'Y' दर्जाची सुरक्षा दिल्याबद्दल कंगनाने मानले गृहमंत्री अमित शहांचे आभार

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 7 September 2020

देशात तिसऱ्या क्रमांकाचा दर्जा असणारी सुरक्षा व्यवस्था कंगनाला पुरवण्यात येणार आहे. 

नवी दिल्ली : वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आलेली राष्ट्रीय पुरस्कार विजेती बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाने Y दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. या सुरक्षा प्रकारात 1 किंवा 2 कमांडोसह 11 पोलिस जवानांचा समावेश असतो. गृहमंत्रालयाकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 9 सप्टेंबर रोजी कंगना हिमाचल प्रदेशवरुन मुंबईला येणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना राणावत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ट्विटर वॉर सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मिरसोबत केल्याने तिच्याविरोधात राज्यातील अनेक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे विधानही केले होते. संजय राऊत आणि कंगना यांच्यातही ट्विटरवर वॉर रंगले. त्यानंतर कंगनाने मुंबई कोणाच्या बापाची नाही, अशा शब्दांत तिच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांबाबत ट्विटरच्या माध्यमातून सुनावले. गृहमंत्रालयाने देशातील व्हीआयपी व्यक्तींना पुरवण्यात येणारी तिसऱ्या क्रमांची सुरक्षा दिल्यानंतर कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. 

काय आहे Y सुरक्षा 
-देशातील  तिसऱ्या क्रमांची सुरक्षा
- यात दोन कमांडोसह 11 जवानांचा समावेश
 - यात दोन अधिकाऱ्यांचा समावेश असतो 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Kangana Ranaut has been granted Y category security home minister Actress Kangana Ranaut, Amit Shah