esakal | दिनविशेष - ०६ ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?
sakal

बोलून बातमी शोधा

दिनविशेष - ०६ ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

दिनविशेष - ०६ ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : भाद्रपद कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय सकाळी ७.०१, चंद्रास्त सायंकाळी ६.२९, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१७, सर्वपित्री दर्श अमावास्या, अमावास्या श्राद्ध, भादवी पोळा, अमावास्या समाप्ती दु. ४.३५, भारतीय सौर आश्विन १४ शके १९४३.

दिनविशेष - 6 ऑक्‍टोबर

1732 ः पहिले नाविक पंचांग करणारे व सागरातील स्थानाचे रेखांश निश्‍चित करण्याची पद्धत शोधून काढणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ नेव्हिल मॅस्केलिन यांचा जन्म.

1779 ः ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचे गव्हर्नर, प्रशासक व इतिहासकार माउंट स्ट्युअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म. मुंबई प्रांताचे गव्हर्नर असताना त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांनी "हिस्टरी ऑफ इंडिया' या दोन खंडांत भारताचा इतिहास लिहिला.

1893 ः आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर भारतीय पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांचा जन्म. खगोलभौतिकी या विषयात आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होत.

1913 - कविवर्य वा. रा. कांत यांचा जन्म. त्यांची "सखी शेजारिणी, तू हसत रहा..', "त्या तरुतळी विसरले गीत', "बगळ्यांची माळ फुले अजूनि अंबरात', "राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे' इ. भावगीते लोकप्रिय आहेत. त्यांचे "वेलांटी', "पहाटतारा', "शततारका', "रुद्रवीणा', "दोनुली', "मरणगंध' इ. काव्यसंग्रह, 6 अनुवादित पुस्तके, ललितलेख, स्फुटलेख, समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांच्या "मावळते शब्द' या कवितेला कवी केशवसुत पारितोषिक मिळाले.

1949 ः पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.

1970 ः पुणे शहरातील चित्रपट प्रदर्शन व्यवसायाचे आद्य जनक, "आर्यन' सिनेमा या चित्रपटगृहाचे संस्थापक, गंगाधर नरहर ऊर्फ बापूसाहेब पाठक यांचे निधन.

1979 ः नामवंत इतिहास संशोधक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू महामहोपाध्याय डॉ. दत्तो वामन पोतदार यांचे निधन. मराठी शुद्धलेखन महामंडळाचे ते अध्यक्ष होते. प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास या विषयांचा त्यांचा विशेष व्यासंग होता. मराठीप्रमाणेच इंग्रजी, हिंदी व संस्कृत या भाषांतही ते प्रभावीपणे भाषणे करीत.

1995 ः जगप्रसिद्ध वैद्यराज बृहस्पती देवत्रिगुण यांना प्रतिष्ठेचा "धन्वंतरी पुरस्कार' जाहीर.

1998 ः वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योगपती डॉ. रामनाथ आनंदीलाल पोद्दार यांचे निधन.

2004 ः भारताचा फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याने कसोटी कारकिर्दीत चारशे बळींचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशी तीन बळी मिळवून कुंबळेने ही कामगिरी केली. सायमन कॅटीचचा त्रिफळा उडवून त्याने चारशेवा बळी मिळविला. 85 व्या कसोटीत त्याने ही कामगिरी केली. कपिलदेव यांच्यानंतर चारशे बळी मिळविणारा कुंबळे भारताचा दुसरा व कसोटीतील नववा गोलंदाज ठरला.

loading image
go to top