Delhi Elections : केजरी'वॉल' अभेद्य

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

मोदींवर टीका टाळली
पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केजरीवाल यांनी एकही वावगा शब्द गेल्या तीन वर्षांत उच्चारलेला नाही. यंदा तर ऐन निवडणुकीत त्यांनी पाकिस्तानला फटकारताना मोदी हे माझेही पंतप्रधान आहेत, असे प्रत्युत्तर दिल्याने त्याचाही प्रचंड लाभ त्यांना मिळाला. वावदूकपणात अनुराग ठाकूर, गििरराजसिंह यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या  फवाद चौधरी नामक पाकिस्तानी मंत्र्याला केजरीवालांनी झापल्यामुळे त्यांची प्रतिमा आणखी उजळून निघाली होती.

कौल ‘आप’ला; भाजपला ८ जागा, काँग्रेसला भोपळा
नवी दिल्ली - ‘अच्छे बीते पाच साल, जमे रहो केजरीवाल’ ही आम आदमी पक्षाची घोषणा आज शब्दशः खरी ठरली. दिल्लीच्या जनतेने भाजपचा ध्रुवीकरणाचा चक्रव्यूह भेदत ‘आप’च्या पारड्यात भरभरून मते टाकत ‘लगे रहो केजरीवाल’ असा जनादेश दिला. दिल्लीतील ७० पैकी ६२  जागांवर ‘आप’चे उमेदवार विजयी झाले असून, भाजपला केवळ आठ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसला या खेपेसही भोपळा फोडता आला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाढलेल्या पक्षांतर्गत लाथाळ्या, शीला दीक्षितांच्या नेतृत्वाची कमतरता व काँग्रेस नेते राहुल गांधींच्या तद्दन बालीश लीलांना ‘मम’ म्हणण्याची अपरिहार्यता झेलणारा काँग्रेस पुन्हा भोपळाही फोडू शकलेला नाही. उलट काही मतदारसंघांत काँग्रेसने आपच्या पायात पाय घातल्याने भाजपच्या जागा वाढल्या आहेत. भाजपमधील अंतर्गत भांडणात मग्न असलेल्या दिल्लीकर नेत्यांनीही परस्परांचे पाय ओढणे थांबविलेले नाही, येथे दिल्लीकर नेते मोदी आणि शहा यांनाही जुमानताना दिसत नाहीत. दिल्लीकरांनी  सलग तिसऱ्यांदा आपला विजयी करताना सलग दुसऱ्या निवडणुकीत निसंदिग्ध कौल दिला आहे. काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या सातही मतदारसंघांत भाजप विजयी झाला होता त्या सातही मतदारसंघांत या वेळी आपने बाजी मारली आहे. या सातही ठिकाणी आपला दहा तर भाजपला एक जागा मिळाली आहे.

मतांची टक्केवारी
आपने सलग दुसऱ्यांदा ५० टक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्य मिळविले आहे. २०१५ मध्ये आपला ५४.३ टक्के मते मिळाली होती. यंदा सायंकाळपर्यंतचे निकाल पाहता ही टक्केवारी ५५.५४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तुलनेने कमी मतदान होऊनही आपच्या मतांचा टक्का वाढला आहे, जागा मात्र घटल्या आहेत. भाजप मतांच्या टक्केवारीत फारसा मागे नाही. या पक्षाचा मतदार आधार अद्याप शाबूत असून यंदा पक्षाने ३९.२१ टक्के मते मिळविली आहेत. काँग्रेसला ४.८१, बसपा ०.६७, जदयू ०.९८ व नोटा ०.४० अशी इतरांची टक्केवारी आहे.

असाही विक्रम
शीला दीक्षित यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदाची हॅटट्रिक करणारे केजरीवाल दिल्लीचे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. दुसरा विक्रम म्हणजे एखाद्या राज्यात सलग दुसऱ्यांदा ५० टक्क्यांहून जास्त मते घेऊन सत्तारूढ झालेला आप हा देशातील पहिलाच पक्ष ठरला आहे. केजरीवाल यांनी अगदी सुरवातीपासून प्रचाराची आणखी व मांडणी दिल्लीचा विकास या मुद्यांभोवती केली होती. भाजपने फेकलेल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या जाळ्यात न अडकण्याची काटेकोर काळजी त्यांच्यासह आपच्या पहिल्या फळीतील सर्व नेत्यांनी घेतली व त्यांची हीच रणनीती कमालीची यशस्वी ठरल्याचे निकाल दाखवतात. आपचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या प्रचाराची आखणी करताना भाजपच्या विखारीपणाला शालीनतेने प्रत्युत्तर देण्याचा व मतदारसंघनिहाय काळजीपूर्वक प्रचार बदलण्याचा सल्ला दिला व केजरीवाल यांनी तो ऐकला

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल आप आणि अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन. दिल्लीतील लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना शुभेच्छा.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aap party win in delhi vidhansabha election