लँडर विक्रम ‘जिंदा’ है; पुढील 14 दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न 

Chandrayan 2
Chandrayan 2

बंगळूर : ‘चांद्रयान-२’च्या ‘विक्रम’ लॅंडरचा ‘इस्रो’च्या मुख्यालयाशी संपर्क तुटला असला, तरी पुढील चौदा दिवस ‘विक्रम’शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ‘इस्रो’ने अाज सांगितले. तसेच, मुख्य यान (ऑर्बिटर) चंद्राच्या कक्षेत कार्यक्षमतेने फिरत असून, ते सुस्थितीत आहे, असेही ‘इस्रो’ने स्पष्ट केले.  

चांद्रभूमीपासून २.१ किलोमीटर अंतरावर असताना ‘चांद्रयान २’मधील विक्रम लॅंडरचा ‘इस्रो’च्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची मोहीम भारताने आखली होती. ही मोहीम यशस्वी झाली असती तर या भागात यान उतरविणारा भारत पहिलाच देश ठरला असता. 

‘विक्रम’शी संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला ऑर्बिटर सुस्थितीत आहे.  ‘विक्रम’शी संपर्क तुटल्यानंतर या ऑर्बिटरबाबतही शंका उपस्थित झाली होती. मात्र, या ऑर्बायटरची स्थिती उत्तम असून, ते पूर्ण क्षमतेने काम करीत आहे, असे ‘इस्रो’ने पत्रकारांना सांगितले. या ऑर्बिटरचे वजन २३७९ किलो असून, ते चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवरील कक्षेतून निरीक्षणे नोंदवत आहे. 

ऑर्बिटरचा कार्यकाळ ७.५ वर्षे
या मोहिमेबाबत बोलताना सिवान म्हणाले की, पहाटे साधारण १.५५ मिनिटांनी ‘विक्रम’शी संपर्क तुटला. आता पुढील १४ दिवस हा संपर्क परत मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ‘विक्रम’शी संपर्क नसला तरी ऑर्बिटर मात्र कक्षेत फिरत असून, त्याच्याकडून बरीच माहिती मिळेल.  शिवाय, या ऑर्बिटरमध्ये बरेच इंधन बाकी असल्याने तो पुढील एक वर्ष नव्हे, तर साडेसात वर्षे चंद्राभोवती फिरेल. 

ऑर्बिटरवर असलेल्या अत्याधुनिक उपकरणांच्या साह्याने ‘विक्रम’ लॅंडरचा शोध लावणे शक्‍य आहे, असेही सिवान या वेळी म्हणाले. ‘ऑर्बिटरवर असलेल्या सार रडार यंत्रणेच्या साह्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागाची १० मीटर उंचावरूनची छायाचित्रे काढता येऊ शकतात. याचा वापर करून चंद्रावर पाणी आहे की नाही, हे शोधण्यास मदत होईल. या ऑर्बिटरवरील कॅमेरा ३० सेंमीपर्यंत झूम करू शकतो. अशा प्रकारचा जगातील हा पहिलाच कॅमेरा आहे. ऑर्बिटर आपल्याला पुढील सात वर्षे अत्यंत महत्त्वाची माहिती पाठवू शकतो. त्यामुळे ही मोहीम अयशस्वी झाली, असे म्हणताच येणार नाही,’ असे सिवान म्हणाले. ‘विक्रम’चे लॅंडिंग झाले असते त्या ठिकाणाच्या वर ऑर्बिटर पुढील तीन दिवसांनी पुन्हा येणार आहे. त्यामुळे ‘विक्रम’चा शोध घेणे शक्‍य आहे, असे ‘इस्रो’च्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञानेही सांगितले.

चांद्रयान-२ मध्ये ऑर्बिटर, लॅंडर (विक्रम) आणि बग्गी (प्रग्यान) यांचा समावेश होता. त्यापैकी ‘विक्रम’ आणि ‘प्रग्यान’शी संपर्क तुटला आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचे आणि बाह्य वातावरणाचे निरीक्षण करण्यासाठी ऑर्बिटरवर आठ वैज्ञानिक उपकरणे आहेत.

देश ‘इस्रो’च्या पाठीशी
चांद्रभूमीपासून काही अंतरावर असताना ‘चांद्रयान-२’मधील ‘विक्रम’ लॅंडरचा ‘इस्रो’च्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. असे असले तरीही ‘इस्रो’च्या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची मोहीम भारताने आखली होती. ही मोहीम यशस्वी झाली असती, तर या भागात यान उतरविणारा भारत पहिलाच देश ठरला असता. चंद्रावर यान उतरविण्याची किमया यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांनी केली आहे. त्यातही दक्षिण ध्रुवावर यान उतरविणे एकाही देशाला शक्‍य झाले नव्हते.

अखेरच्या टप्प्यात योग्य प्रकारे नियंत्रण राहिले नव्हते. याच टप्प्यात आम्ही ‘विक्रम’शी संपर्क गमावून बसलो. मात्र, पुढील चौदा दिवस आम्ही हा संपर्क परत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. 
- के. सिवान, प्रमुख, इस्रो

‘हम होंगे कामयाब, मन में हैं विश्‍वास, पूरा हैं विश्‍वास, हम होंगे कामयाब एक दिन...’ आपण ३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. इतका कठीण प्रवास करणे हे मोठे यश आहे.
- रामनाथ कोविंद,  राष्ट्रपती

संपर्क तुटला, पुढे काय? 
- पुढील चौदा दिवस "विक्रम'शी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरूच राहणार 
- आतापर्यंत मिळालेल्या माहितीचे विश्‍लेषण करून चूक शोधून काढणार 
- "विक्रम'बाबत काही पुरावे शोधण्यासाठी चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरचा वापर करणार 
- याशिवाय इतर देशांच्या अवकाश संशोधन संस्थांकडूनही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल 
- आर्बिटर पुढील वर्षभर चंद्राच्या कक्षेत फिरत राहून चंद्राची माहिती पृथ्वीकडे पाठविणार 
- सात वर्षे कार्यक्षम राहील इतके इंधन ऑर्बिटरमध्ये शिल्लक 

चांद्रयान-2  
12 जून : चांद्रयान-2 हे 15 जुलैला प्रक्षेपित होणार, असे "इस्रो'कडून जाहीर. 
7 जुलै : जीएसएलव्ही एमके-3 प्रक्षेपण केंद्रावर. 
14 जुलै : काउंटडाऊन सुरू. 
15 जुलै : तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपणाच्या एक तास आधी उड्डाण रद्द. 
18 जुलै : प्रक्षेपण 22 जुलैला दुपारी 2.43 मिनिटांनी होणार असल्याचे जाहीर. 
22 जुलै : चांद्रयान-2 चे यशस्वी प्रक्षेपण. 
4 ऑगस्ट : चांद्रयानाने काढलेले पृथ्वीचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध. 
20 ऑगस्ट : चांद्रयान चंद्राच्या कक्षेत. 
22 ऑगस्ट : चांद्रयानाकडून चंद्राची छायाचित्रे पृथ्वीकडे. 
2 सप्टेंबर : मुख्य यानापासून "विक्रम' लॅंडर यशस्वीपणे वेगळा करण्यात आला. 
7 सप्टेंबर : चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किमी अंतरावर असताना "विक्रम'शी संपर्क तुटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com