काश्‍मीरमध्ये आणीबाणीसारखी स्थिती! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 September 2019

"काश्‍मीर टाइम्स'च्या संपादिका अनुराधा भसीन यांचा दावा 

मुंबई : काश्‍मीरमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती दाखवली जात आहे, तशी परिस्थिती अजिबात नाही, असा दावा "काश्‍मीर टाइम्स'च्या संपादिका अनुराधा भसिन यांनी आज केला. काश्‍मीरमधील प्रसिद्धिमाध्यमाबाबत त्या मुंबई प्रेस क्‍लब येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. 

चुकीची परिस्थिती दाखवून पत्रकारांमध्ये प्रचंड दहशत पसरविण्यात आली असून, सरकार फक्त त्यांना हवी तीच माहिती पत्रकारांना देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट रोजी काश्‍मीरमधील 370 कलम रद्द केले. तेव्हापासून इंटरनेट, टेलिफोन सर्वच सेवा बंद करण्यात आल्या आहेत. सरकारला हव्या असलेल्या माहितीची द्यावी; तसेच इतर माहिती प्रसिद्ध केली जाऊ नये, यासाठी सरकारी यंत्रणा पत्रकारांवर दबाव आणत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सरकारकडून वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन परिस्थितीची माहिती दिली जाते. मात्र, या माहितीची पडताळणी करता येत नाही, असेही भसिन यांनी नमूद केले. अनुराधा यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. या प्रकारामुळे माध्यम स्वातंत्र्याचाच प्रश्‍न निर्माण झाला असून देशातील नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहचत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

इंटरनेट बंद करून सरकारने नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली आहे. पत्रकारांचे दूरध्वनी संभाषण, ईमेलही तपासले जात असल्याचा दावा भसिन यांनी केला. माहिती आणि संभाषणावर मर्यादा आणणे, हा आणीबाणीचा प्रकार असल्याचा दावा वकील आस्पी चिनॉय यांनीही या वेळी केला. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State of emergency in Kashmir said by editor of kashmir times