खासदार नुसरत जहाँच्या पतीला 45 हजारांचा गंडा

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जुलै 2019

खासदार झाल्यानंतर गेल्या महिन्यात अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी कोलकात्यातील उद्योगपती निखिल जैन यांच्याशी लग्न केले होते. हा लग्न सोहळा तुर्कीतील बोडरम शहरात पार पडला.

कोलकाता : व्हीआयपी मोबाईल क्रमांकाचा अट्टाहास अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ यांचे पती उद्योगपती निखिल जैन यांना चांगलाच महागात पडला. या प्रकरणी एकाने जैन यांची 45 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जैन यांनी याबाबत पोलिस चौकीत तक्रार दाखल केली असून अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

खासदार झाल्यानंतर गेल्या महिन्यात अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी कोलकात्यातील उद्योगपती निखिल जैन यांच्याशी लग्न केले होते. हा लग्न सोहळा तुर्कीतील बोडरम शहरात पार पडला. परवाच त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी झाली होती. त्याच्या एक दिवस अगोदरच जैन यांनी याप्रकरणी कोलकाता सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील जैन यांच्यासोबत शहरातील अनेकांनी यासंबंधीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी अनेकांना मोबाईलच्या व्हीआयपी नंबरबाबत मॅसेज पाठवण्यात आले होते. हा मॅसेज एका टेलिकॉम कंपनीतील अधिकाऱ्यांच्या ईमेलद्वारे पाठवण्यात आले होते. जर तुम्हाला व्हीआयपी नंबर हवा असेल, तर त्यासाठी एका खात्यात 45 हजार रुपये जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार अनेकांनी संबंधित खात्यात 45 हजार रुपये जमा केले होते, परंतु व्हीआयपी नंबर न मिळाल्याने दिल्लीतील सॉल्ट लेक परिसरात काही उद्योगपतींनी याबाबत तक्रार दाखल केली. तसेच कोलकात्यातील अनेकांनी फसवणूक झाली असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. 

ज्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगण्यास आले होते, ते बँक खाते गुजरातमधील बडोदा शहरातील सुभानपुरा भागातील आहे. दिल्ली सायबर सेलने याप्रकरणी चौकशीही सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील अक्षयकुमार अग्रवालला उद्योगपतींची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 45 thousand cheating of Nusrat Jahans husband