चित्रपटगृहे आजपासून पूर्णक्षमतेने; कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन आवश्‍यक

वृत्तसंस्था
Monday, 1 February 2021

आजपासून (ता. १) पूर्ण प्रेक्षक क्षमतेने चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.चित्रपटगृहे सुरू करण्यात आली असली तरी, सुरक्षित अंतराच्या निकषामुळे केवळ ५० टक्केच प्रेक्षकांना बसण्याची मुभा होती.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाचे संकट आणि प्रेक्षक बंदीमुळे आर्थिक झळ सोसणाऱ्या चित्रपट उद्योगाला दिलासा देण्यासाठी सरकारने आजपासून (ता. १) पूर्ण प्रेक्षक क्षमतेने चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन मागे घेतल्यानंतर चित्रपटगृहे सुरू करण्यात आली असली तरी, सुरक्षित अंतराच्या निकषामुळे केवळ ५० टक्केच प्रेक्षकांना बसण्याची मुभा होती.

गृहमंत्रालयाने आधी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटहांमध्ये सुरक्षित अंतराचा निकष पाळण्यासाठी दोन प्रेक्षकांमधील खुर्ची रिकामी ठेवणे बंधनकारक केले होते. चित्रपटगृहांमधील या मर्यादित प्रेक्षक संख्येमुळे चित्रपट निर्मात्यांनीही नवे चित्रपट प्रदर्शित करण्यात फारशी रुची न दाखविल्याने चित्रपटगृह चालकांची आर्थिक हानीची तक्रार होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केंद्राच्या या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की देशभरात एक फेब्रुवारीपासून चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत चालविण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, चित्रपटगृहांमध्ये सर्व निकषांचे पालन करणे बंधनकारक असेल. अर्थात, तिकीटखिडकीवर प्रेक्षकांची गर्दी वाढू नये यासाठी ऑनलाइन बुकींगला प्रोत्साहन द्यावे,  सामाजिक सुरक्षेच्या निकषांचे पालन करण्यासाठी दोन खेळांमध्ये काही वेळाचे अंतर असेल.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘तांडव’ वेबसिरिजच्या वादामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल मिळणाऱ्या तक्रारींचीही दखल सरकारने घेण्याचे ठरविले आहे. याबाबत जावडेकर यांनी सांगितले, की ‘काही मालिकांबद्दलच्या तक्रारी आल्या आहेत. याची दखल घेण्यात आली आहे. ‘ओटीटी’वरील चित्रपट, कार्यक्रम, डिजिटल वृत्तपत्रे यावर प्रेस कौन्सिल, केबल टेलिव्हिजन, सेन्सर बोर्डाचे कायदे लागू होत नसल्याने त्यांच्या संचलनासाठी लवकर नवी व्यवस्था आणली जाईल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चित्रपटगृहांसाठी नव्या सूचना 
सामाजिक सुरक्षेचा निकष महत्त्वाचा
फेसमास्क, स्वच्छता, ‘आरोग्य सेतू अॅप’ आवश्यक 
चित्रपट गृहातील प्रवेशद्वार आणि बाह्यद्वार याठिकाणी थर्मल स्क्रिनिंग 
कान्टॅक्ट ट्रेसिंगसाठी तिकीट काढताना प्रेक्षकांचा मोबाईल नंबरही घेणार
राज्य सरकारांनाही अतिरिक्त उपाययोजनांचे अधिकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 occupancy cinema halls theatres from 1st feb