पर्यायाच्या वाटेवर ‘आप’

राष्ट्रहिताच्या नजरेतून
Aam Aadmi Party Arvind kejriwal
Aam Aadmi Party Arvind kejriwal

सध्याच्या भारतीय राजकारणाचे ३६० अंशांच्या दृष्टिकोनातून आकलन करण्याचा प्रयत्न केल्यास दोन कृती दिसतात. पहिली कृती म्हणजे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, जी अद्याप दक्षिणेत आहे आणि दुसरे म्हणजे आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये सुरू केलेली धडपड. आपण ‘आप’च्या गुजरातमधील धडपडीबद्दल बोलू या. काही वर्षांपूर्वी या स्तंभात दशकातील ‘भारताचे राजकीय स्टार्टअप’ असे वर्णन केले होते आणि काही भाकितेही केली होती. सध्या भारतीय राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे, सक्षम विरोधकांची. त्यावर वादविवाद होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘लार्जर द लाइफ’ प्रतिमेमुळे सध्या तरी सर्वच जागा व्यापलेली दिसते आणि विरोधाचे अवकाश रिकामे दिसत आहे.

‘आप’ आव्हान देऊ शकते

नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखालील भाजपने कितीही वर्चस्व गाजविले आणि सर्वत्र विजय मिळविला, तरी नड्डा हे काही चिनी कम्युनिस्ट पक्ष नाहीत आणि भारत हे चीनसारखे एकपक्षीय राष्ट्र नव्हे किंवा पुतीन यांचा रशियाही नाही. भारतात विरोधकांसाठी नेहमीच मोकळी जागा असेल आणि देशातील अनेक राज्यांत विरोधकांनी मजबूत जागा व्यापली असून, या आव्हानकर्त्यांनी मोदी-भाजपचा अश्वमेध यशस्वीपणे रोखला आहे. असे आव्हानकर्ते नेते आहेत, विशेषत: ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल. या दोघांवरही सर्व प्रकारची अस्त्रे वापरूनही भाजप त्यांना त्यांच्या राज्यात पराभूत करण्यात अपयशी ठरला आहे आणि आठ वर्षांत भाजपला कोणतेही आव्हान नव्हते. ते आव्हान देण्याची भाषा आता आम आदमी पक्ष देऊ लागला आहे.

राष्ट्रव्यापी शब्दाची आमची एक माफक व्याख्या आहे. देशभरात सर्वत्र किंवा एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांचा प्रमुख आव्हानकर्ता पक्ष. भारताच्या राजकीय नकाशावर नजर टाकल्यास काँग्रेसव्यतिरिक्त एकापेक्षा जास्त राज्यांत फारशा कोणत्या बिगर-भाजप पक्षाचे अस्तित्व दिसत नाही. यापैकी काँग्रेसची वाटचाल फक्त अधोगतीच्या दिशेने सुरू आहे. चार वर्षांपासून काँग्रेसचा प्रभाव अधिकच क्षीण होऊ लागला आहे. २०१८ मध्ये छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात विजय मिळवून काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती झेप फार पुढे गेली नाही. त्यामुळे विरोधकांची जागा वेगाने रिकामी होऊन पोकळी निर्माण होत आहे. यासाठी मोदींना दोष देण्यात अर्थ नाही. मात्र, या रिकाम्या जागेत आता ‘आप’ प्रवेश करू लागली आहे. दोन राज्यांव्यतिरिक्त इतर राज्यांत गती घेऊ पाहणारा हा एकमेव पक्ष आहे.

काँग्रेसच्या मतांवर डोळा

राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता असू शकते; पण गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत, तेव्हा तेथे काय होईल, हे सांगता येत नाही. त्यांच्यासाठी पुढील मोठी संधी कर्नाटकात आहे. काँग्रेसची सध्या मुख्य अडचण आहे, ती म्हणजे निवडणूक लक्ष्याशिवाय ते खूप काही करण्याचा प्रयत्न करीत आहेत; तर ‘आप’ ने गुजरातवर लक्ष्य केंद्रित करतानाच काँग्रेसची ‘व्होट बँक’ वळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. दशकभरापासून काँग्रेसकडून भ्रमनिरास झालेला मतदार पर्याय शोधत आहे.

आंध्रपासून ते तेलंगण आणि महाराष्ट्रापर्यंत (जिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे पडली) सर्वत्र तेच दृश्‍य दिसत आहे. पश्‍चिम बंगालमध्ये ममतांनी सर्व जागा व्यापली. दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये ‘आप’ने त्यांचे अस्तित्व पुसून टाकले. काँग्रेसची हक्काची म्हणवणारी मते इतरांच्या पारड्यात जात आहेत. ‘आप’ या साऱ्यातून मार्ग काढताना भाजपसोबत समोरासमोर जाणे टाळत आहे. ‘आप’ने ज्या राज्यांत सत्ता मिळविली आहे, तेथे काँग्रेसची मते काढून घेतली आहेत. यातून पक्षाचा २०२४ च्या निवडणुकीसाठी पाया तयार होत आहे. गुजरातमध्ये त्यांना पूर्ण सत्ता मिळायलाच हवी, असे नाही. मात्र, दहा-पंधरा जागा मिळाल्या तरी एक वाढता राष्ट्रीय राजकीय पक्ष हा दावा त्यांना बळकट करता येईल.

जुन्या जनसंघातून १९८० मध्ये भाजपचा उदय झाला. काँग्रेस (आय) मूळ काँग्रेसमधून जन्मला. जनता दल संयुक्त विधायक दलातून तयार झाला. यात पुढे काय झाले, ते सर्वश्रुत आहे. ‘आप’ने गुजरातमध्ये डझनभर आणि हिमाचलमध्ये मूठभर जागा मिळविल्या तरी एका नव्या राष्ट्रव्यापी पक्षाचे आगमन पाहायला मिळेल. मोदी-भाजपवर टीका करणाऱ्यांनी ‘आप’ची केलेली प्रशंसा पात्र वाटत असेल, तर त्यात वैचारिक स्पष्टतेचा अभाव दिसून येतो. विशेषतः धर्मनिरपेक्ष मुद्यांबाबत. मुस्लिमांबाबतच्या दृष्टिकोनाबाबतही विचार करता येऊ शकतो. याचा सोपा अर्थ या पक्षापुढे कोणतीही विचारधारा सध्या तरी दिसत नाही, हाच आहे.

नेतृत्वाचा विकास व्हायला हवा

आरोग्य, शिक्षण, मोफत वीज, पाणी, अनुदाने, भ्रष्ट कारभार, विशेषत: सेवांच्या वितरणाबाबत बोलणे त्यांच्यासाठी अधिक सुरक्षित आहे. पण राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी यापुढेही जाऊन प्रयत्न करायला हवेत. आणि सर्वांत शेवटी म्हणजे एकखांबी नेतृत्व. त्यामुळे पंजाबमध्ये कशा पद्धतीने अडचणींचा सामोरे जावे लागत आहे, ते पाहायला मिळत आहे. जोपर्यंत ते आपल्या नेतृत्वाचा विस्तार करीत नाहीत, पक्षात आणखी इतर दिग्गजांना जागा निर्माण करणार नाहीत, तोपर्यंत खूप वेगाने विस्तारण्याचा धोका पत्करला जाईल. मात्र, त्याची सुरवात दणक्यात होईल. पण, पुढे जाऊन त्याला टिकविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल, हे मात्र नक्की.

भाजपची आळशी, दोषमुक्त आवृत्ती

केंब्रिज विद्यापीठातील राजकीय अभ्यासक प्रा. श्रुती कपिला, तेजस्वी यांनी ‘द प्रिंट’साठी लिहिलेल्या लेखात ‘आप’चे वर्णन ‘भाजपची आळशी, दोषमुक्त आवृत्ती’ अशी केली आहे. मात्र, ही त्यांची छबीही त्यांची राजकीय ताकद ठरते की कमजोरी, हे येणारा काळ ठरवेल. राजकारणाला वाईट म्हणणारी, राजकारणीविरोधी शक्ती म्हणून ते समोर आले. त्याचा पुढील अवतार हा बंडखोर पक्ष असा होता.

आता तो कल्याणकारी बनला आहे. राष्ट्रवादावर आपण मोदी यांच्याबरोबर लढू शकत नाही, हे स्वीकारण्याएवढे वास्तवाचे भान त्यांना आहे. हिंदू चिडतील, या भीतीने ते मुस्लिमांच्या बाजूने बोलताना सावधगिरी बाळगत आहेत. त्यांना हे स्वच्छ माहिती आहे, की जे भाजपला पराभूत करू शकतील, अशांनाच मुस्लिम मते मिळणार आहेत.

अनुवाद: प्रसाद इनामदार

सध्या ‘आप’ हा भाजपला लक्ष्य करीत नाही; तर काँग्रेसचे मतदार आपल्याकडे कसे वळतील, या प्रयत्नात आहे. या पक्षाची सद्यस्थितीत कोणतीही विचारधारा नाही आणि त्यांच्या काही कमकुवत बाजूही समोर येताना दिसत नाहीत. दशकभरापासून काँग्रेसमुळे भ्रमनिरास झालेला मतदार पर्याय शोधतो आहे.

- शेखर गुप्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com