मुलाच्या मोबाईल पराक्रमाने वडीलांना बसला धक्का

वृत्तसंस्था
Friday, 6 September 2019

एका दहा वर्षाच्या मुलाने मोबाईल गेम खेळत असताना वडीलांच्या बॅंक खात्यातून पैसे उडवले आहेत.

लखनौ (उत्तर प्रदेश): एका दहा वर्षाच्या मुलाने मोबाईल गेम खेळत असताना वडीलांच्या बॅंक खात्यातून 35 हजार रुपये उडवले आहेत. मुलाच्या मोबाईल पराक्रमाने वडीलांना मात्र धक्का बसला आहे.

पाचवीमध्ये शिकत असलेला मुलगा गेम खेळण्यासाठी वडीलांच्या मोबाईलचा वापर करत होता. नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी त्याने वडीलांच्या बँक खात्याचा वापर सुरू केला. वडीलांच्या बँक खात्यामधून पैसे जाऊ लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. बँक खात्याचे स्टेटमेंट काढले तेव्हा त्यांना धक्का बसला. आपण खरेदी न करताही पैसे खात्यावरून गेल्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांच्या सायबर सेलने शोध सुरू केला. त्यावेळी ज्या नंबरवर पैसे ट्रान्सफर झाले आहेत तो त्यांचाच नंबर असल्याची माहिती पुढे आले. सायबर सेलने मुलाची चौकशी केली तेव्हा त्याने गेम खेळताना पैसे उडाल्याची कबुली दिली.

मुलाने वडीलांच्या तीन खात्यातील पैसे उडवले. त्याने तयार केलेल्या पेटीएम वॉलेटमध्ये दहा हजार रुपये बाकी होते. ते पैसे पोलिसांनी बँकेत ट्रान्सफर केले आहेत. दरम्यान, मुलाच्या पराक्रमाने वडीलांना धक्का बसला असून, त्यांनी तक्रार मागे घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 year old son take 35 thousand from fathers bank account for playing online mobile games in up