esakal | दिनविशेष : २९ सप्टेंबर - इतिहासात आजच्या दिवशी | History
sakal

बोलून बातमी शोधा

दिनविशेष : २९ सप्टेंबर - इतिहासात आजच्या दिवशी

२९ सप्टेंबर २०२१ , बुधवार : भाद्रपद कृष्ण ८, अष्टमी श्राद्ध, मध्याष्टमी श्राद्ध, भारतीय सौर आश्विन ७ शके १९४३.

दिनविशेष : २९ सप्टेंबर - इतिहासात आजच्या दिवशी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पंचांग - २९ सप्टेंबर २०२१ , बुधवार : भाद्रपद कृष्ण ८, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय रात्री १२.२७, चंद्रास्त दुपारी १.१९, कालाष्टमी, अष्टमी श्राद्ध, मध्याष्टमी श्राद्ध, भारतीय सौर आश्विन ७ शके १९४३.

दिनविशेष - 29 सप्टेंबर

1725 - भारतात ब्रिटिश सत्ता दृढ करणारा गव्हर्नर जनरल लॉर्ड रॉबर्ट क्‍लाईव्ह यांचा जन्म.

1890 ः पंचांगकर्ते ल. गो. ऊर्फ नानाशास्त्री दाते यांचा जन्म. जुने पंचांग म्हणून प्रसिद्ध असलेल्या दाते पंचांगाचे संस्थापक. त्यांनी पंचांग गणित पद्धतीत सूक्ष्मता व अचूकता आणली.

1902 - निसर्गवादाचे प्रभावी प्रवर्तक व श्रेष्ठ फ्रेंच कादंबरीकार एमिल झोला यांचे निधन. "कॉंत आ निनॉं' (टेल्स फॉर निनॉं) हा त्यांचा पहिला कथासंग्रह आणि "ला कॉंफेस्यॉं द क्‍लोद' (क्‍लोद्‌स कन्फेशन) ही त्यांची पहिली कादंबरी. त्यांनी 1871-93 या काळात "ले रुगॉं माकार' या नावाखाली वीस कादंबऱ्यांची माला गुंफली.

1908 - पदार्थ वैज्ञानिक एन्रिको फर्मी यांचा जन्म. न्यूट्रॉन कणांवरील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पुरस्कार प्राप्त.

1925 - फ्रान्सचे पंतप्रधान व नोबेल पुरस्काराचे मानकरी लिआँ व्हीक्तॉर ऑग्यूस्त बूर्झ्वा यांचे निधन. त्यांनी प्राप्तिकर, निवृत्तिवेतन, सामाजिक सुरक्षा, विमा योजना इत्यादींबाबत पुरोगामी धोरणाचा पुरस्कार केला. 1919 मध्ये पॅरिस येथे भरलेल्या शांतता परिषदेतही त्यांनी फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले व जागतिक शांततेचा पुरस्कार केला. या कार्याबद्दल 1920 चा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आला.

1932 - मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक व साहित्यिक हमीद दलवाई यांचा जन्म.

1952 ः शिर्डी येथील साई मंदिराच्या कळसाची प्रतिष्ठापना डॉ. रामचंद्रमहाराज पारनेरकर यांच्या हस्ते.

1966 - नामवंत कायदेपंडित, मद्रासचे कायदामंत्री, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिलेले सर सी. पी. रामस्वामी अय्यर यांचे निधन. लंडनमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेत सभासद या नात्याने त्यांनी काम केले. त्रावणकोर, अन्नमलई व बनारस विद्यापीठांचे ते कुलगुरू होते.

1997 - "इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट' (आयआरएस-1 डी) या भारतातील पहिल्या अतिप्रगत दूरसंवेदक उपग्रहाचे "पीएसएलव्ही-सी 1' या ध्रुवीय उपग्रह वाहकाद्वारे श्रीहरिकोटा येथील शार तळावरून यशस्वी प्रक्षेपण.

1998 - गुजराती रंगभूमीवरील ख्यातनाम अभिनेते व नाट्यलेखक प्रा. विष्णूकुमार व्यास यांचे निधन.

2001 - राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ऑल इंग्लंड विजेता पी. गोपीचंद याला सर्वोच्च प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.

2003 - ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या केलेल्या वापराबद्दल सातपूर (नाशिक) येथील विनायकराव पाटील यांना "जमनालाल बजाज स्मृती पुरस्कार' जाहीर .

2004 - रामायण, महाभारताचा अभ्यास असलेले साहित्यिक श्री. र. भिडे यांचे निधन. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या "साहित्य सहकार' या गाजलेल्या वाङ्‌मय मंडळाचे भिडे संस्थापक सदस्य होते. "महाभारताची शापवाणी', "महाभारताचे वरदान', "वाल्मीकी रामायण ः शाप आणि वर' ही त्यांची पुस्तके गाजली होती.

loading image
go to top