कुंभमेळ्यातून 1.2 लाख कोटींचा 'प्रसाद' अपेक्षित

पीटीआय
सोमवार, 21 जानेवारी 2019

प्रयागराज : कुंभमेळा हे धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचे संमेलन असले, तरी याद्वारे राज्य सरकारला तब्बल 1.2 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) या देशातील सर्वोच्च औद्योगिक परिषदेने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

प्रयागराज : कुंभमेळा हे धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचे संमेलन असले, तरी याद्वारे राज्य सरकारला तब्बल 1.2 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) या देशातील सर्वोच्च औद्योगिक परिषदेने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

15 जानेवारी ते चार मार्च या काळात चालणाऱ्या यंदाच्या अर्धकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 4,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. 2013 ला झालेल्या महाकुंभमेळ्यासाठी खर्च केलेल्या निधीहून ही रक्कम चौपट आहे. त्यामुळे हा कुंभमेळा सर्वाधिक खर्चिक ठरला आहे. मात्र, या कुंभमेळ्याशी संबंधित अनेक आर्थिक व्यवहारांतून आणि रोजगारनिर्मितीतून राज्य सरकारला 1.2 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणार असल्याचे "सीआयआय'च्या अहवालात म्हटले आहे. नागरिक आणि साधूंना विविध सेवा आणि सुविधा पुरविण्यासाठी अडीच लाख लोकांना काम मिळण्याचा अंदाज असून, विमानसेवा क्षेत्रात 1.5 लाख आणि पर्यटन क्षेत्रात 45 हजार जणांना रोजगार मिळू शकतो.

याशिवाय, इको टुरिझम आणि मेडिकल टुरिझम या क्षेत्रांमध्येही 85 हजार जणांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय गाइड, स्वयंसेवक, वाहनचालक, फिरते विक्रेते अशा असंघटित क्षेत्रांमध्येही जवळपास 55 हजार जणांना रोजगार मिळू शकतो. या सर्व गोष्टींमुळे राज्य सरकार आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या तिजोरीत मोठी भर पडण्याची दाट शक्‍यता आहे. 

विदेशी पर्यटकांचा ओढा 

कुंभमेळ्याकडे भारतातील भाविकांप्रमाणेच ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, मलेशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, मॉरिशस, झिंबाब्वे आणि श्रीलंका या देशांमधील लोक येत असल्याने हा जागतिक महोत्सव बनला आहे. उत्तर प्रदेशला मोठा महसूल मिळण्याबरोबरच या देशांमधून आलेल्या पर्यटकांमुळे राजस्थान, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातही मुसाफिरी करतात, त्यामुळे या राज्यांनाही आर्थिक फायदा होणार आहे. 

दुसऱ्या शाहीस्नानची जय्यत तयारी 

उद्या (ता. 21) पौष पौर्णिमेला कुंभमेळ्यातील दुसरे शाही स्नान होणार असून, त्यानिमित्त मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्‍यता असल्याने राज्य सरकारने कडेकोट बंदोबस्त राखला आहे. राज्य पोलिस दलाबरोबरच निमलष्करी दलेही तैनात करण्यात आली आहेत. उद्या एकूण वीस लाख नागरिक संगमावर स्नानासाठी येणे अपेक्षित आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 and 2 lakh crores prasad is expected from Kumbh