दहावीतील विद्यार्थ्याशी पाच कोटींचा करार 

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

गुजरात सरकारचा पुढाकार; जमिनीत पेरलेल्या सुरुंगांचा

शोध घेणाऱ्या "ड्रोन'ची निर्मिती 

गुजरात सरकारचा पुढाकार; जमिनीत पेरलेल्या सुरुंगांचा

शोध घेणाऱ्या "ड्रोन'ची निर्मिती 

अहमदाबाद : "व्हायब्रेट गुजरात' आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वांचे लक्ष दहावीत शिकणाऱ्या हर्षवर्धन झाला (वय 14) या बुद्धिमान मुलाने वेधून घेतले. त्याने "ड्रोन'ची निर्मिती केली असून, राज्य सरकारने त्याच्याशी पाच कोटींचा सहकार्य करार गुरुवारी केला. 
युद्धभूमीत पेरलेले भूसुरुंग शोधून नष्ट करण्यास मदत करणारा "ड्रोन' त्याने तयार केला आहे. याची व्यावसायिक पातळीवर निर्मिती करण्यासाठी गुजरात सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने हर्षवर्धनबरोबर पाच कोटी रुपयांचा करार केला आहे. बापूनगरमधील सर्वोदय विद्यामंदिरमध्ये हर्षवर्धन दहावीत शिकत आहे. त्याला लहानपणापासून विज्ञान विषयात रस असून, नवनवे शोध लावण्याची आवड आहे. त्याच्या या आवडीला पालकांकडूनही प्रोत्साहन मिळते. 

तो म्हणाला, ""भूसुरुंग नष्ट करताना अनेक जवान जखमी होतात, अशा आशयाची बातमी मी टीव्हीवर पाहिली. तेव्हापासून भूसुरुंगांचा शोध घेऊन ते नष्ट करणाऱ्या "ड्रोन'ची निर्मिती करण्याचा ध्यास मी घेतला. तशा ड्रोनचे नमुने तयार करण्याचे काम मी गेल्यावर्षीपासून सुरू केले. यासंदर्भात व्यावसायिक योजनाही तयार केली.'' "ड्रोन'चे तीन नमुने तयार करण्यास हर्षवर्धनला सुमारे पाच लाख रुपये खर्च आला. यातील दोन लाख रुपये पालकांनी दिले, तर तिसऱ्या "ड्रोन'साठी राज्य सरकारने तीन लाखांचे अनुदान दिले. 

विशिष्ट प्रकारचे कार्य करणाऱ्या या "ड्रोन'च्या पेटंटसाठी त्याने नोंदणी केली असून, "एरोबोटिक्‍स' या नावाने कंपनीची नोंदही केली आहे. "मी माझ्या पद्धतीने "ड्रोन'ची बांधणी सुरू केली असून, मुख्यालयाशी संपर्क साधण्यासाठी यंत्रणाही उभारली आहे; पण यापेक्षा खूप काही करणे आवश्‍यक असल्याचे माझ्या लक्षात आल्याने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. या "ड्रोन'ची अधिकृत नोंदणी झाल्यानंतर मी माझ्या अनेक योजना अमलात आणू शकेन. 

अशी आहे "ड्रोन'ची रचना 
हर्षवर्धन म्हणाला की, अवरक्त किरण, "आरजीबी' सेन्सर व औष्णिक मीटरसह 21 मेगापिक्‍सेल क्षमतेचा कॅमेरा अशी यंत्रणा या "ड्रोन'मध्ये आहे. कॅमेऱ्याची उघडझाप यांत्रिक पद्धतीने यात होते व अत्यंत उच्च दर्जाचे छायाचित्रण करता येते, अशी माहिती हर्षवर्धनने दिली. जमिनीपासून दोन किलोमीटर उंचीवरून फिरत असताना "ड्रोन'मधून आठ चौरस कि.मी. क्षेत्रापर्यंत किरण सोडले जाऊ शकतात. यामधून भूसुरुंगांचा शोध घेतला जाईल. ते ठिकाण निश्‍चित करून त्याची माहिती मुख्यालयापर्यंत पोचविली जाईल. या पद्धतीने कार्य करणाऱ्या या "ड्रोन'मध्ये 50 ग्रॅम वजनापर्यंत स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. भूसुरुंग निकामी करण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. सुरक्षा यंत्रणांकडून या "ड्रोन'ची चाचणी होऊन त्याचे उत्पादन सुरू व्हावे, अशी हर्षवर्धनची इच्छा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10th student five crore contract

फोटो गॅलरी