पीलीभीत येथे बस आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक; 7 जण ठार, 32 जखमी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

हा अपघात आज पहाटे तीनच्या सुमारास पुरनपूर खुटार महामार्गावर झाला.

लखनऊ- उत्तर प्रदेशमधील पीलीभीत येथे आज (दि.17) पहाटे भीषण अपघात झाला. पीलीभीत येथूल पुरनपूर परिसरात बस आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 32 जण जखमी झाले आहेत. पीलीभीतच्या पोलिस अधीक्षकांनी ही माहिती दिली. ही बस लखनऊ येथील केसरबाग डेपोची होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्याला सुरुवात केली. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

हा अपघात आज पहाटे तीनच्या सुमारास पुरनपूर खुटार महामार्गावर झाला. केसरबाग डेपोची बस प्रवाशांना घेऊन पीलीभीतला जात होती. सेहरामऊच्या नजीक बस आणि पिकअप व्हॅनमध्ये समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर बस आणि पिकअप व्हॅनमधील प्रवाशांच्या किंचाळण्याचा एकच आवाज आला. 

ग्रामस्थ आणि पोलिसांनी त्वरीत मदतकार्य सुरु केले. तोपर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती पोलिस अधीक्षक जयप्रकाश यांनी दिली. बहुतांश प्रवासी हे लखनऊ येथील असल्याचे सांगण्यात येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 dead and 32 injured after a bus and a Bolero collided with each other in Puranpur area up