अग्नीपथ लष्कर भरती योजनेची घोषणा

दर ४ वर्षांसाठी ५० हजार अग्नीवीरांची भरती - राजनाथसिंह
Agneepath Army Scheme Recruitment Announced
Agneepath Army Scheme Recruitment Announcedsakal

नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलांतील नवीन प्रकारच्या सैन्य भरतीच्या ‘मिशन अग्निपथ’ योजनेची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात केली. या योजनेत भरती झालेल्या तरुणांना ‘अग्नीवीर' असे खास नाव दिले जाणार असून अग्नीवीर म्हणून झालेली निवड प्रत्येकी चार वर्षांसाठी असेल, अशीही माहिती राजनाथसिंह यांनी दिली. यावेळी लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते.

अग्नीपथ योजनेत दर वर्षी साधारणत : ५० हजार याप्रमाणे प्रत्येकी चार वर्षांसाठी तरूणांची सैन्यभरती करण्यात येईल. ४ वर्षांनी त्यातील २५ टक्के तरूणांना नियमित लष्करी सेवेत सामावून घेतले जाईल व उर्वरीत उमेदवारांना निवृत्तीवेतनाचा लाभ मिळेल. जगभरातील अनेक देशांचा अभ्यास करून ही योजना तयार केली आहे. येत्या काळात भारताच्या लोकसंख्येमध्ये तरुणांचं प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असेल आणि या नवीन योजनेमुळे तरुणांना उत्तम प्रतीचा रोजगार उपलब्ध होईल, असेही ते पुढे म्हणाले.

लष्कराच्या सैनिक व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. भारतीय सैन्याचे सरासरी वय सध्या ३२ वर्षांचे आहे. ‘मिशन अग्निपथ' मुळे ते वय २४ ते २६ वर्षांपर्यंत कमी होईल आणि सैन्यात तंत्रकुशल तरुण सैनिकांचे प्रमाण वाढेल, असे ते म्हणाले. ४ वर्षांची नियुक्ती संपल्यावर यापैकी २५ टक्के अग्नीवीरांना सैन्यदलात कायमस्वरूपी सामावून घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.

राजनाथसिंह म्हणाले की मागील अनेक वर्षांपासून देशाची संरक्षण प्रणाली मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. भारतीय लष्कराला जगातील उत्तम लष्कर बनविण्यासाठी अग्निपथ योजना मोठ्या प्रमाणात सहाय्यभूत ठरेल. यामुळे देशाची सुरक्षा मजबूत होईल त्याबरोबरच तरूणांना रोजगाराच्या संधीही वाढतील. सैन्यदलांत तरूणींचीही भरती करण्याची तरतूद अग्नीपथ योजनेत आहे.

अशी आहे अग्नीपथ योजना :

  • प्रत्येकी चार वर्षांसाठी युवकांची लष्करासह तिन्ही सैन्यदलांत भरती केली जाईल.

  • दर वर्षी किमान ४६ हजार तरूणांची लष्कर भरती होईल.

  • ४ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर यातील ७५ टक्के सैनिकांना सेवेतून मुक्त केले जाईल व पुढील काळात सशस्त्र दलांतील विविध भरतीसाठी त्यांना प्राधान्य दिले जाईल.

  • २५ टक्के तरूणांना सैन्यदलांत पुढए सेवेची संधी मिळेल. मात्र जेव्हा सैन्यभरती होईल तेव्हाच या २५ टक्के युवकांना पात्रता निकष पूर्ण केल्यावर सेनेत सामावून घेतले जाईल.

  • ४ वर्षांनी सेवामुक्त होणाऱया सैनिकांना प्रत्येकी ११ लाख ७१ हजारांचे ‘सेवा निधी‘ पॅकेज दिले जाईल व ही संपूर्ण रक्कम करमुक्त असेल. या चार वर्षांत वेतनातून जेवढी कपात केली जाईल तेवढीच रक्कम सरकार कॉर्पस फंडात टाकेल. त्यातून ४ वर्षांनी एकत्रितपणे सेवा निधीची रक्कम मिळेल.

या सैनिकांना वेतन पुढीलप्रमाणे मिळेल-

  • पहिले वर्ष - दरमहा ३०, ००० रूपये (हाती येतील २१०००)

  • दुसरे वर्ष- ३३,००० (२३१००)

  • तिसरे वर्ष- ३६००० (२५५८०)

  • चौथे वर्ष ४०००० (२८०००)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com