वार म्हणतात. टेंबे स्वामींना पूर्वाश्रमामध्ये श्री नृसिंह सरस्वती दत्तमहाराजांनी याच दक्षिण द्वाराजवळ एके रात्री दर्शन दिले होते, त्यामुळे या द्वाराचे महत्त्व वादातीत आहे. समोर कृष्णामाई उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. या मंदिरात दैनंदिन पूजेव्यतिरिक्त अनेक धार्मिक कार्यक्रम वर्षभर होत असतात.

पर्जन्यकाळात कृष्णामाईचे पाणी चढत-चढत मंदिराजवळ येऊ लागते. जणू काही श्रींच्या दर्शनासाठी कृष्णामाईच येते. या वेळी पाण्यास ओढ असल्याने प्रदक्षिणा मार्गावर मजबूत बांबू आणि दोरांचे कुंपण घालून भक्तांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. पाणी श्रींच्या मंदिराच्या कट्ट्याजवळ पोचू लागताच पुजारीमंडळी गर्भगृहाची तीनही द्वारे उघडून श्रींना (पंचधातूच्या पादुका, फोटो, मुखवटे व इतर चल उपकरणासह) वरच्या बाजूस असलेल्या श्रीमन्नारायणस्वामींच्या (जेथे एरवी श्रींची पालखीतील उत्सवमूर्ती असते) मंदिरात आणून पुढचे सर्व पूजोपचार येथे सुरू ठेवतात.

श्रीमन्नारायणस्वामींच्या मंदिराच्या समान पातळीवर त्यांचे शिष्य काशीकरस्वामी, श्रीरामचंद्रयोगी, मौनीस्वामी, गोपाळस्वामी, टेंबेस्वामी यांचीही मंदिरे आहेत. क्वचितप्रसंगी श्रीकृष्णामाईस त्यांच्याही दर्शनाची ओढ वाटल्यास पाणी आणखी चढून त्याही मंदिरात येऊ लागते. अशा वेळी पुजारी देवांसह सर्व उत्सवमूर्ती आणि पादुका वरीलप्रमाणे पालखीतून गावात ज्या पुजाऱ्याची त्या सप्ताहात सेवा असेल त्याच्या घरी मुक्कामाला नेतात आणि सर्व पूजोपचार त्याच्या घरी केले जातात. एकाच वेळी देव आणि सर्व संन्यासी संतमंडळी गृहस्थाश्रमी पुजाऱ्याच्या घरी येतात. केवढे हे भाग्य!

दक्षिणद्वार सोहळा

इकडे कृष्णामाईचे पाणी चढत-चढत उत्तरद्वार आणि समोरून पादुकांच्या गर्भगृहात शिरते. कृष्णामाई श्रींचे दर्शन घेते आणि ते पाणी पादुकांवरून वाहत दक्षिण द्वारावाटे हळूहळू बाहेर पडू लागते. पाणी आणखी चढल्यावर दक्षिणद्वाराने पाणी जोराने आणि भरपूर प्रमाणात बाहेर पडू लागते. हा क्षण आला, की पुजारीमंडळी भोंगा अथवा घंटा वाजवून दक्षिणद्वार सोहळा सुरू झाल्याचे जाहीर करतात.

एरवी श्रींच्या पादुकांवरील अभिषेकाचे पवित्र जल भाविकांना फक्त तीर्थप्राशन आणि प्रोक्षण यापुरतेच मिळत असल्याने देवांच्या पादुकांवरून धो-धो वाहत येणाऱ्या पाण्यात स्नान करून पवित्र होण्यासाठी लहानथोर भक्तांची एकच लगबग सुरू होते. या पवित्र जलात डुबकी मारून पवित्र होताना भक्तमंडळी आपल्या मनोकामना देवांना सांगतात आणि श्रीमन्नृसिंहसरस्वती दत्तमहाराज, श्रीकृष्णामाईसह कल्पतरू होऊन त्या पूर्ण करतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. अशा तऱ्हेने पावसाळ्यात नदीला पूर येणे या नैसर्गिक घटनेचे रूपांतर भक्तीच्या महापुरात होते हे या दक्षिणद्वार सोहळ्याचे वैशिष्ट्य!

हा सोहळा काही तास सुरू राहतो, मात्र पाणी जास्त चढल्यास संपूर्ण देऊळ पाण्याखाली जाते आणि मग सुरक्षिततेसाठी कोणासही तिथे जाऊ दिले जात नाही. काही वर्षांपूर्वी अगदी परीक्षेचा प्रसंग ओढवला. त्यावेळी मंदिरेच काय, तर संपूर्ण नृसिंहवाडी गाव पाण्याखाली गेले होते; परंतु तरीही धीर न सोडता पुजाऱ्यांनी गावातील सर्वांच उंच इमारतीत राहणाऱ्या पुजाऱ्यांकडे देवांना नेले आणि चारही बाजूंनी पाण्याने वेढले गेले असतानाही एकाकीपणे सर्व पूजोपचार सुरू ठेवले. धन्य ती पुजारीमंडळी!

श्रीकृष्णामाईचा पूर ओसरतानाही अशी स्नानाची संधी पुन्हा मिळते. असा सोहळा प्रत्येक पावसाळ्यात एक-दोनदा तरी होतो. स्नानोत्तर काही भक्तमंडळी ते पाणी तांब्या, बाटलीत भरून तीर्थ म्हणून घरी नेतात.

तुळशीचा काढा

पाणी पूर्ण ओसरल्यावर पुजारीमंडळी सर्व मंदिर स्वच्छ करतात आणि आणखी एक भक्तीसोहळा तिथे सुरू होतो, तो म्हणजे तुळशीच्या काढ्याचा! श्रींच्या पादुका काही तास पाण्यात राहिलेल्या असल्यामुळे देवांना गारठा बाधू नये म्हणून पुजारी मंडळी प्रथम-प्रथम पादुकांना मिरपूड आणि साजूक तूप चोळतात! आपल्या घरी पावसाळ्यात भिजणे झाल्यावर सर्दी होऊ नये म्हणून आपली आई तुळशीचा काढा बनवून रात्री आपल्याला पाजत असे. त्याच भावनेने पुजारीमंडळी देवांना बराच काळ पाहण्यात राहावे लागल्याने त्यांनाही असाच त्रास होऊ नये म्हणून पुढचे सलग सात दिवस विविध प्रकारचे मसाल्याचे पदार्थ वापरून शास्त्रोक्त रीतीने बनवलेला तुळशीचा काढा तयार करून त्याचा नैवेद्य रात्री देवांना अर्पण करतात.

हा काढा लगोलग प्रसाद म्हणून भक्तमंडळींना वाटला जातो. ‘अनंतकोटी ब्रह्मांडनायकाला’ थंडीचा त्रास होईल का? भक्तीसाम्राज्यात मात्र अशा अनेक गोष्टी भक्तांकडून केल्या जातात आणि देवही लडिवाळपणे त्या गोड मानून घेतात. अर्थात, हा काढा बत्ते भरभरून केला जातो हे वेगळे सांगायला नको. हा काढा नुसताच रुचकर नसून, अत्यंत औषधी असल्यामुळे भाविक मंडळी तो प्राशन करून आपल्याबरोबर बाटलीमध्ये घेऊन जातात आणि वर्षभर त्याचा औषधाप्रमाणे उपयोग करतात. हे सर्व विधी श्रीमत्‌ परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ थोरल्या स्वामीमहाराजांनी घालून दिलेल्या पद्धतीने पार पाडले जातात, हे आणखी एक वैशिष्ट्य!

एकंदरीत, श्रीकृष्णामाईचे पाणी उत्तर द्वारातून देवांच्या पादुकांवरून वाहून दक्षिणद्वारावाटे विपुल प्रमाणात बाहेर पडत असताना त्यात स्नान करून पावन होणे याला ‘दक्षिणद्वार सोहळा’ म्हणतात. हा सोहळा अनुभवायचे भाग्य लेखकाला त्यांच्याच कृपेने लाभले असल्याने प्रत्येक सद्‌भक्ताने दत्त महाराजांची प्रार्थना करून एकदा तरी हा सोहळा अनुभवावा हीच प्रामाणिक इच्छा.

(लेखक टाटा मोटर्समधून डिव्हिजन मॅनेजर या पदावरून निवृत्त झाले असून, अनेक विषयांवर लेखन आणि प्रबोधन करतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com