Firecracker ban in Delhi : दिल्लीत फटाकेबंदी धाब्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aap govt Firecracker ban in Delhi pollution index has reached 500

Firecracker ban in Delhi : दिल्लीत फटाकेबंदी धाब्यावर

नवी दिल्ली : प्रदूषणामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आप सरकारने फटाके फोडण्यावर बंदी आणली, परंतु दिल्लीकरांनी ती धाब्यावर बसवीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले. त्यामुळे सोमवारी रात्रीच हवा गुणवत्ता निर्देशांक ५०० च्या वर गेला. ही हवा अत्यंत विषारी म्हणून नोंदविली गेली. राष्ट्रीय स्तरावर हवेच्या गुणवत्तेवर नजर ठेवणाऱ्या सरकारी संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार दिल्ली आणि परिसरात हवेचा निर्देशांक ४०० ते ८०० या श्रेणीत नोंदविला गेला. हा निर्देशांक आरोग्यास अत्यंत घातक आहे. तज्ज्ञांच्या मते या प्रदूषित वातावरणात दीर्घकाळ राहिल्याने श्वसनाचे आजार होऊ शकतात. हा स्तर ४०१ च्या वर गेल्याने हवेची गुणवत्ता ''गंभीर'' पातळीवर पोहोचते. यामुळे निरोगी लोकांनाही श्वसनाच्या आजाराचा धोका संभवतो. तसेच जे आधीच आजारी आहेत त्यांच्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

‘सफर'' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मंगळवारी सकाळी दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत आली होती. सोमवारी रात्री दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागात पीएम २.५ ची पातळी ४०० च्या पुढे गेली होती. दरम्यान, दिल्लीत प्रदूषण वाढण्याच्या भीतीने कडक नियम आणि निर्बंध लागू करण्यात आले होते. फटाके न फोडण्यासाठी दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांच्यावतीनेही जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती. फटाके फोडणाऱ्यांवर दंड आकारावा, असेही सांगण्यात आले होते. असे असतानाही नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. अनेक भागांत रात्री तीन वाजेपर्यंत फटाके फोडण्यात आले.

भाजप खासदारावर ताशेरे

केजरीवाल सरकारने फटाके फोडणे, विकणे यासाठी बंदीचा आदेश काढल्यानंतर भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी ही बंदी हटवावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने तिवारी यांनाच फटकारले. तरीही लोकांनी फटाके फोडून दिल्लीतील प्रदूषणाच्या पातळीला अत्यंत धोक्याच्या पातळीवर नेऊन ठेवले. दुसरीकडे दिल्ली सरकारचा आदेश हा केवळ नावापुरताच असेही स्पष्ट झाले. कारवाईचे प्रमाण अत्यल्प होते.