
अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड, बचावासाठी गेलेल्या बॉक्सरची हत्या
हरयाणामधील रोहतक येथे 24 वर्षीय राज्य पातळीवरील बॉक्सरची चाकूनं भोकसून हत्या करण्यात आली आहे. कारण, त्या बॉक्सरनं 12 वर्षीय मुलीसोबत छेडछाड करणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. रोहतक पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या राज्य स्थरावरील बॉक्सरचं नाव कामेश असं आहे. बॉक्सिंगशिवाय कामेश मॉडेलिंग आणि अभनियातही आपलं नशीब अजमावत होता. पण सोमवारी रात्री कामेशची चाकूनं भोकसून हत्या करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कामेश आपल्या कुटुंबासोबत तेज कॉलनीमधील आपल्या नातेवाईकाकडे गेला होता. त्यावेळी तिथे काही तरुण 12 वर्षाच्या मुलीसोबत छेडछाड करत होते. कामेशनं त्या तरुणांना असं कृत्य करु नका असं सांगितलं. त्यानंतर त्यांच्यासोबत कामेशचं चांगलेच वाजलं. आरोपींनी चाकूनं भोकसून कामेशची हत्या केली.
रोहतक पोलिस उपाध्यक्षक गोरखपाल म्हणाले की, आरोपींनी अचानक चाकू काढून कामेशवर वार केले. जखमी अवस्थेत कामेशला उपचारासाठी रोहतकमधील पीजीआयएमएस रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान कामेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी आयपीसी कलम 148, 149 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.