कपिलेश्वरला आज यात्रोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कपिलेश्वरला आज यात्रोत्सव

कपिलेश्वरला आज यात्रोत्सव

कळमसरे : अमळनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या खानदेशातील पर्यटन व तीर्थक्षेत्र अशी ओळख असलेल्या नीम (ता. अमळनेर) जवळील कपिलेश्वर महादेव मंदिरात मंगळवार (ता. १)पासून महाशिवरात्री यात्रोत्सवास सुरवात होईल, पंधरा दिवस हा यात्रोत्सव सुरू असतो.

जळगाव व धुळे जिल्ह्यांच्या सीमारेषेवर असलेल्या एक हजार वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेले श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर खानदेशातच नव्हे, तर भारतात अल्पवधीतच सर्वत्र परिचयास आले. या मंदिरावर राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविकांची गर्दी होऊ लागल्याने परिसराला महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंना तापी, पांझरा आणि गुप्तगंगा असलेल्या त्रिवेणी संगमावर सुमारे एक हजार वर्षांपूर्वी ऋषी कपिलमुनींनी तपस्या करीत शिवलिंगाची स्थापना केली आहे. या मंदिराचे महत्त्व स्कंदपुराणातही सांगितले आहे. याच ठिकाणी मंदिराचे मठाधिपती हंसानंदजी महाराज यांनी २००५ अखिल भारतीय संत संमेलन भरविले होते. या वेळी भारतातून संतांनी हजेरी लावत कळमसरेसह परिसरातील भूमी पावन झाली आहे.

अध्यात्म आणि सामाजिकता यातून परिसरात कायापालट झाला असून, मंदिराला लागूनच अनिरुद्ध बापूंचा आश्रम आहे. याठिकाणी दर शनिवारी व रविवारी मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असल्याने या निसर्गाच्या सान्निध्यात भाविकांची मांदियाळी नजरेस पडत आहे. याच ठिकाणी मठाधिपती हंसांनंद महाराज यांनी लहान बालकांसाठी वेधशाळा सुरू केली असून, शालेय शिक्षणाबरोबरच त्यांना अध्यात्म न्यान दिले जात आहे. मंदिरावर वर्षभर धार्मिक, सामाजिक कार्यक्रम सुरू असतात, तर महाशिवरात्रीला मोठा यात्रोत्सव भरतो. मंदिरात तीन शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. या जागृत देवस्थानच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक येत असतात. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे बांधकाम केले. दरम्यान, यात्रोत्सवासाठी पाळणा, उपाहारगृहे, संसारोपयोगी वस्तू, खेळण्यांची दुकाने थाटली असून, मारवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक जयेश खलाणे, त्यांचे पोलिस कर्मचारी यांचा बंदोबस्त राहणार असून, मंदिरावर डाळबट्टीचा नैवेद्य, नवस फेडण्यासाठी भाविक दाखल झाले आहेत.

पर्यटनस्थळाचा नुसताच गाजावाजा श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिराला तीर्थस्थळ व पर्यटनस्थळचा दर्जा मिळाला असल्याचा गाजावाजा आजही निःसंकोचपणे केला जातो खरा. मात्र, मंदिराची जागा आजतागायत नावे नसल्याने शासनाच्या मिळणाऱ्या निधीपासून या तीर्थक्षेत्रास वंचित राहावे लागत आहे. परिणामी हंसानंद महाराज व मंदिराचे विश्वस्त जळगाव, धुळे जिल्ह्यांत झोळी फिरवत बरीच विकासकामे केली आहेत. तर सद्य:स्थितीत लोकवर्गणीतून भक्त निवासाचे काम सुरू आहे. खानदेशात प्रसिद्ध असलेल्या या मंदिराची महती सर्वदूर पोचल्याने दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. सुलवाडे बॅरेजच्या बॅक वॉटरमुळे मंदिराच्या तापी व पांझरा नदीत दोन्ही बाजूंना पाणी असल्यामुळे यात्रोत्सव दोन्ही काठावर भरविली जाते.