esakal | आसाम भाजपसाठी डोकेदुखी ठरणार?

बोलून बातमी शोधा

Himant Bisw

आसाम भाजपसाठी डोकेदुखी ठरणार?

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पश्चिम बंगालसह राज्यांच्या निवडणुकांमध्ये अपेक्षाभंग झालेल्या भाजपाला आसाममध्ये सलग दुसऱ्या विजयानंतर काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र आता, ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’ हा पेच पक्षनेतृत्वासमोर टोकदारपणे उभा आहे. केंद्रीय नेतृत्वाचा कल विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे असला तरी राज्याचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांच्याही महत्त्वाकांक्षेने उसळी घेतली आहे.

२०१६ च्या निवडणुकीआधी काँग्रेसमधून भाजपवासी झालेले बिस्व शर्मा यांना, पाच वर्षे थांबा पाच वर्षे थांबा असे म्हणून त्यावेळी भाजप नेतृत्वाने थोपवून धरले, अशी माहिती पक्षसूत्रांकडून समजते. मात्र या निवडणुकीआधीच त्यांनी स्वतःला मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट करण्यास सुरवात केली होती आणि त्यासाठी त्यांना भाजपच्या सध्याच्या प्रथेप्रमाणे दिल्लीकडून हिरवा कंदील मिळवण्याचीही गरज वाटली नव्हती हे लक्षणीय आहे.

काल निकाल लागून भाजपच्या पारड्यात सत्ता येणार असल्याचे स्पष्ट होताच विश्वास शर्मा यांनी मुख्यमंत्रिपदाचा बाबतचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेईल आणि तो दिल्लीत होईल असे परस्पर सांगून टाकले. नेतृत्वाचा कल अजूनही सोनवाल यांच्याकडेच आहे.

मात्र हिमंत बिस्व शर्मा यांची प्रशासनावरील आणि पक्षाच्या आमदारांवरील पकड यामुळे त्यांचे उपद्रवमूल्य वाढल्याने भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाला आसामचा पेच हलक्या हाताने सोडवावा लागण्याची आवश्यकता भासू लागली आहे. आसाम आणि पुदुच्चेरी येथील मुख्यमंत्रिपदाच्या नावाची निश्चिती करण्यासाठी भाजप संसदीय मंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आगामी दोन दिवसांमध्ये दिल्लीत होईल असे समजते.

हेही वाचा: West Bengal: राहुल गांधींची सभा अन् उमेदवाराचं डिपॉझिट जप्त

तुरुंगात असलेले गोगोई विजयी

शिवसागर (आसाम) - आसामच्या शिवसागर मतदारसंघातील सीएए विरोधी आंदोलक आणि तुरुंगात असणारे राइजोर पक्षाचे संस्थापक अखिल गोगोई यांनी विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार सुरभी राजकुंवर यांचा पराभव केला. कोणतिही प्रचारसभा न घेता सुरभी यांचा त्यांनी ११,८७५ मतांनी पराभव केला.

राइजोर दलाचे संस्थापक अखिल गोगोई हे राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली डिसेंबर २०१९ पासून तुरुंगात आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसागर मतदारसंघातील सुमारे ४६.०६ टक्के मिळाली. कॉंग्रेसचे उमेदवार सुभ्रमित्र गोगोई हे तिसऱ्या स्थानावर राहिले. सुरवातीला कॉंग्रेसने राइजोर दलाच्या प्रमुखास पाठिंबा दिला होता. मात्र सुभ्रामित्र गोगोई यांना उमेदवारी दिल्यानंतर कॉंग्रेसने अखिल यांचे पाठबळ काढून घेतले. माहिती अधिकार कार्यकर्ते अखिल गोगोई यांनी तुरुंगातून जनतेसाठी अनेक पत्रे लिहिली आणि राज्यातील प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम केले. विशेष म्हणजे अखिल गोगोई यांच्या ८५ वर्षाच्या आईने मुलासाठी शिवसागरच्या अरुंद गल्ल्यात फिरून प्रचार केला. गुवाहटीतील कॉटन कॉलेजचे विद्यार्थी राहिलेले ४६ वर्षीय अखिल गोगोई यांनी राइजोर पक्षाची स्थापना केली. तत्पूर्वी त्यांनी १९९५-९६ मध्ये कॉटन महाविद्यालयात असताना विद्यार्थी संघटनेच्या विविध पदावर काम केले.