बेळगाव : दोन दुचाकींच्या धडकेत वायरमन ठार (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

बोरगाव येथील हेस्कॉम केंद्रासमोर असलेल्या तेलसंग पेट्रोलपंपावर इंधन घालण्यासाठी जात असलेल्या कंत्राटी लाईनमनला बेडकिहाळकडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने समोरुन धडक दिली. त्यात लाईनमन ठार झाल्याची घटना आज (ता. 9) सकाळी नऊच्या सुमारास घडली. 

चिक्कोडी - बोरगाव येथील हेस्कॉम केंद्रासमोर असलेल्या तेलसंग पेट्रोलपंपावर इंधन घालण्यासाठी जात असलेल्या कंत्राटी लाईनमनला बेडकिहाळकडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने समोरुन धडक दिली. त्यात लाईनमन ठार झाल्याची घटना आज (ता. 9) सकाळी नऊच्या सुमारास घडली. बोरगाव - बेडकिहाळ मार्गावरील गुंफा नजीक हा अपघात झाला. मौला गुलाब गळतगे (वय 58, रा. बोरगाव) असे मृताचे तर सुधीर पाटील (वय 30, रा. चंदूरटेक) असे जखमीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बोरगाव येथील मौला गळतगे हे येथील हेस्कॉमच्या कार्यालयात कंत्राटी लाईनमन म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते आपल्या दुचाकी (केए 23 ईडी 4525) वरुन कार्यालयाकडे आले असता जवळच असलेल्या पेट्रोलपंपाकडे पेट्रोल भरण्यासाठी जात होते. त्यांच्या दुचाकीसमोरुन एक मालवाहू वाहन आले. त्यापाठोपाठ एक दुचाकी वेगाने येत होती. पुढे मालवाहू वाहन असल्याने मागील दुचाकी त्यांना दिसली नाही. पेट्रोल पंपाकडे वळत असतानाच बेडकिहाळकडून इचलकरंजीकडे भरधाव वेगाने जात असलेल्या पाटील यांच्या दुचाकीने (एमएच 09 ईए 9911) त्यांना समोरुन जोरदार धडक दिल्याने दोघेही जागीच कोसळले. पण यात मौला व पाटील दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना सरकारी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी चिक्कोडीकडे नेत असताना मौला यांचा वाहनातच मृत्त्यू झाला. सुधीर पाटील जखमी झाले असून त्यांना चिक्कोडी येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन बेळगावला हलविण्यात आले आहे.

मौला यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. नागरिकांच्या विजेच्या सोईसाठी ते नेहमी तत्पर असल्याने त्यांच्या निधनाबद्दन नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आर. वाय. बिळगी व सहकाऱ्यांनी भेट देवून पंचनामा केला. सदलगा पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident near Borgaon in Belgaum District one dead