वडिलांची तक्रार करण्यासाठी 11 वर्षीय मुलगी 10 किलोमीटर चालली; कारण वाचून येईल राग

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 18 November 2020

एक 11 वर्षीय मुलीने 10 किलोमीटर चालून आपल्या वडिलांविरोधात तक्रार दाखल केल्याची घटना ओडिशाच्या एका गावात घडली आहे.

भूवनेश्वर- एक 11 वर्षीय मुलीने 10 किलोमीटर चालून आपल्या वडिलांविरोधात तक्रार दाखल केल्याची घटना ओडिशाच्या एका गावात घडली आहे. मुलीने केंद्रापारा जिल्हाधिकाऱ्यांना आपली लिखित तक्रार दिली आहे. वडील जबरदस्तीने मध्यान्ह भोजनाचे पैसे आणि तांदूळ तिच्याकडून घेत असल्याची तक्रार मुलीने केली आहे. मुलीच्या आईचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले आणि आता तिची काळजी घेण्यास ते नकार देत असल्याचे तिचं म्हणणं आहे. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकार मध्यान्य भोजनाचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करत आहे. शिवाय काही तांदूळ मुलांना देत आहे. पण, यातील काहीही मिळत नसल्याचं मुलीनं म्हटलं आहे. बँक खाते आहे, पण शाळा प्रशासन मध्यान्ह भोजनाचे पैसे वडिलांच्या खात्यावर टाकत असल्याचा दावा मुलीने केला आहे. वडील पैसे घेतल्याचं नाकारत असल्याचं मुलीने म्हटलंय. 

शहीद राजगुरु यांच्या जन्मस्थळी दीपोत्सव; जाणीव परिवाराचा उपक्रम

केंद्रापारा जिल्हाधिकारी समर्थ वर्मा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुलीची तक्रार ऐकून मी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याला district education officer (DEO) मध्यान्ह भोजनाचे पैसे थेट तिच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, वडिलांकडून पैसे परत मिळवण्यासाठी आणि तांदूळ परत घेण्यासाठी जिल्हा शिक्षण अधिकारी योग्य ते पाऊलं उचलतील, असं वर्मा म्हणालेत. 

जिल्हा शिक्षण अधिकारी संजब सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार मध्यान्ह भोजनाचे पैसे मुलीच्या खात्यामध्ये जमा केल्याचे सांगितले. तसेच मुलीच्या वडिलांकडून पैसे परत मिळवण्यासाठीही योग्य ती पावलं उचलली जात आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकाला विद्यार्थ्यांशिवाय इतर कोणालाही तांदूळ न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे ओडिशा सरकारने विद्यार्थ्यांना 150 ग्रॅम तांदूळ आणि दररोज 8.10 रुपये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. महिन्याला विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसै टाकले जात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 yr old girl lodge complaint against her father in odisa