
बिकरीवाल याच्या अटकेमुळे पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना अनेक प्रकरणातील माहिती मिळू शकते. मोठे खुलासे देखील होऊ शकतात.
सुरक्षा यंत्रणेला वर्षाच्या अखेरीस मोठं यश मिळाले आहे. पंजाबचा कुख्यात आरोपी आणि खालिस्तानी दहशतवादी सुख बिकरीवाल याला अटक करण्यात आली. दुबईहून भारतात आणण्यात आल्यानंतर दिल्लीच्या विशेष पथकाने त्याला अटक केली.
वीर चक्र विजेत्या बलविंदर संधु यांच्या हत्येत सहभागी असल्याचा सुख बिकरीवाल याच्यावर आरोप आहे. एवढेच नाही तर नाभामध्ये तुरुंग फोडण्याच्या घटनेच्या कटातही सहभागी होता.
Delhi Police Special Cell arrests gangster Sukh Bikriwal at the Delhi airport following his deportation from Dubai pic.twitter.com/KpRqmVT9r6
— ANI (@ANI) December 31, 2020
आयएसआयचा मोहरा
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयसाठी काम करत असलेला बिकरीवाल भारतातील खासकरुन पंजाबमधील टार्गेट किलिंग प्रकरणात सहभागी होता. दुबईमध्ये वास्तव्यास असताना त्याने आपली वेशभूषा बदलली होती. दाढी काढून त्याने पगडी बांधायला सुरुवात केली होती. मागील काही दिवसांत दिल्लीतील अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर दुबईस्थित सुख बिकरीवालच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेनंतर त्याला ताब्यात घेऊन दिल्लीला आणण्यात आले. दिल्ली विमानतळावरच दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केले.
बिकरीवाल याच्या अटकेमुळे पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना अनेक प्रकरणातील माहिती मिळू शकते. याशिवाय काही मोठे खुलासे देखील होऊ शकतात, असे बोलले जात आहे. बिकरीवाल पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयचा मोहरा बनून काम करत होता. त्यामुळे अनेक खुलासे त्याच्याकडून होऊ शकतात. डिसेंबरच्या सुरुवातीला दिल्ली पोलिसांनी राजधानी दिल्लीतून पाच खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर बिकरीवालचा मागोवा घेत पोलिस दुबईला पोहचले होते.