
BS Yeddyurappa : माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या गाडीला कार्यकर्त्यांचा घेराव; थांबवावा लागला प्रचार
बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना चिकमंगळूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याने त्यांना निवडणूक प्रचार थांबवावा लागला. भाजपचे आमदार एमपी कुमारस्वामी यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नका, अशी घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
घोषणाबाजीने येडियुरप्पा संतप्त झाले. तसेत ते भाजपचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी यांच्यावरही नाराज झाले. येडियुरप्पा यांनी त्यांचा मुलगा आणि राजकीय उत्तराधिकारी बीवाय विजयेंद्र यांना त्यांच्या शिकारीपुरा मतदारसंघातून तिकीट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. सीटी रवी यांनी त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती की "विजयेंद्र यांना तिकीट द्यायचे की नाही हे संसदीय मंडळ ठरवेल. स्वयंपाकघरात हे निश्चित केले जाऊ शकत नाही.” यामुळे येडियुरप्पा आणि विजयेंद्र नाराज झाले होते.
दरम्यान सीटी रवी आणि येडियुरप्पा यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे गुरुवारी चिक्कमगलुरूमध्ये वातावरण इतके खराब झाले होते की येडियुरप्पा यांनी रोड शो रद्द केला, असंही सांगण्यात येत आहे.
पक्षाचे कार्यकर्ते आणि सीटी रवी समर्थकांनी येडियुरप्पा यांच्या गाडीचा घेराव घातला. तसेच आमदार एमपी कुमारस्वामी यांना विधानसभेचे तिकीट देऊ नये अशी मागणी केली. मुदिगेरे मतदारसंघातून कुमारस्वामी आणखी एक टर्म आमदारकी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.