5G Network : ‘जीडीपी’त दोन टक्के योगदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

5G technology

5G Network : ‘जीडीपी’त दोन टक्के योगदान

नवी दिल्ली : देशात नुकत्याच दाखल झालेल्या फाइव्ह-जी मोबाईल नेटवर्क सेवेमुळे आगामी काळात जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनात दूरसंचार क्षेत्राचे योगदान लक्षणीयरीत्या वाढेल, असा विश्वास नॅसकॉमने व्यक्त केला आहे. २०३० पर्यंत या क्षेत्राचे जीडीपीतील योगदान दोन टक्के म्हणजे सुमारे १८० अब्ज डॉलरने वाढेल, असे नॅसकॉमने म्हटले आहे.

अद्याप सुरवातीच्या टप्प्यात असलेली ही सेवा टप्प्याटप्प्याने देशात दाखल केली जात आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात इंटरनेटचा वापर अधिक वेगाने होत असून, फाइव्ह-जीमुळे त्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. देशात सध्या सुमारे ७४ कोटी फोर-जी ग्राहक आहेत, तर एक कोटी सक्रिय फाइव्ह-जी मोबाइल हँडसेट आहेत. २०२५ पर्यंत फाइव्ह-जी कनेक्शनची संख्या चार अब्जांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. हे प्रमाण सर्व प्रकारच्या एकूण मोबाइल नेटवर्क वापरकर्त्यांपैकी ३५ टक्के आहे.

भारतीय बाजारपेठेतील विविध क्षेत्रे फाइव्ह -जी सेवांद्वारे नवीन सेवासुविधांची अपेक्षा करत आहेत. यामुळे शेतीचे उत्पादन वाढवण्यापासून ते रुग्णालयांवरील भार कमी करण्यापर्यंत अनेक बाबींमध्ये या सेवेचा उपयोग होऊ शकतो, असेही नॅसकॉमच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान सर्वसामान्य भारतीयांसाठी परवडणारे, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास आणू शकते.

तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागात उच्च दर्जाची आरोग्यसेवा पोहोचवू शकते. त्यामुळे याचा वापर विविध क्षेत्रात वाढेल. परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारे मोबाईल हँडसेटस, स्वस्त इंटरनेटसेवा यामुळे वापर वाढत असून नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्कसारख्या धोरणांमुळे फाइव्ह-जीच्या वापराला चालना मिळत आहे. देशात देशात फाइव्ह-जी डिव्हाइसेस जागतिक उत्पादन केंद्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने निर्यातीतही वाढ होईल, असेही नॅसकॉमने म्हटले आहे.