फुल विक्रेत्याच्या खात्यात जमा झाले 30 कोटी रुपये; अन्...

वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

  • पत्नीच्या नावावर बेहिशेबी पैसे जमा झाल्याचा धक्का

बंगळूर : पत्नीच्या बॅंक खात्यात 30 कोटी रुपये जमा झाल्याचे आढळल्याने कर्नाटकमधील छन्नपटणा गावातील एक फुले विक्रेत्याचे डोळे पांढरे झाले. गेल्या वर्षी 2 डिसेंबर रोजी घडलेली ही घटना नुकतीच उघडकीस आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सईद मलिक बुऱ्हाण असे फुले विक्रेत्याचे नाव असून, कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चासाठी पैशांची जमवाजमव करण्याच्या चिंतेत तो होता. अशा वेळी 2 डिसेंबरला बॅंक अधिकारी त्याच्या दारात उभे राहिले. त्याच्या पत्नीच्या खात्यात 30 कोटी रुपये जमा झाले असून, एवढा पैसा कसा आला, अशी विचारणा त्यांनी बुऱ्हाण याच्याकडे केली. हे ऐकल्यावर बुऱ्हाण याला मोठा धक्का बसला. ही घटना सांगताना तो म्हणाला, की बॅंक अधिकारी आमच्या घराची झडती घेण्यासाठी आले होते. माझी पत्नी रेहाना हिच्या खातात 30 कोटी रुपये जमा झाले असून, तिचे आधार कार्ड घेऊन बॅंकेत येण्यास त्यांनी सांगितले. कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी त्यांनी माझ्यावर दडपण आणले; पण मी त्याला नकार दिला, असेही तो म्हणाला.

जगभरात कोरोनाची दहशत, आतापर्यंत एवढ्या जणांचा मृत्यू; तर...

ऑनलाइन पोर्टलवरून एक साडी घेतली तेव्हा बॅंकेची माहिती विचारणारा फोन आला होता, अशी आठवण त्याने सांगितली. त्यानंतर मोटार बक्षीस लागल्याने बॅंक खात्याची माहिती हवी असल्याचे फोनवरून सांगण्यात आले. आमच्याकडे फक्त 60 रुपये होते, त्यामुळे एवढी मोठी रक्कम खात्यात कशी आली याचा शोध घेत असल्याचे बुऱ्हाण याने सांगितले.

काश्मीरमध्ये चकमक; तीन दहशतवादी ठार

यासंबंधी प्राप्तिकर खात्याकडे तक्रार नोंदविली असून त्यांनी सुरुवातीला तपास करण्याकडे दुर्लक्ष केले, असा दावा बुऱ्हाणने केला. त्याच्या फिर्यादीवरून छन्नपटणा पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली फसवणूक आणि तोतयेगिरीचा गुन्हा दाखल केला आहे. बुऱ्हाणच्या खात्यातून अनेक वेळा आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याच्या खात्यात एवढे पैसे कोठून आले याचा आम्ही शोध घेत आहोत. या मागे जो कोणी असेल त्याला आम्ही अटक करू, असे छन्नपटणाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 cr gets credited in flower vendors wife bank account in karnataka