India Corona Update : चिंता वाढली! चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या BF.7 व्हेरिएंटची भारतात एन्ट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 corona updates

India Corona Update : चिंता वाढली! चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या BF.7 व्हेरिएंटची भारतात एन्ट्री

Coronavirus In India : चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे भारतासह जगभरात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाच्या Omicron व्हेरिएंटच्या BF.7 या सब व्हेरिएंटने चीनमध्ये हाहाकार माजवला असून, भारतातही या सब व्हेरिएंटटे तीन रूग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

भारतात आतापर्यंत BF.7 चे दोन रूग्ण गुजरातमध्ये तर एक रूग्ण ओडिशात नोंदवला गेला आहे. यूएस, यूके आणि बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांसह इतर अनेक देशांमध्ये या व्हेरिएंटचे रूग्ण आधीच आढळून आले आहेत.

दरम्यान, बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड आढावा बैठकीत कोविड रूग्णांमध्ये आतापर्यंत वाढ झालेली नसली तरी, नव्या व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या बैठकीनंतर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी नागरिकांना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

चीनमधून येणाऱ्यांची चौकशी सुरू झाली

चीनमधील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. आरोग्य मंत्रालयाने चीनमधून येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

विमानतळांवर आजपासून पुन्हा सुरू होणार कोरोना चाचणी

जगभरातील काही देशांमध्ये वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता आजपासून भारतात दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आजपासून विमानतळांवर रॅन्डम कोरोना चाचाणी केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

काय म्हणाले अदर पुनावाला...

दरम्यान, चीनमधील वाढत्या रूग्णसंख्येत कोविशील्ड लस निर्माते अदर पुनावालांनी ट्वीट करत मोठं विधान केले आहे. पुनावाला म्हणाले की, चीनमध्ये कोरोनाची संख्या पुन्हा एकदा वाढणे चिंताजनक आहे. मात्र, कोरोना विरोधातील भारतात झालेले लसीकरण आणि ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता वाढत्या रूग्णसंख्येत भारतीयांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाहीये. परंतु, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर विश्वास ठेवून त्याचे पालन करणे आवाहन पुनावाला यांनी नागरिकांना केले आहे.

टॅग्स :Coronavirus