60 वर्षीय आजोबा सायकलवरुन आंदोलनस्थळी; हजार किमी अंतर कापून शेतकऱ्यांना पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 December 2020

देशाची राजधानी दिल्लीच्या वेगवेगळ्या बॉर्डरवर पंजाब-हरियाणाचे शेतकरी गेल्या 26 नोव्हेंबरपासून सलग केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली : एक 60 वर्षांचे आजोबा हे सलग 11 दिवस सायकल चालवून शेतकरी आंदोलनाला पांठिंबा देण्यासाठी पोहोचले आहेत. सत्यदेव मांझी असं या आजोबांचं नाव असून ते बिहारमधील सीवान जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सलग 11 दिवस सायकल चालवून त्यांनी तब्बल एक हजार किमीचं अंतर पार पाडलं आहे. आपल्या गावापासून ते दिल्ली-हरियाणा सीमेवरील टिकरी बॉर्डरच्या परिसरात हे आजोबा आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पोहोचले आहेत. त्यांनी म्हटलंय की, सरकारने हे काळे कृषी कायदे मागे घेतले पाहिजेत.

मांझी यांनी पुढे म्हटलं की, मला माझ्या जिल्हा सीवानमधून इथे पोहोचायला 11 दिवस लागले. मी सरकारला तीन कृषी कायदे मागे घेण्याची विनंती करतो. मी इथे हे आंदोलन संपत नाही तोवर राहणार आहे.

देशाची राजधानी दिल्लीच्या वेगवेगळ्या बॉर्डरवर पंजाब-हरियाणाचे शेतकरी गेल्या 26 नोव्हेंबरपासून सलग केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. सरकारने हे कायदे मागचे घ्यावेत यासाठी अडून बसले आहेत. सरकार आणि शेतकरी संघटनांच्या दरम्यान चर्चेच्या पाच बैठका झाल्या असल्या तरी अद्याप तोडगा निघाला नाहीये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A 60 year old man reaches Tikri at Delhi-Haryana border from Bihar on a bicycle to participate in farmers protest.