संस्कृती घडण-मंत्र - बोलणे : काय, कसे, कुठे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Culture

घडण-मंत्र - बोलणे : काय, कसे, कुठे?

‘‘आ ता हे म्हणजे जरा जास्तच होतंय. आमच्या मुलांशी आम्ही काय बोलायचं आणि कसं हे सुद्धा तुम्ही आम्हाला शिकवणार?" असं तुम्हाला वाटलं आणि राग आला तर तो चुकीचा नाही. आपण सांगतो आहोत त्याचे महत्त्व आणि भावना मुलांनी स्वतःहून समजावून घ्यायची आणि त्याप्रमाणं वागायचं इतकं सगळं साधं आहे.

‘‘तुम्ही जरा मुलाचंच कौन्सिलिंग करा. पालकांचं ऐकायला शिकवा जरा,’’ हा आग्रह सुद्धा नवीन नाहीये. मला तर क्लिनिकमध्ये हे रोज ऐकायला मिळतं. मात्र, मुलांना पालकांच्या बोलण्यात स्वारस्य का नसते, ते आपण मागच्या लेखात पाहिलंच आहे.

आपल्या बोलण्याचा परिणाम होण्यासाठी, आपल्या शब्दाला किंमत हवी. आणि सहज व मुबलक प्रमाणात फुकट मिळत असलेल्या गोष्टीला किंमत नसते. हे वैश्विक सत्य आहे. यासाठीची दोन तत्त्वे आहेत.

१) सहज संवाद

आपण पालकांशी कोणत्याही विषयावर मोकळेपणाने बोलू शकतो हा विश्वास निर्माण व्हायला हवा. तो फक्त अनुभवाने निर्माण होतो. ‘‘तू मला काहीपण सांगू शकतो. एकदम बिनधास्त,’’ अशा पालकी थापा वारंवार मारून तो विश्वास निर्माण होत नाही. मुलांचं एक खूप वेगळं जग निर्माण झालेलं आहे.

प्रामाणिक कुतूहलानं त्या जगाची माहिती करून घ्यायची इच्छा असल्यास आपले मूल हे सर्वांत उत्तम साधन आहे. कोणत्याही प्रकारचे मतप्रदर्शन (हे बहुधा नकारात्मकच असते) न करता मुलांच्या आवडीच्या आणि नावडीच्या गोष्टींबद्दल त्यांची मते एकूण घेणे हा त्याचा पाया आहे. सर्वांनाच स्वतःचे मत मांडायला आवडते आणि ते मत मनापासून ऐकून घेणारी व्यक्तीही आवडते. ती व्यक्ती होण्याचा पालकांचा उद्देश असला पाहिजे.

ऐकून घेणं म्हणजे सहमती किंवा परवानगी नव्हे. तशी भीती बाळगायची गरज नाही. ‘‘आम्ही मुलाच्या गेमिंगच्या गोष्टी ऐकून घेतल्या तर तो अभ्यास सोडून तेच करायला परवानगी दिली आहे असे समजेल,’’ असा अर्थ होत नाही. उलट हे गेमिंग त्याच्यासाठी इतका कळीचा मुद्दा का बनले आहे, हे तुम्हाला समजायला मदत होईल.

२) बिना आग्रहाचे मत मांडणे

एखाद्या विषयावर आपलं मत वेगळे असल्यास ते शांतपणे आणि थोडक्यात मांडणे बरे असते. मतांची कुस्ती लावली आणि पोरांना पार चितपट करायचा आग्रह धरल्यास संभाषण संपते. प्रत्येक संभाषण ही एक वादविवाद स्पर्धा आहे आणि ती आपण जिंकली पाहिजे, हा दुराग्रह लोकसभेत ठीक आहे.

स्वतःच्या जवळच्या नात्यांमध्ये दुरावा आणण्याचे ते साधन आहे. आपल्या चिंता आणि काळज्या बाजूला ठेवून शांतपणे ऐकणं आणि बोलणं. समोरच्याचा मुद्दा पटला असल्यास ते मोकळ्या मनानं कबूल करणं आणि त्यात हार-जित अशी भावना नसणे, ही विश्वासू नात्याची लक्षणे आहेत.

आपल्या वयामुळं आणि वैयक्तिक मर्यादांमुळं आपल्याला अनेक नव्या गोष्टी समजत नाहीत. आपली मुलं या नव्या जगात जाण्याचा व्हिसा आहेत. त्यांच्याशी बोलून त्यांच्या दृष्टिकोनातून आपले जग कसे दिसते, हे समजावून घेणे गरजेचे आहे. हट्टानं आपल्या मताची बळजबरी कितीही कौशल्यानं केली, तरी शेवटी संवाद तुटतो.

पालकत्व म्हणजे फक्त समजावून घेणे नव्हे. वेळप्रसंगी सूचनाही द्याव्या लागतात. पाळली जाईल अशा पद्धतीने सूचना देणे ही सुद्धा एक कला आहे.