Swasthyam 2022 : होलिस्टिक लिव्हिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swasthyam 2022 Holistic Living human health doctor Digestive system cardiovascular system and nervous system

Swasthyam 2022 : आपल्या निरोगी शरीराचे सूत्र तीन मुख्य प्रणालींवर अवलंबून

सध्या आपण ‘हेल्थ’ आणि ‘वेलनेस’ हे शब्द सर्वत्र ऐकत आहोत. चांगले आरोग्य असावे ही गरज माणसाला कायमच होती; परंतु आजकाल जास्त भर द्यावा लागत आहे. जास्त विचारपूर्वक जगावे लागत आहे आणि वेगळे असे प्रयत्न घ्यावे लागत आहेत. ही आजकालच्या धावपळीची, तणावग्रस्त आयुष्याची मोठी गरज होऊन बसली आहे. याची कारणं अनेक आहेत. हवेत-अन्नात प्रदूषण, दूध-भाज्या-फळांमधली भेसळ, कामाचे वाढलेले तास, एका जागी अनेक तास बसून काम, फोन-टीव्ही-ओटीटीच्या आहारी जाणे, आळशीपणा आणि एकंदरीतच कशाचेच शास्त्रीय पद्धतीने महत्त्व न जाणून घेण्याची भूमिका. छान आयुष्य जगण्याच्या शर्यतीत अवास्तव गरजा वाढल्या आहेत. ‘क्वालिटी ऑफ लाइफ’ पेक्षा ‘स्टँडर्ड ऑफ लाइफ’कडे नको तितके लक्ष देतोय आपण.

- देवयानी एम

(लेखिका वेलनेस कोच आणि 'योग ऊर्जा'च्या संस्थापिका )

माझ्या मते आरोग्याकडे होलिस्टिक पद्धतीने पाहायचे असेल तर तीन सोपे प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवे;

How we look? - माझा शारीरिक फिटनेस कसा आहे (बाह्य फिटनेस)

How we function? - माझ्या शरीरातील सर्व क्रिया जशा व्हायला पाहिजे तशा होतात का (आंतरिक हेल्थ)

How we feel? – माझे मानसिक स्वास्थ्य कसे आहे (मेंटल वेलनेस)

या तीन प्रश्नांची उत्तरे तुमची ‘क्वालिटी ऑफ लाईफ’ कशी आहे त्याचं प्रतिबिंब आहे.

शरीर-मनाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी रोजच्या आयुष्यात काही गोष्टी सातत्यानं करण्याला आज खरेच काही पर्याय नाही. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहू.

शुद्धी क्रिया

आपण ज्या संस्कृतीत वाढलो त्यात घरात चप्पल घालून न फिरणे, बाहेरून आल्यावर हात-पाय धुणे हे प्रकार नवीन नाहीत. तसेच आंघोळ करणे, दात घासणे इ. पण ही झाली बाहेरची स्वच्छता. आपल्या शरीराच्या आत साठत असणारी घाण साफ करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. निसर्गाने आपल्या शरीराच्या आतील घाण बाहेर काढण्याचे मार्ग आधीच उपलब्ध करून दिलेले आहेत. जसे डोळे, श्‍वसनमार्ग, त्वचा, मल-मूत्र विसर्जन करणारी यंत्रणा वगैरे. परंतु आपली जीवनशैली, वातावरण व आंतर इंद्रियांच्या आरोग्याचे चढ-उतार अशा अनेक कारणांनी शरीरात ठिकठिकाणी घाण साचून राहते. हीच घाण (toxins) पुन्हा रक्तात शोषली जाते व अनेक विकारांना जन्म देते. शरीराच्या आतली घाण साफ करण्यासाठी योगशास्त्रात विविध ‘शुद्धी क्रिया’ सांगितल्या आहेत. त्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकणे अत्यावश्यक आहे.

व्यायाम व योगासने

आपल्या निरोगी शरीराचे सूत्र तीन मुख्य प्रणालींवर अवलंबून असते – पचनसंस्था, हृदय व श्‍वसन संस्था आणि मज्जासंस्था. यांचे आरोग्य टिकवण्यासाठी योगासने आणि व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. हात-पाय-पाठ व सर्व स्नायूंना बळकट करायचे असेल, आंतर इंद्रियांना निरोगी ठेवायचे असेल, मन-बुद्धीला ऊर्जा हवी असेल, जाडी कमी करायची असेल, पोश्चर सुधारायचे असेल, स्टॅमिना कमी पडत असेल, मनाचा ताजेपणा-एकाग्रता वाढवायला, शरीराच्या काही ना काही कुरबुरी घालवायला, दीर्घकाळ तारुण्य टिकवायला, कमकुवत व्यक्तिमत्त्वाला भक्कम करायला, बुद्धीची तल्लखता टिकवायला सर्व प्रकारची योगासने आणि व्यायाम हा आयुष्यात दीर्घकाळ साथ देईल, हे नक्की. मात्र, योगासनांना व्यायामसारखे करू नका. दोघांमध्ये फरक आहे. दम लागणारे, बळ वाढवणारे, लवचिकता आणणारे असे सर्व प्रकार यात समाविष्ट करा. जर व्यायाम सकाळी करणार असाल तर पोट रिकामे असावे. ज्यांना एखादे फळ खाण्याची किंवा चहा-कॉफी प्यायची सवय असेल त्यांनी त्यानंतर तासाभराने हे व्यायाम करावेत. संध्याकाळी करणार असाल तर पोट हलके असावे म्हणजे जेवणानंतर चार तासांनी.

प्राणायाम

ज्याच्यावर आपले जगणे अवलंबून आहे त्या श्‍वासाला ‘प्राण’ म्हणतात. कुठल्याही प्रसंगी तुम्ही निरीक्षण करून पहा आपल्या मनाच्या अवस्थेचा श्‍वासावर सगळ्यात अगोदर परिणाम होतो. कधी राग आला, भीती वाटली, अस्वस्थता वाटली तर श्‍वासही अस्थिर होतो. याउलट झोपेत किंवा मन शांत असेल तेव्हा श्‍वासही संथ आणि लयबद्ध असतो. मन आणि श्‍वासाच्या या नात्यामुळे प्राणायामाचा अभ्यास गरजेचा आहे. मनाच्या अवस्थेप्रमाणे श्‍वास बदलतो, याउलट प्रयत्नपूर्वक श्वासाच्या

गतीमध्ये बदल केला तर मनाच्या अवस्थेत बदल घडू शकतो व ते शांत होऊ शकते. मनाला शांत हो सांगितले तर ते होणे खूप कठीण आहे. त्याच्या गतीबरोबर आपण तासंतास भटकत राहू. म्हणूनच श्वासाच्या माध्यमातून मनाचे नियंत्रण करण्याच्या शास्त्राचा अभ्यास म्हणजे ‘प्राणायाम’.

विश्रांती व झोप

दिवसाला आठ तासाप्रमाणे आयुष्यातला एक तृतीयांश भाग आपण झोपेत असतो. ज्यांना असे वाटते, की झोपेत खूपच वेळ वाया जातो त्यांनी झोपेवर लिहिलेली संशोधनात्मक पुस्तके वाचावी. आपल्याला वाटते झोपेत काहीच होत नसते आणि निष्क्रिय असा तो वेळ असतो. परंतु झोपेत आपल्या मेंदूमध्ये अचंबित करणारे कार्य चालू असते. सूर्योदय-सूर्यास्ताप्रमाणे आपल्या शरीरात रासायनिक बदल होत असतात. आपल्या मेंदूत (हायपोथॅलॅमस) स्वतःचे एक जैविक घड्याळ असते. सूर्यास्तानंतर वातावरणातील प्रकाशाचे प्रमाण कमी झालेले संकेत डोळ्याद्वारे मेंदूत जातात आणि मेलॅटोनिन हॉर्मोनचा स्राव होतो. त्याचबरोबर आपल्याला मेंदूमध्ये जागेपणात ॲडेनोसिनचे प्रमाण वाढत रात्रीपर्यंत उच्चांकाला पोहोचते व झोप येऊ लागते. किती तास झोपावं याचे उत्तर व्यक्तिसापेक्ष आहे. सर्वसाधारण व्यक्तीस सहा ते आठ तास झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. आपण किती तास झोपतो यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या झोपण्या-उठण्याच्या वेळेचं नियोजन. झोपेवरील संशोधनानंतर असे समजले की हे सर्व फायदे रोजच्या रोज पूर्ण झोप मिळाली तर मिळतात. जसा श्वास रोज घेतला तर जिवंत राहू तसे चांगली झोप ही रोजची गरज असल्याने ती मिळाली तरच हे सगळे बदल शक्य आहेत. त्यामुळे ‘विकेंडला झोप भरून काढू,’ ही संकल्पना शास्त्रीय दृष्ट्या चुकीची आहे. अती झोप सुद्धा आरोग्यास हानिकारक आहे आणि त्याचा योग्य तपास होणे गरजेचे आहे.

ध्यान

आपण दिवसभर काही ना काही करत असतो. काहीतरी करत राहण्याची इतकी सवय होऊन बसते, की आपल्याला कंटाळाही लगेच येतो. याचे कारण काही न करण्याचा आपल्याला सराव नाही. काहीकाळ कुठलेही कर्म न करण्यात खरे म्हणजे एक वेगळीच गोडी आहे. काही करायचे नाही म्हणजे नक्की काय करायचे? तर शरीराने आणि मनानेही कुठलेच कर्म करायचे नाही. ही स्थिती ध्यानात अनुभवता येते. आसनांनी आलेली शरीराची स्थिरता, प्राणायामातून नियंत्रित केलेले मन, प्रत्याहाराने आलेली अंतर्मुखता आणि धारणेमध्ये आपले चित्त एकाच ठिकाणी बांधून ठेवल्यासारखे स्थिर ठेवणे ही सर्व ध्यानापर्यंत पोहचण्याची पूर्वतयारी आहे. ध्यान ही एक प्रक्रिया आहे. अनेक योग ग्रंथांमध्ये ध्यानासंबंधी मार्गदर्शन केले आहे. भगवद्गीतेतील ‘आत्मसंयमयोग’ या सहाव्या अध्यायात ध्यानयोगाचे सविस्तर वर्णन आले आहे. अर्जुनसुद्धा भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की ‘हे चंचल मन स्थिर करणे म्हणजे वाऱ्याला अडवण्यासारखे अत्यंत कठीण आहे’. त्यावर श्रीकृष्ण म्हणतात ‘हे जरी खरे असले तरी अभ्यास आणि वैराग्याने ते मन ताब्यात येते. ध्यान हे सर्वसाधारणपणे अध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले जाते, बहुतेक यामुळे अनेक जण यापासून लांब राहतात. परंतु ध्यानप्रक्रियेची शास्त्रीय उपयोगिता जर पाहिली तर अनेकजण ध्यान करायला सुरू करतील असे मला वाटते.

मनाची शुद्धी आणि प्रसन्नता

ऋषिमुनींनी केलेल्या संशोधनांतून, स्वतःवरील प्रयोगातून, तपश्चर्या व साधनेतून तयार केलेल्या अनेक ग्रंथांद्वारे आपल्या जीवनाचे युजर मॅन्युअल बनवले, ज्याचे नाव ‘योगशास्त्र’. योगाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, वैयक्तिक आणि आध्यात्मिक असे सर्व पैलू पतंजली मुनींनी अष्टांग योगात सांगितले आहेत. समाजात कसे वागावे, वैयक्तिक सवयी कशा असाव्यात, शारीरिक-मनासिक उन्नतीसाठीची साधने, एकाग्रता, ते अगदी शरीर-मन-बुद्धी-अहं यांच्याही पलीकडे जाण्याचा मार्ग अशी व्यापक रेंज कव्हर केली आहे. हे आपल्या आयुष्याचे युजर मॅन्युअल नाही तर अजून काय आहे? शरीराच्या कवायतीप्रमाणे मनाची मशागत, बुद्धीला धार आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी काही वेळ बाजूला काढावा. रोज काहीवेळ तरी ‘स्वाध्याय’ म्हणजे कामापलीकडील आणि करमणुकीपलीकडील विषयांचा अभ्यास करावा. मनाचा ओलावा टिकून ठेवणारा आणि ‘मी-माझं’च्या पलीकडे नेणारा, व्यापकता वाढवणारा अभ्यास कशाने होईल असे वाचन करा. तसेच कला, नृत्य, संगीत, प्रवास, निरोगी मैत्री इत्यादी यांनी निश्चितच मानसिक आरोग्य वृद्धिंगत होते.

Swasthyam 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.