esakal | तेलंगणमध्ये पावसामुळे दैना; बळींची संख्या ३१ वर
sakal

बोलून बातमी शोधा

Telangana and Andhra Pradesh

गेल्या दोन दिवसांपासून हैदराबाद आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. आज सकाळी काहीप्रमाणात पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

तेलंगणमध्ये पावसामुळे दैना; बळींची संख्या ३१ वर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

हैदराबाद - तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात पावसाने हाहाकार माजवला असून तेलंगणमध्ये विविध दुर्घटनेत आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी हैदराबादसह अन्य शहरात रस्त्याला नाल्याचे रुप आले आणि असंख्य मोटारी पाण्याखाली गेल्या. मदतीसाठी काही भागात लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले आहे. हैदराबादच्या मोहंमदिया हिल्स भागात संरक्षक भिंत दहा घरांवर पडल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्‍वासन दिले.

गेल्या दोन दिवसांपासून हैदराबाद आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. आज सकाळी काहीप्रमाणात पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. कालच्या पावसात हैदराबादच्या बडकास भागात एक व्यक्ती पाहता पाहता वाहून गेला. त्याचवेळी दोघे उंचावरील मार्गाचा शोध घेत सुरक्षित ठिकाणी पोचल्याचा प्रकार घडला. आतापर्यंत किमान पाच जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. हैदराबादच्या बंजारा हिल्स भागात निसर्गोपाचार रुग्णालय चालवणाऱ्या ४९ वर्षीय व्यक्तीला विजेचा जबर धक्का लागला. तो तळमजल्यात शिरलेले पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याचवेळी धक्का बसला. विजेचे खांब पडल्यामुळे विजपुरवठा खंडित झाला. तेलंगण शहरी विकास मंत्री के.टी.रामाराव यांनी तेलंगणा राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आणि त्यांनी तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत सूचना दिल्या. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गाड्या वाहून गेल्या
पावसामुळे जुन्या हैदराबादेत पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. रस्त्यावर पाणी आल्यामुळे गाड्या पाण्याखाली गेल्या. पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की, गाड्या त्याबरोबर वाहत गेल्या.

हजारो एकर शेत पाण्याखाली
राज्यात हजारो एकर शेत पाण्याखाली गेले. एनडीआरएफ आणि लष्कराला मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. लष्कराने बंदलगुडा भागात मदतीसाठी तुकडी रवाना केली. एनडीआरएफने हैदराबाद आणि रंगारेड्डी जिल्ह्यात एक हजाराहून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. दरम्यान, राज्यात बुधवारी आणि गुरुवारी सुटी जाहीर करण्यात आली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिवसभरात
  राज्यात ६१ ठिकाणी मदतकेंद्राची उभारणी. वैद्यकीय, ब्लँकेटचा पुरवठा
  पूरग्रस्त भागात दीड लाखांच्या अन्नपाकिटाचे वितरण
  हैदराबादेतील अनुदानित अन्नपूर्णा कॅन्टिनकडूनही भोजनाची व्यवस्था
  वारंगल जिल्ह्याचा बालकल्याण मंत्री सत्यवती राठोड यांच्याकडून आठावा
  ग्रेटर हैदराबादला शहरविकास मंत्री केटीआर यांची भेट
  खासदार असदद्दुद्दीन ओवेसींकडून जुन्या हैदराबादला भेट.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधानांचा दूरध्वनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ट्विटरवर तेलंगण आणि आंध्रातील भीषण स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे.

पाच हजार कोटींचे नुकसान
दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे तेलंगण राज्याचे सुमारे ५ हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जाहीर केले. त्यामुळे केंद्र सरकारने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी १३५० कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे केली आहे.