
कधीकाळी सर्वसामान्य भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रामानंद सागर यांची रामायण ही पौराणिक मालिका पुन्हा एकदा दूरदर्शनवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नवी दिल्ली - कधीकाळी सर्वसामान्य भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रामानंद सागर यांची रामायण ही पौराणिक मालिका पुन्हा एकदा दूरदर्शनवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जनतेच्या मागणीचा सन्मान ठेवून आम्ही या मालिकेचे पुन्हा प्रसारण सुरू करत आहोत अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली.
- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
‘‘सध्या संपूर्ण देश लॉकडाउनला सामोरे जात आहे, अशा स्थितीमध्ये बहुसंख्य नागरिकांनी मनोरंजनासाठी रामानंद सागर यांचे ‘रामायण’ आणि बी. आर. चोप्रा यांचे ‘महाभारत’ या दोन्ही मालिकांचे पुन:प्रसारण केले जावे अशी मागणी केली होती, सध्या आम्ही त्यावर काम करत आहोत,’’ असे प्रसारभारतीचे सीईओ शशी शेखर यांनी सांगितले. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर शेखर यांनीही जावडेकर आणि सागर कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. कधीकाळी दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिका सुरू झाल्यानंतर अक्षरशः रस्ते रिकामे होत असत, आता लॉकडाउनमुळे रस्तेच ओस पडल्याने रामायणच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
जनतेच्या मागणीनुसार आम्ही उद्या शनिवार २८ मार्चपासून दूरदर्शनवरून रामायण या पौराणिक मालिकेचे पुन:प्रसारण करत आहोत. सकाळी नऊ ते दहादरम्यान ही मालिका प्रसारित केली जाईल. सायंकाळी नऊ ते दहा दरम्यान ही मालिका दाखविण्यात येईल.
-प्रकाश जावडेकर, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री