जेव्हा 'आयर्न लेडी'ने घेतले 'हे' 10 मोठे निर्णय, केला परिणामांचा सामना | Indira Gandhi Birth Anniversary | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indiara gandhi

जेव्हा 'आयर्न लेडी'ने घेतले 'हे' 10 मोठे निर्णय! | Indira Gandhi

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती... (Indira Gandhi birth Anniversary) इंदिरा गांधी हे एक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांची राजकीय दूरदृष्टी प्रचंड होती. इंदिराजींचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. स्वत:च्या निर्णयांवर ठाम राहिल्यामुळे त्यांना 'आयर्न लेडी' म्हणूनही ओळखलं जातं. इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक कणखर निर्णय घेतले होते. त्यावर वेळोवेळी टीकाही झाली. इंदिरा गांधी यांनी घेतलेले दहा महत्त्वाचे निर्णय आज त्यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया...

जाणून घ्या इंदिरा गांधींनी घेतलेले महत्वाचे निर्णय

हरित क्रांती

देशातील अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी कृषी संशोधन संस्था सुरू केल्या. चांगलं बियाणं वापरून, शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढवण्याच्या या प्रयत्नाला हरित क्रांती म्हणतात. त्यामुळे देश अन्नधान्याबाबत आत्मिनिर्भर झालाच पण निर्यातही करू लागला.

देशाच्या राजकीय इतिहासातील काळा अध्याय - आणिबाणी

आणिबाणी म्हणजे देशाच्या राजकीय इतिहासातील एक काळा अध्याय होता. आणिबाणी नागरिकांच्या हक्कांवरच गदा आली. माध्यमांचं स्वातंत्र्य धोक्यात आलं. कायद्यात बेकायदेशीर बदल करण्यात आले. तुघलकी आदेश काढल्याने हा बिकट काळ होता. 1977 मध्ये इंदिरा गांधींनी आणिबाणी उठवून निवडणूक घेण्याचं जाहीर केलं. त्यामध्ये नाराज जनतेने इंदिराजींचा जोरदार पराभव केला. इंदिरांच्या संपूर्ण कार्यकाळातील हा विवादास्पद काळ होता. 1971 मध्ये रायबरेलीतून इंदिरांविरुद्ध लढणाऱ्या संयुक्त विरोधकांचे उमेदवार राजनारायण यांनी इंदिरांवर आरोप केला की त्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने 12 जूनला याचा निकाल देत इंदिरा गांधीची लोकसभेतील निवड रद्द केलीच पण त्यांना 6 वर्षं निवडणूक लढण्यावर बंदी घातली. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण याच्या नेतृत्वाखाली देशभर आंदोलन उभं राहिलं. जागोजागी बंद होऊ लागल्याने घाबरून जाऊन इंदिरा गांधींनी आणिबाणी घोषित केली.

काँग्रेसचं विभाजन

काँग्रेसमधील सिंडिकेट इंदिरा गांधींना सत्तेवरून हटवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी इंदिरांनी डाव्या विचारांचे उमेदवार व्ही. व्ही. गिरी यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिला आणि काँग्रेसचे उमेदवार नीलम संजीव रेड्डींना पराभूत केलं. काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून काढल्यावर इंदिरांनी पक्षांतर्गत एक नाव पक्ष सुरू केला. भविष्यात इंदिरा गांधींच्या काँग्रेसला लोकांनी विजयी केलं.

1966 - बँकांचे राष्ट्रीयकरण

भारतात काही बँकांच्या केवळ 500 शाखा होत्या आणि श्रीमंतांनाच त्याचा फायदा व्हायचा. तेव्हा इंदिरा गांधीनी नाटकीय स्वरूपात 1966 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यावेळी मनमानी कारभार करत असल्याची टीकाही इंदिरा गांधींवर झाली. पण या निर्णयामुळे बँकांचा देशभर विस्तार होऊन गरिबही बँकांत पैसे ठेवू लागले.

अमेरिकेशी अन्नधान्य करार अन् अर्थव्यवस्थेवर परिणाम

इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर देशात सर्वांत मोठी अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे अमेरिका दौऱ्यात इंदिरांनी अमेरिकेशी अन्नधान्याबाबत करार केला. त्यानुसार अमेरिकेचे अध्यक्ष जॉन्सन यांनी 6.7 मिलियन टन अन्नधान्य भारतात पाठवलं. पण या करारात दोन अटी होत्या. एक म्हणजे व्हिएतनामविरुद्ध भारताने अमेरिकेला पाठिंबा द्यायचा आणि दुसरं रुपयाचं अवमूल्यन. गांधीनी या अटी मान्य केल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी त्यांना धारेवर धरलं. या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवरही विपरित परिणाम झाला. पण देशातील अन्नधान्याची टंचाई कमी झाली आणि नंतर इंदिरांनी अन्नधान्य उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी पावलं उचलली.

....यावरून 'आर्यन लेडी' अशी प्रतिमा तयार झाली

बांग्लादेश हा आधी पूर्व पाकिस्तान होता. पाकिस्तानी सत्तेने पूर्व पाकिस्तानातील नेत्यांचं दमन केलं होतं. त्यामुळे भारतात बांग्लादेशी निर्वासितांचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं. भारताने पाकिस्तानला इशारा दिला. अमेरिकेने पाकिस्तानविरुद्ध युद्ध केल्यास चांगले परिणाम होणार नाहीत अशी धमकी भारताला दिली होती. पण तरीही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानात भारतीय लष्कर घुसवून स्वतंत्र केला. तोच बांग्लादेश म्हणून स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभं राहिलं. अमेरिका काही करू शकली नाही. या विजयामुळे इंदिरा गांधीची आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्यन लेडी अशी प्रतिमा तयार झाली.

ऑपरेशन ब्लू स्टार (या कारवाईमुळे शीख समाज इंदिरा गांधींवर संतापला)

इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर पंजाबातून खलिस्थान हा वेगळा करण्याची मागणी जोर धरत होती. देशात दहशतवाद वाढला होता. जनरैलसिंग भिंडरावाला हा खलिस्थानींचा नेता होता. त्याने अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात ठिय्या दिला. तिथं मोठ्या प्रमाणात शीख दहशतवादी शरण घेत आणि शस्रास्रांचा साठाही होता. भिंडरावालाला सुवर्ण मंदिरातून हाकलण्यासाठी इंदिरा गांधीनी ऑपरेशन ब्लू स्टारअंतर्गत 4 जून 1984 ला लष्कराला सुवर्ण मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी दिली. भिंडरावाला आणि त्याचे साथीदार मारले गेले त्याचबरोबर शेकडो लोकांचं प्राण गेले. या कारवाईमुळे शीख समाज इंदिरा गांधींवर संतापला. त्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या खासगी शीख गार्डनेच दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात 31 ऑक्टोबर 1984 ला त्यांची हत्या केली.

गरिबी हटाओ घोषणा

इंदिरांच्या विरोधकांनी 1971 मध्ये इंदिरा गांधींविरुद्ध 'इंदिरा हटाओ'ची घोषणा दिल्यावर इंदिरांनी 'गरिबी हटाओ' ही घोषणा दिली. त्या अंतर्गत त्यांनी आर्थिक पोषण, ग्राम विकास, रोजगार वाढवणं ही कामं करण्याचं वचन दिलं. देशातली गरिबी तशीच राहिली पण इंदिरांनी निवडणूक मात्र जिंकली.

संसदेत भत्ते रोखण्याचा कायदा

इंदिरा गांधींनी 1971 साली संसदेत हे भत्ते रोखण्याचा कायदा करून ते बंद केले. भारताच्या स्वातंत्र्यावेळी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांनी 550 स्वतंत्र संस्थानं भारतात विलीन करून घेताना त्यांना मोठे भत्ते दिले होते. जरी ते देशाला पडवडणारे नसले तरीही ते देण्यात आले आणि नेहरूंनी मान्यही केले. पण या भत्त्यांमुळे देशाचा बराच पैसा खर्च होतो हे लक्षात आल्यावर भत्ते रोखण्याचा कायदा करून ते बंद केले. त्यानंतर देशाला आर्थिक फायदा झाला पण राजकीय भूकंप झाला होता.

यशस्वी अणू चाचणी

1974 ला भारताने पहिल्यांदा राजस्थानातील पोखरणमध्ये यशस्वी अणू चाचणी केली त्या उपक्रमांचं नाव होतं स्मायलिंग बुद्धा. अण्वस्रांचा वापर शांततेसाठी करण्याचं भारतानी जाहीर केलं होतं पण यामुळे जगभरात भारताकडे आदरानी पाहिलं जाऊ लागलं. चीन अण्वस्त्रधारी झाला होता. इंदिराजींनी संशोधकांना प्रोत्साहन देऊन संशोधन संस्था उभारल्या. देशाचा अणू कार्यक्रम निश्चित केला.

loading image
go to top