मुलांना गाडी दिल्यास पालकांना तुरुंगवास

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 September 2019

देशातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकारने वाहतूक नियम भंगाच्या दंडाच्या रकमेत वाढ केलेली आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहन चालविताना गुन्हा घडल्यास वाहन मालक-पालकांना 25 हजार रुपयांचा दंड व तीन वर्षे तुरुंगवास होणार आहे.

पुणे : देशातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकारने वाहतूक नियम भंगाच्या दंडाच्या रकमेत वाढ केलेली आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहन चालविताना गुन्हा घडल्यास वाहन मालक-पालकांना 25 हजार रुपयांचा दंड व तीन वर्षे तुरुंगवास होणार आहे. तसेच रुग्णवाहिकांना मार्ग न दिल्यास वाहन चालकांवर 10 हजार रुपये दंड होणार आहे. या बदलाच अंमलबजावणी येत्या रविवारपासून (ता.1) लागू करण्यात येणार आहे. याबाबत परिवहन विभागाने राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) आदेश दिले आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना पूर्वीपेक्षा कमीत-कमी पाच पट अधिक दंड भरावा लागणार आहे.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनामध्ये मोटार वाहन दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते. या नव्या मोटार वाहन कायद्यातील 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. त्यानुसार मोटार वाहन कायद्यातील बदल रविवारपासून (ता.1 सप्टेंबर) लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. त्यात कमीत कमी 500 रुपये एवढा दंड असून तो रस्ते नियमभंग केल्यास आकारला जाणार आहे. तर जास्तीत जास्त दंडाची रक्कम ही 25 हजार व तीन वर्षे तुरुंगवास अशी असून हा दंड अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहन चालविताना गुन्हा घडल्यास आकारला जाणार आहे. या गुन्ह्यात वाहन मालक-पालक यांना दोषी धरले जाणार आहे. तसेच रुग्णवाहिकेला वाट न दिल्यास 10 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद या नव्या कायद्यात करण्यात आलेली आहे.

विना परवाना वाहन चालविल्यास आकारला जाणारा दंड 500 रुपयांवरून 5 हजार रुपये केला आहे. तसेच मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्यास 400 रुपयांऐवजी 2 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. रस्ते अपघातामध्ये दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागत असून त्यामध्ये युवकांची संख्या सर्वाधिक आहे. ही संख्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करून वाहतूक नियमांच्या दंडामध्ये मोठी वाढ केली आहे.

नियमभंग : जुना दंड : नवा दंड (आकडे रुपयात)
रस्ते नियमांचा भंग : 100 : 500
प्रशासनाचा आदेश भंग : 500 : 2000
परवाना नसलेले वाहन चालवणे : 500 : 5000
पात्र नसताना वाहन चालवणे : 500 : 10,000
वेग मर्यादा तोडणे : 400 : 2000
धोकादायक वाहन चालवणे : 1000 : 5000
दारु पिवून वाहन चालवणे : 2000 : 10,000
वेगवान वाहन चालवणे : 500 : 5000
विना परवाना वाहन चालवणे : 5000 : 10,000
दुचाकीवर दोन पेक्षा जास्त व्यक्ती : 100 : 2000
रुग्णवाहिकासारख्या वाहनांना रस्ता न देणे : 00 : 10,000
विमा नसताना वाहन चालवणे : 1000 : 2000
अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा : 00 : 25,000 व तीन वर्षे तुरुंगवास (मालक-पालक दोषी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These new Motor Vehicle Act laws hike driving penalties from Sept 1