81 वर्षांच्या वृद्धाचा गेटअप करून 'तो' निघाला अमेरिकेला, पण...

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

32 वर्षांच्या युवकाने वृद्ध दिसण्यासाठी केस पांढरे करण्यासोबत झीरो नंबरचा चष्माही घातला होता. तो व्हीलचेअरवर होता. टर्मिनल-3 वर अंतिम सुरक्षा तपासणी करण्यासाठी त्याला खुर्चीतून उठायला सांगितले. मात्र, त्याने नकार दिला. तसेच वरिष्ठ निरिक्षक राजवीर सिंह यांच्यासोबत बोलताना डोळ्यात डोळे घालत नव्हता. यामुळे त्यांना संशय आला आणि त्याचे बिंग फुटले. 

नवी दिल्ली : एक 32 वर्षांचा युवक 81 वर्षांच्या वृद्धाचा गेटअप करून न्यूयॉर्कला जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याचे बिंग फुटले आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

32 वर्षांच्या युवकाने वृद्ध दिसण्यासाठी केस पांढरे करण्यासोबत झीरो नंबरचा चष्माही घातला होता. तो व्हीलचेअरवर होता. टर्मिनल-3 वर अंतिम सुरक्षा तपासणी करण्यासाठी त्याला खुर्चीतून उठायला सांगितले. मात्र, त्याने नकार दिला. तसेच वरिष्ठ निरिक्षक राजवीर सिंह यांच्यासोबत बोलताना डोळ्यात डोळे घालत नव्हता. यामुळे त्यांना संशय आला आणि त्याचे बिंग फुटले. धक्कादायक म्हणजे त्याने इमिग्रेशनच्या डोळ्यांत धूळ फेकत क्लिअरन्सही मिळविला होता. हा युवक अहमदाबादचा राहणारा आहे. सीआयएसएफने त्याला पोलिसांच्या हवाली केला आहे.

आरोपी जयेश पटेल हा सिंह यांनी त्याचा पासपोर्ट पाहिला. त्यावर जन्म दिनांक 1 फेब्रुवारी 1938 नोंद होती. यानुसार या आरोपीचे वय 81 होत होते. दाढी, केस आणि पेहराव वृद्धाचा केला असला तरीही त्याच्या चेहऱ्यावरील त्वचा वृद्धाची वाटत नव्हती. यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याने खरे सांगितले. जयेश पटेल हा दुसऱ्याच्या पासपोर्टवर अमेरिकेला जात होता. त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे सीआयएसएफने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 32 years old turns up as 81 years old to take flight to New York