esakal | आयरीश रॉड्रिग्ज यांचा सुभाष वेलिंगकर यांना पाठिंबा 
sakal

बोलून बातमी शोधा

velingkar

आयरीश रॉड्रिग्ज यांचा सुभाष वेलिंगकर यांना पाठिंबा 

sakal_logo
By
अवित बगळे

पणजी : विधानसभा पोट निवडणुकीत माहिती हक्क कार्यकर्ते ऍड आयरीश रॉड्रिग्ज यांनी गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांना पाठिंबा जाहीर केला. पणजीवासियांनी राजकारण शुद्ध करण्यासाठी, कोणताही डाग नसलेले वेलिंगकर यांनाच निवडून देण्याचे आवाहन करतानाच सामाजिक कार्यकर्ते वेलिंगकर यांना पणजीत प्रचार करतील असे रॉड्रिग्ज यांनी जाहीर केले. 

रॉड्रिग्ज हे संघविचारांवर नेहमीच टीका करत आले आहेत. वेलिंगकर यांची हिंदुत्वावरील निष्ठा त्यांनी कधी दडवून ठेवलेली नाही. वेलिंगकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोवा प्रांताचे संघचालक होते. असे असतानाही रॉड्रिग्ज यांनी वेलिंगकर यांना दिलेला पाठिंबा आज अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. विशेषतः भाजपच्या गोटात हा निर्णय धडकी भरवणारा आहे. 
रॉड्रिग्ज म्हणाले, कॉंग्रेसचे उमेदवार आतानासिओ मोन्सेरात यांच्यावर अनेक गुन्हे आहेत, भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळकर यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप आहेत. आम आदमी पक्षाचे वाल्मिकी नाईक अननुभवी आहेत. त्यामुळे त्यांच्यात वेलिंगकर हेच उजवे उमेदवार आहेत. ते आपल्या विचारांशी प्रामाणिक आहेत. तत्वनिष्ठा म्हणजे काय हे कोणीही त्यांच्याकडून शिकावे. केवळ या गुणांसाठीच आणि पणजीला स्वच्छ चारित्र्याचा आमदार मिळावा यासाठी वेलिंगकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

रॉड्रिग्ज यांनी 2012 पासून भाजप आघाडी राज्य सरकारसोबत पंगा घेतला आहे. माहिती हक्क कायद्याचा प्रभावी वापर करून त्यांनी अनेक खटले सरकार व सत्ताधाऱ्यांविरोधात दाखल केले आहेत. अलीकडे त्यांनी नवे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविरुद्ध असंपदेप्रकरणी लोकायुक्तांकडे पुराव्यांसह तक्रार केली आहे. त्यावर आता 20 मे रोजी सुनावणीही होणार आहे. सार्वजनिक जीवनातील अनेकांना रॉड्रिग्ज यांनी धडकी भरवली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांत रॉड्रिग्ज यांच्याविषयी एक मोठी क्रेझ आहे. अनेकजण त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी येतात आणि त्यांचे खटले ते लढवतात. त्याचमुळे पणजीत वेलिंगकर यांना रॉड्रिग्ज यांनी दिलेला पाठिंबा गेम चेंजर ठरू शकण्याची शक्‍यता अधिक आहे. 

loading image