‘देशी गाई’ ठरल्या टर्निंग पॉइंट

योगेश इंगवलेच्या दुग्धव्यवसायाला मुखप्रसिद्धीच्या माध्यमातून ग्राहकवर्ग मिळाला. दुधाला चांगला भाव मिळत असल्याने देशी गायी पाळू नको म्हणणारे ‘आम्ही देशी गाई घेतो, तू दूध घे,’ असे म्हणू लागले.
Native Cow
Native CowSakal

- योगेश इंगवले

योगेश इंगवलेच्या दुग्धव्यवसायाला मुखप्रसिद्धीच्या माध्यमातून ग्राहकवर्ग मिळाला. दुधाला चांगला भाव मिळत असल्याने देशी गायी पाळू नको म्हणणारे ‘आम्ही देशी गाई घेतो, तू दूध घे,’ असे म्हणू लागले. त्यानंतर गावात देशी गाईंची संख्या वाढत गेली आणि खऱ्या अर्थाने गोशाळेचे स्वप्न साकार झाले.

शालेय शिक्षण घेतानाच योगेश इंगवलेला नेहमी काहीतरी वेगळे करण्याची आवड होती. वडिलोपार्जित शेती आणि चुलते पैलवान असल्याने आजोबांची इच्छा नातवाला पैलवान करायची होती. तब्येतीसाठी योगेश काही काळ कोल्हापूरलाही गेला, परंतु रमला नाही. कोल्हापूरहून आल्यावर ‘पंतप्रधान रोजगार योजने’तून कर्ज काढून सेंट्रींग प्लेट भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला, तरीही वेगळे काहीतरी करावे ही मानसिकता होतीच. एक दिवस वर्तमानपत्रात सोलर ट्रेनिंगच्या कोर्सबाबत ‘मिटकॅान’ची जाहिरात वाचली. त्याने नावनोंदणी करून कोर्स पूर्ण केला. २००८मध्ये पहिल्यांदा सोलर वॉटर हिटर बसविण्याचे काम स्वतः सुरू केले. दरम्यान, इतर कामेही मिळत होती. त्यानंतर बावधन व पिरंगुटला कार्यालय सुरू केले. त्याचे उद्‍घाटन करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याचे भरभरून कौतुक केल्याने मनाला उभारी मिळाली.

योगेश सांगत होता, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या योगशिबिरात भाग घेतला. बंगळूर आश्रमात गुरुजींना भेटल्यावर त्यांनी दिलेला देशी गायींची जोपासना हा सल्ला माझ्या आयुष्यात महत्त्वाचा ठरला. त्यांच्या प्रेरणेतूनच देशी गायींची गोशाळा उभी करण्याची कल्पना सुचली. सुरुवातीला व्यवसायाच्या नफ्यातून आजारी व कसायाकडून वाचविलेली अशी एखादी देशी गाय सांभाळायची, असे ठरविले. मित्रांशी चर्चा केली, पण त्यांच्या नकारात्मक सल्ल्यांमुळे वैचारिक समस्या वाढल्या. पण मी माझ्या मनाशी व विचारांशी ठाम होतो. त्यानंतर ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या सदस्याने गोशाळा उभारणीबाबत माझी माहिती घेतली. मी त्यांना माझ्या मनातील कल्पना सांगितली. त्यांनी चांगल्या व उच्चप्रतीच्या गायी घेऊन त्यांच्यापासून उत्पन्न मिळविण्याचा सल्ला दिला. त्यात यशस्वी झालात, तर परिसरातील शेतकरी आपोआप देशी गायी घेण्यासाठी पुढे येतील, असा सल्ला दिला व हा टर्निंग पॅाइंट ठरला.’’

योगेश पुढे म्हणाला, ‘‘सुरवातीला सात गाई घेतल्या. माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा न करता त्या दिवशी गोशाळा सुरू केली. त्यानंतर अनेक अडचणींना सुरुवात झाली. मजुरांच्या कमतरतेबरोबरच केवळ २० ते २५ रुपये प्रतिलिटरने दूध विकावे लागत होते. योगायोग म्हणा, गोमातेचा आशीर्वाद म्हणा, एक दिवस गावरान गायीचे दूध हवे असल्याचा पुण्यातील मित्राचा फोन आला. त्याने माझ्याकडे ६० रुपये प्रतिलिटर भावाने दूध घेण्याबाबत मला सांगितल्यावर मी हादरलोच. मग काय गावात एकच चर्चा, ‘योगेशने गोशाळा उभारली आणि तुपाच्या भावात दूध विकतो आहे.’ पण त्यावेळीही ६० रुपये हा दुधाचा भाव खर्चाच्या तुलनेने योग्य होता. अशा रीतीने माझ्या दूध व्यवसायाला सुरुवात झाली. मुखप्रसिद्धीच्या माध्यमातून ग्राहकवर्ग वाढला. दुधाला चांगला भाव मिळत असल्याने देशी गायी पाळू नको म्हणणारे म्हणू लागले की, आम्ही देशी गाई घेतो, तू दूध घे. त्यानंतर गावात देशी गायींची संख्या वाढत गेली आणि खऱ्या अर्थाने गोशाळेचे स्वप्न साकार झाले.

सध्या गोशाळेत ३० ते ३५ गायी आहेत. २०१५-१६मध्ये जिल्हा परिषदेचा आदर्श गोपालक पुरस्कार सपत्नीक स्वीकारला. माझ्या कामात पत्नी, आई, वडील, भाऊ, मुलगा राजवीर, मुलगी राजनंदिनी आणि माझा मित्र विनायक माझिरे यांची साथ असते. गोशाळेमधील दूध, पनीर, तूप व इतर पदार्थ व उत्पादने सध्या सत्तर ते ऐंशी कुटुंबांना पुरविली जातात. गोशाळेत गीर, साहिवाल, राठी या देशी गोवंशाच्या उच्च प्रतींच्या गायींचे संगोपन सुरू आहे. गायींना कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन दिले जात नसून, त्या निसर्गात मुक्तपणे चरण्यासाठी जातात. त्यामुळे त्या निरोगी व धष्टपुष्ट राहतात. जंगलात, रानात चरण्यामुळे दुधात नैसर्गिकरित्या औषधी गुणधर्म निर्माण होतात. त्यामुळे दुधाची तसेच तुपाची मागणी वाढत आहे.’’

उपउत्पादनांतूही कमाई

‘आम्ही शेणापासून शेणखत, गोखूरखत, गोवरी, बारा ते तेरा प्रकारच्या जडीबुटी, भीमसेनी कापूर व तूप यांपासून बनविलेली रसायनविरहित धूपबत्ती तयार करतो. त्यामुळे घरात वातावरण शुद्ध होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचबरोबर शेणापासून ओम, स्वस्तिक, हवनकुंड , शुभ लाभ , गणपती मूर्ती, पणती, सीडबॅाल आदी साधारण तीस ते चाळीस प्रकारच्या वस्तू बनविल्या जातात. त्याची मागणीही मोठ्या प्रमाणावर आहे. गोमूत्रापासून गोनायल (फिनेल) बनविले जाते. घरात, कार्यालयात याचा वापर केल्याने मुंग्या, डास यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. गोमूत्रापासून गोअर्कही विक्रीसाठी असते. गोशाळेची आधुनिकतेकडे वाटचाल करण्यासाठी डिजिटल व ऑनलाइन मार्केटिंगकडे लक्ष देत आहे. भविष्यात शेणापासून लाकूड, विटा, बागेत लागणाऱ्या कुंड्या बनविण्याचे काम सुरू करीत आहे. त्यामुळे गोशाळा स्वावलंबी बनणार असून, अनेक तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे,’’ असेही योगेशने सांगितले.

भारतातील कोणत्याही पालकांना प्रश्न केला, की तुमचा पाल्य मोठेपणी कोण बनविणार, तर उत्तर मिळते डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पोलिस. मात्र, ‘गोपालक’ बनवायचे आहे, असे उत्तर मिळणार नाही. भविष्यात पाल्यांना गोपालक बनविण्यासाठी गोशाळाही सक्षम असायला हव्यात. पूर्वीपासून देशी गाईला धार्मिक दर्जा आहे, तसेच आता वैज्ञानिकदृष्ट्या देशी गाय फायद्याचीच असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न योगेश करीत आहे.

(शब्दांकन : धोंडिबा कुंभार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com