साडेबारा हजार आयुष आरोग्य केंद्रांची स्थापना करणार : पंतप्रधान

सकाळ न्यूज नेटवर्क 
Friday, 30 August 2019

'आयुष' व 'योगा' हे "फिट इंडिया" चळवळीचे महत्वाचे स्तंभ आहेत, असे सांगतानाच देशभरात पुढच्या 3 वर्षांत 12 हजार 500 आयुष आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

नवी दिल्ली : 'आयुष' व 'योगा' हे "फिट इंडिया" चळवळीचे महत्वाचे स्तंभ आहेत, असे सांगतानाच देशभरात पुढच्या 3 वर्षांत 12 हजार 500 आयुष आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. केवळ या वर्षात 4000 केंद्रे स्थापन करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

आयुष मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवनात योगाच्या प्रचार प्रसारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री योग पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. नाशिक येथील योगाचार्य डॉ विश्वास मंडलिक आणि मुंबई येथील"द योगा इन्स्टिट्यूटला' देखील गौरविण्यात आले. प्रत्येकी 25 लाख रूपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक आणि मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा यावेळी मंचावर उपस्थित होते. योग प्रचार व प्रसार कार्यात उल्लेखनीय योगदान देणा-या देश-विदेशातील व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला. मोदींनी यावेळी योगप्रसाराला जीवन वाहणाऱ्या 12 नामवंतांच्या नावाने टपाल तिकीटांचेही प्रकाशन केले. आपल्या फिटनेसचे श्रेय योग, प्राणायाम व आयुर्वेदास असल्याचेही मोदी म्हणाले. प्राचीन ज्ञानाची सांगड आधुनिकतेशी घातणे गरजेचे आहे, असे सांगितले.

महात्मा गांधींनी निसर्गोपचार हा जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे म्हटले होते, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधले. अन्य विजेत्यांमध्ये गुजरातच्या लाइफ मिशनचे स्वामी राजर्षि मुनि, व्यक्तिगत-अंतरराष्ट्रीय गटात इटलीच्या योगशिक्षिका एंतोइत्ता रोजी, राष्ट्रीय गटात बिहार स्कूल ऑफ योग, मुंगेर व आंतरराष्ट्रीय संघटना गटात जपान योग निकेतन यांचा समावेश आहे. 

नाशिक येथे योगाचार्य डॉ. मंडलिक यांनी गुरुकुल पध्दतीने योगाचा प्रसार केला आहे. हटयोग, उपनिषद आणि भगवतगीतेचा अभ्यास व संशोधन करून ते गेल्या वर्षांपासून योगाभ्यासाचे धडे देत आहेत. डॉ. मंडलिक यांनी 1978 मध्ये योग विद्या धाम या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी गुरुकुल पध्दतीने योगाचा देश-विदेशात प्रचार व प्रसार केला.

देशभरात या संस्थेचे एकूण 116 तर परदेशात 16 केंद्रे आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून पाच लाख लोकांनी योगाचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी योगाच्या प्रचार व प्रसारासाठी विविध पुस्तकही लिहीली आहेत. 

मुंबईतील सांताक्रुझ भागात 1918 मध्ये स्वामी योगेंद्र यांनी "द योग इन्स्टिटयूट'ची स्थापना केली. योग प्रचार व प्रसारासाठी कार्यरत या संस्थेने 1 कोटी लोकांना योगाभ्यासासाठी प्रेरीत केले. या संस्थेने देश- विदेशात 55 हजारांहून अधिक योगशिक्षक घडविले आहेत. संस्थेने योग विषयक माहितीची 50 पेक्षा अधिक प्रकाशने प्रकाशित केली आहेत. एनसीईआरटीच्या योग विषयक अभ्यासक्रम निर्मितीत संस्थेचे मोलाचे योगदान आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12500 AYUSH health centers to be set up soon says Narendra Modi