
आगामी काळात आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार संयुक्त किसान मोर्चाने व्यक्त केला आहे. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये निवडणुकीच्या रिंगणात सक्रियप्रणे उतरण्याचा शेतकरी नेत्यांचा निर्णय त्याचेच द्योतक मानले जाते.
नवी दिल्ली- मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या आंदोलनाला 100 दिवस झाल्यानिमित्त शनिवारी केएमपी (कुंडली मानेसर पलवल) एक्स्प्रेस वेवर 5 तास नाकाबंदी केला जाणार आहे. तसेच आज काळा दिवस पाळला जाणार आहे. त्याचबरोबर डासना, दुहाई, बागपत, दादरी, ग्रेटर नोएडावर चक्का जाम केला जाईल. सर्व आंदोलक शेतकरी काळी पट्टी बांधून विरोध दर्शवतील. टोल नाकेही खुले ठेवले जाणार आहेत. आगामी काळात आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार संयुक्त किसान मोर्चाने व्यक्त केला आहे. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये निवडणुकीच्या रिंगणात सक्रियप्रणे उतरण्याचा शेतकरी नेत्यांचा निर्णय त्याचेच द्योतक मानले जाते.
दरम्यान, टीकरी व सिंघू सीमांवरील शेतकऱ्यांची संख्या कमी होत चालल्याची माहिती दिशाभूल करणारी असल्याचा दावा नेत्यांनी केला आहे. पहिल्या दिवसापासून शेतकरी या आंदोलनात जाऊन-येऊन सहभाग नोंदवत असून आजही सीमांवरील आंदोलकांची संख्या सध्याही उत्साहवर्धक असल्याचे संयुक्त किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ आदी राज्यांतील शेतकरीही आंदोलनात सहभागी असल्याने हे आंदोलन फक्त दोन-अडीच राज्यांचे असल्याचा सरकारचा दावा पोकळ आहे, असेही सांगण्यात येते.
दिल्लीशिवाय मध्य प्रदेशमधील छत्तरपूरमध्येही 87 दिवसांपासून शेतकरी धरणे आंदोलन करत आहेत. पोलिस प्रशासनाने आतापर्यंत त्यांना तंबू लावण्याची परवानगी दिलेली नाही. संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यानी कीर्ति किसान यूनियन आणि दिवंगत कॉम्रेड दातारसिंह यांच्या आंदोलनातील योगदानासाठी श्रद्धांजली वाहण्यात आली. कीर्ति किसान यूनियनचे अध्यक्ष दातार सिंह यांचा 21 फेब्रुवारी 2021 रोजी अमृतसर येथील एका सार्वजनिक बैठकीत हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले होते. 26 नोव्हेंबर 2020 ला पंजाब आणि हरियाणातून निघालेला शेतकऱ्यांचा जत्था दिल्लीकडे निघाला.
हेही वाचा- मनसुख हिरेन क्रॉफर्ड मार्केटला कुणाला भेटायला गेलेले, महत्त्वाची माहिती आता आली समोर
दरम्यान, आंदोलनातील महिलांची संख्याही वाढताना दिसत आहे. हरियाणातील जिंद, अंबाला, पानिपत, सोनीपत आदी विविध ठिकाणांहून पारंपारिक वेशात महिला शेतकऱ्यांचे जत्थे पुन्हा सीमांवर येऊ लागले आहेत. पंजाबमधून ट्रॅक्टर घेऊन युवा शेतकरी व महिला शेतकऱ्यांचीही संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे.