भाजपची ताकद आणखीन वाढणार; चार खासदारांनी केला प्रवेश

सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 20 जून 2019

- तेलुगू देसम पक्षाच्या खासदारांनी केला भाजपमध्ये प्रवेश.

- चंद्राबाबूंना मोठा धक्का.

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी उभा दावा मांडलेले तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या पक्षाच्या चार खासदारांनी "टाटा' करून भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यसभेतील "टीडीपी'च्या सहा खासदारांपैकी वाय. एस. चौधरी, टी. जी. वेंकटेश, सी. एम. रमेश आणि जी. एम. राव हे चार खासदार भाजपमध्ये आल्याने पक्षाचे वरिष्ठ सभागृहातील बळ वाढलेले आहे. 

या चौघांनी पक्षत्याग करून तेलुगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांना "दे धक्का' केले. या चारही खासदारांनी आपला राजीनामा राज्यसभा अध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्याकडे सुपूर्द केला. यातील वेंकटेश हे नायडू यांच्या आमदारकीच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजप युवा मोर्चात सक्रिय होते. तेलुगू देसममधील ताज्या फुटीचा वाद न्यायालयात जाण्याची चिन्हे आहेत. संसदीय पक्ष म्हणजे लोकसभा व राज्यसभेतील खासदार मिळून धरले जाते. त्यानुसार सध्या या पक्षाचे नऊ खासदार आहेत. त्यातील चौघे गेले, तरी त्यांच्या भाजपप्रवेशाला पक्षांतरबंदी कायद्यानुसार आव्हान दिले जाणार आहे.

भाजप आघाडीस राज्यसभेत अद्याप बहुमत नाही व पुढील वर्षी 70 हून जास्त नवीन सदस्य येईपर्यंत ते मिळणारही नाही. मात्र, राज्यसभा ताब्यात घेण्याची भाजपनेतृत्वाला विलक्षण घाई झाल्याचे द्योतक म्हणून तेलुगू देसममधील फुटीकडे पाहिले जाते. भाजपच्या दाव्यानुसार पक्षांतर बंदी कायद्यानुसार, एका पक्षाच्या दोन तृतीयांश सदस्यांनी दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिल्यास ते वैध ठरते व भाजपने हा निकष केवळ राज्यसभेपुरता लावला आहे. त्यामुळे तेलुगू देसमच्या सदस्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होऊ शकत नाही, असाही पक्षाचा दावा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 TDP Rajya Sabha MPs switch over to BJP