गो-आधारित शेतीतून समृद्धी

शेतीचा मूळ आत्मा गोपालन आहे. कारण शेणखतापासूनच उपयुक्त जिवाणू तयार होतात, जमिनीची सुपीकता वाढत जाते. सेंद्रिय कर्ब वाढविण्यातही यांचे योगदान मोठे आहे.
Agriculture
AgricultureSakal

देशी गोवंशापासून मिळणारे शेण, गोमूत्र या घटकांचा वापर केल्याने जमिनीचा पोत सुधारत जातो. सेंद्रिय घटकांच्या वापराने पीक उत्पादकता खर्च नियंत्रणात आला; तसेच गुणवत्तापूर्ण शेतीमालाला ग्राहकांची मागणी वाढली.

शेतीचा मूळ आत्मा गोपालन आहे. कारण शेणखतापासूनच उपयुक्त जिवाणू तयार होतात, जमिनीची सुपीकता वाढत जाते. सेंद्रिय कर्ब वाढविण्यातही यांचे योगदान मोठे आहे. देशी गोवंशापासून मिळणाऱ्या शेणखतामध्ये मोठ्या प्रमाणात सूक्ष्म आणि मुख्य अन्नद्रव्ये तयार करण्याची क्षमता आहे. मात्र प्रक्रियेविना त्याचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. यासाठी मी अलौकिक खत आणि विद्राव्य स्वरूपात गोसंजीवक, गोकृपा अमृतम तयार करतो. त्याचे चांगले परिणाम जमीन सुपीकता आणि पीक गुणवत्तेमध्ये दिसून आले.

जमीन सुपीकतेसाठी उपयुक्त घटक पिकांच्या अवशेषातून उपलब्ध होतात. निसर्गातच हे निर्माण करण्याची क्षमता असल्याने आपण त्यांचा वापर करण्याचे तंत्र जाणले पाहिजे. या माध्यमातूनच सेंद्रिय कर्ब वाढविणे शक्य होते. त्याकरिता इतर काही विशेष करण्याची गरज नाही. मात्र त्याचा मूळ स्रोत हा देशी गोवंशपालनावरच आहे, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. मी सध्या गावठी गाई, तसेच लाल कंधारी, देवणी आणि गीर गोवंशाचे संवर्धन करत आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी मी अलौकिक खत, गोसंवजीक खत आणि गोकृपा अमृतम माझ्या शेतावरच तयार करतो. यासाठी देशी गाईचे शेण, मूत्र, शेतातील सेंद्रिय घटकांचा जास्‍तीत जास्‍त वापर करतो.

विनाखर्चिक आणि शेती उपयोगी घटकांचे उत्पादन देशी गोवंश संगोपनातून करता येते, त्यामुळे देशी गोवंश संगोपन हे स्वावलंबी शेतीचे प्रतीक आहे. शेण, गोमूत्राच्या माध्यमातून तयार होणारे जीव-जंतू, जिवाणूंच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक पद्धती विकसित करावी लागते. अन्न, पाणी, हवा या प्रत्येक सजीवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्याकरिता शेतात वृक्ष लागवडीचे नियोजन महत्त्वाचे आहे. कारण वाढत्या तापमानामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंवर अनिष्ट परिणाम होतो. त्याकरिता शेतात २०० ते ३०० फुटांवर झाडांच्या रांगा असल्या पाहिजेत. झाडांच्या रांगा पूर्व-पश्‍चिम असाव्यात. उत्तर-दक्षिण दिशेला बेल, पेरू, सीताफळाची लागवड असावी.

गोपालन आणि वृक्ष यांच्यात अभिन्न आणि वैज्ञानिकदृष्ट्या नाते आहे. या माध्यमातून तापमान नियंत्रणासोबतच सजीवांना लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा होतो. जीव-जंतू, जिवाणूंना खाद्यान्न लागते, त्या वेळी गोपालन आणि नैसर्गिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. जिवाणूंच्या खाद्यासाठी आपल्याला तीन प्रकारच्या अवशेषांचा वापर करावा लागतो. पिकातून निघणाऱ्या तणांचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य विकसित करावे लागेल. पिकांचे अवशेष न जाळता ते कुजवून त्यांचा वापर, तसेच हिरवळीचे खत तयार करण्याचे कौशल्य आपल्याकडे असले पाहिजे. या सर्व सेंद्रिय घटकांचा पुरेपूर वापर केल्यानंतर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वेगाने वाढतो. या सगळ्यांचा योग्य पद्धतीने वापर केला तर कीड-रोग नियंत्रणाची गरजच पडत नाही, कारण नैसर्गिक संतुलन तयार होते.

गोपालनामुळे बांधावर वृक्ष लागवडीची संकल्पना पुढे आली. यातूनच पक्ष्यांचा वावर शिवारात वाढला आणि ४० टक्के कीडनियंत्रणाचा उद्देश साधता आला. कीडनियंत्रणाच्या व्यतिरिक्त असंख्य जीव-जंतू शेतीपरिसरात, जमिनीत तयार होतात. सेंद्रिय घटकांच्या वापराने जमीन भुसभुशीत झाली, पावसाचे पाणी जिरू लागले. यामुळे धावणारे पाणी चालणे आणि चालणारे पाणी बसणे शिकते. एवढ्या बाबी एका देशी गोपालनातून शक्य होतात, हे मी प्रत्यक्ष अनुभवत आहे. या पद्धतीने शेती केली तर जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शेती नफ्याची आणि कमी खर्चाची असल्याने आर्थिक संपन्नता येते. परिणामी, व्यक्ती मानसिक ताण-तणावांपासून दूर राहते. हे कारणदेखील शेतकऱ्याचे आरोग्य सुधारण्याला पूरक ठरते.

तयार करा शेतीमालाचा ब्रॅंड...

शेतकरी उत्पादनापुरताच मर्यादित राहतो, त्याची बाजार अवलंबिता आहे. त्यांनी ती कमी केल्यास निश्‍चितच फायदा होणार आहे. ग्राहकांची मागणी वाढावी याकरिता शेतकऱ्यांनी नमुन्यादाखल सेंद्रिय उत्पादनाची गरज पडल्यास फुकटात ब्रॅण्डिंग करावे. मी सुरुवातीला पाचशे कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यांना मी उत्पादित केलेल्या शेतीमालातील पोषक घटकांबाबत सांगितले. त्यांना सॅम्पल दिल्यानंतर त्यापैकी २०० कुटुंबीयांकडून मागणी आली आणि माझ्याकडील तूरडाळ, हळद पावडर हातोहात विकली गेली. अशाप्रकारे स्वतःच्या पातळीवर बाजार साखळी विकसित केल्याने फायद्यात वाढ झाली आहे. मार्केटिंगचे असे पर्यायदेखील शेतीमालाला चांगला दर मिळवून देण्यासाठी पोषक ठरतात. प्रत्येकाने आपापले विक्रीचे मॉडेल विकसित केले तरच निश्‍चितपणे आर्थिक नफा वाढतो, हे मी अनुभवतो आहे.

पीक व्यवस्थापनाचे सूत्र

माझ्या शेतीपद्धतीत खत, फवारणीचे तंत्र हे शेतकऱ्याचे असल्याने पीक उत्पादकता खर्च कमी झाला. परंतु पीक उत्पादकता वाढविण्यासाठी नियोजनाच्या पद्धती शिकता आल्या पाहिजेत. एका पिकानंतर लगेच दुसऱ्या वर्षी तेच पीक पुन्हा घेण्यात येऊ नये. पीक नियोजनाचे हे शास्त्र शिकावे लागेल. मी तुरीमध्ये हिरवळीचे पीक घेतो. या माध्यमातून जमिनीत सेंद्रिय कर्ब विकसित झाला, त्यातून जमिनीची सुपीकता वाढविली. माझ्या शिवारात कापूस, हळदीचे पीक दुसऱ्या वर्षी उत्तम येते. तूर सोडून कोणतेही पीक घेतल्यास त्याची प्रत चांगली आणि उत्पादकता अधिक मिळण्यास मदत होते. व्यवस्थापनाच्या अशा बाजूदेखील अभ्यासून शेतीपद्धतीत स्वीकार केला पाहिजे.

(सुभाष शर्मा : ९४२२८६९६२०)

(शब्दांकन - विनोद इंगोले)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com