फेसबुकनंतर व्हॉट्सॲपशी देखील भाजपची हातमिळवणी - राहुल गांधी  

टीम ई-सकाळ
Saturday, 29 August 2020

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर भाजपशी लागेबांधे असल्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर भाजपशी लागेबांधे असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना पत्र लिहिले असून त्यात त्यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांना प्रतिबंध करण्यासाठी द्वेषमूलक विधानविरोधी नियमांचा अवलंब करण्यात आला की नाही अशी विचारणा देखील काँग्रेसकडून करण्यात आली आहे. 

मागील काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील द वॉल स्ट्रीट जर्नलने भाजप आणि फेसबुक इंडिया यांच्या भूमिकेवर प्रशचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर या वृत्तामुळे भारतातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. परंतु फेसबुकने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे हे प्रकरण निवळल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच, आता राहुल गांधी यांनी सोशल मीडियातील व्हॉट्सॲपवर भाजपचे नियंत्रण असल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर आरोप करताना, टाइम या नियतकालिकाने दिलेल्या वृत्ताचा दाखला दिला आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या ट्विट मध्ये, अमेरिकेच्या टाइम या नियतकालिकाने व्हॉट्सॲप आणि भाजप यांचे लागेबांधे उघड केल्याचे म्हटले आहे. तसेच भारतात चाळीस कोटी लोक व्हॉट्सॲप वापरतात. आणि व्हॉट्सॲप देशात पेमेंट सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे, त्यासाठी त्यांना मोदी सरकारची मंजुरी लागेल. त्यामुळे यावरूनच कंपनीवरील भाजपचे नियंत्रण स्पष्ट होत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Facebook BJP is also associated with WhatsApp